घरातले सगळे पुरुष आकस्मिक गेले तरी धीर न सोडता हातात वस्तरा घेत आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळणारी अमृता वास्के

घरातले सगळे पुरुष आकस्मिक गेले तरी धीर न सोडता हातात वस्तरा घेत आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळणारी अमृता वास्के

संकट कधी सांगून येत नाहीत. एका सरळ रेषेत आयुष्य चालू असते आणि असे काही तरी घडते की क्षणात सारे आयुष्यच बदलून जाते. ‘वास्केज्’ या युनिसेक्स सलोनच्या अमृता वास्के यांची गोष्ट अनेक संघर्ष आणि आव्हानांनी भरलेली आहे. पिढीजात पुरुषी वर्चस्व असलेला व्यवसाय बंद पडू न देता समाजाच्या पूर्वापार बेड्या तोडून व्यवसायाला त्यांनी एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. संकटाना अमृता आता भीत नाही कारण भिऊन काहीच साध्य होत नाही. उलट संकटाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला भिडले की आपोआप मार्ग मिळत जातो.

अमृता या दादर शिवाजी पार्कच्या रहिवासी. बालपण, शिक्षण सारे इथलेच. त्यांच्या आजोबांचे शिवाजी पार्क परिसरात सलून होते. आजोबांची खूप इच्छा होती की आपले इथे दुकान असावे आणि त्यांनी अमाप मेहनतीने ते साध्यही केले. पुढे आजोबांच्या पश्चात अमृताचे वडील पिढीजात व्यवसाय पुढे नेत होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अचानक हृदयविकाराने वडील वारले. काही काळात भावाचेही अपघाती निधन झाले. एका मागोमाग एक घरातील पुरुषांचे आकस्मिक निधन झाले. आता घरात फक्त स्त्रिया उरल्या. पुरुषी मक्तेदारी असलेला व्यवसाय ठप्प झाला.

अनेकांनी आता व्यवसाय बंद करा असा सल्ला दिला. पण अमृताची आई उषा वास्के या खंबीर उभ्या राहिल्या. अमृताचे शिक्षण चालू होते. रोजीरोटी या दुकानावरच होती. अनेकांनी अनेक सल्ले दिले, पण कोणाचाच आधार नव्हता. मग आईने प्रथम शिक्षण पूर्ण कर असे अमृताला सांगितले. अमृताची स्वप्न वेगळी होती, पण हळूहळू आईची धडपड बघत अमृताही अपरिहार्यपणे या व्यवसायात उतरायला तयार झाल्या. तेव्हा अमृताचे वय होते फक्त बावीस वर्षे.

एका स्त्रिने पुरुषाचे केस कापावे किंवा केशकर्तनालयाच्या गल्ल्यावर बसावे हे कोणालाच मान्य नव्हते, पण त्या कुटुंबाची ती अपरिहार्यता होती. अनेक विखारी नजरांचा रोज सामना करावा लागत होता तरीही मायलेकीने आपली जिद्द सोडली नाही. अचानक आलेल्या जबाबदारीमुळे अमृताने शिक्षण सोडून हातात कात्री धरली. या धंद्यातील काहीच समजत नव्हते, काही माहितीही नव्हती. संपूर्ण पाटी कोरी होती. फक्त एकच गोष्ट ठाम होती ती म्हणजे आपल्या आजोबांचे स्वप्न जपायचे आणि ते वाढवायचे.

हाती कात्रीही नीट पकडता न येणारी अमृता आज एका वेळेला सलग दीडशे हेअरकट करू शकते आणि एवढेच नाही तर केवळ अर्ध्या तासात थीम मेकअप करता येईल एवढे कौशल्य त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. म्हणूनच अमृताचा एक यशस्वी उद्योजिका, प्रोफेशनल आर्टिस्ट असा प्रवास आहे. अमृता यांचा हा प्रवास खरे तर फार सोप्पा नव्हता. आव्हान होते केशकर्तनालय चालू ठेवण्याचे, पण अमृताने ते आव्हान पेलले. ज्यांच्या नजरेत अविश्वास, संशय होता त्या प्रत्येकाला हळूहळू आपल्या कामाने उत्तरे देत एक एक ग्राहक अमृताने जोडला.

पुरुषांच्या केशकर्तनालयात स्वत: उभे राहणे व समोरच्याची मानसिकताही बदलणे यासाठी प्रथम स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे होते. हा आत्मविश्वास अमृताने स्वत:मध्ये निर्माण केला. काही काळानंतर त्यांनी पुरुषांसोबत स्त्रियांसाठीही तेथेच पार्लर सुरू केले. युनिसेक्स सलोनची संकल्पना दहा वर्षापूर्वी फार नवीन होती. स्त्रियांना इथे यायला अवघडल्यासारखे व्हायचे. त्यामुळे सलूनचे नाव ‘वास्केज्’ करत अमृताने दुकानाचा पूर्ण कायापालट केला. त्यासाठी २० लाखांचे कर्जही काढले. रात्रंदिवस मेहनत करून कर्ज फेडलेही.

आज संपूर्ण कुटुंबच ‘वास्केज्’च्या सर्विस घ्यायला येते. अनेक मोठ मोठे दिग्गज इथे येतात त्यामुळे आजोबांच्या स्वप्नाला जपल्याचे समाधान अमृताला वाटते. याच काळात त्यांनी काम करत करत शिक्षण पूर्ण केले त्याला जोड म्हणून व्यवसायासाठी आवश्यक छोटे छोटे कोर्सही केले. दरम्यानच्या काळात मेकअप या विषयात रुची निर्माण झाली. काम करता करता मेकअप आर्टिस्ट म्हणून मनोरंजन क्षेत्रात काम करू शकतो हे कळले आणि मग प्रसिद्ध रंगभूषाकार पंढरीदादा जुकर यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. अमृताला यात गती होती त्यामुळे त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून आवश्यक त्या बारकाव्यानिशी गोष्टी शिकवल्या.

पुढे ‘झी मराठी’ वाहिनीसोबत अनेक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून अमृताने काम केले. इथेच संतोष परमार हेही मेकअप आर्टिस्ट म्हणून शिकत होते. त्यांचे सफाळा येथे पाच सलून आहेत. अमृताचा जिद्दीचा प्रवास त्यांना कळला आणि त्यांनी वडिलकीने या क्षेत्रातील बारकावे शिकवले.वडिलांचे छत्र हरवले, पण संतोषदादांच्या रूपाने आयुष्याच्या दुसर्‍या टप्प्यात वडिलांची माया, भावाचे प्रेम मिळाले. एक अनोळखी नाते एवढे घट्ट झाले की त्यांनी लग्नात अमृताचे कन्यादान केले.

अमृताच्या आयुष्यात पुन्हा रंग भरले जात होते. पुन्हा चेहर्‍यावर हसू येऊ लागले होते आणि परत एकदा नियतीने घाव घातला. अमृताचा अपघात झाला. अमृताच्या डोक्याला एकवीस जखमा झाल्या. नाकाचे हाड पूर्ण तुटले. पुढे तीन महिने श्वासही नीट घेता येत नव्हता. भारतात ओपन सर्जरी यशस्वी होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते आणि या केसमध्ये ओपन सर्जरीला पर्याय नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते. अपघात एवढा भीषण होता की मेंदूकडे जाणारी नस यात अडकली आहे. तिला हात लागला तर व्यक्ती कायमची कोमात जाऊ शकते. पण अमृताला अंथरुणाला खिळायचे नव्हते. हार मानून गप्पही बसायचे नव्हते. तिने सर्जरीचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी स्वत:च्या जोखमीवर सर्जरी करून भुवया आणि नाक यातील एक इंचाचा खड्डा भरला. अमृताने आंतरिक बळावर सहा महिन्यात पुन्हा स्वत:ला उभे केले. या जीवघेण्या अपघातावरसुद्धा तिने मात केली.

अमृता आज यशस्वी उद्योजिका आहे. पुरुषी मक्तेदारी न जुमानता काम करणार्‍या अमृताला आई आणि बहिणीची खूप साथ मिळाली. एक एक जोडलेला ग्राहक तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. लग्नानंतर पती आणि सासरचे नातेवाईक यांची ही उत्तम साथ तिला मिळतेय. धाडसी व्यक्तिमत्व असलेली अमृता महाविद्यालयीन काळात गाझा कारवा या रोडट्रीपमध्ये सहभागी झाली होती. युद्धावेळी तेथील लहान मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, वैद्यकीय मदत पोहचवण्यासाठी भारतातून काही प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यात अमृता होत्या. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आलेत. अमृता यांना भविष्यात मेकअप इंडस्ट्रीत एक मोठा ब्रँड तयार करायचा आहे.

स्त्रियांनी स्वत:वर प्रेम करावे आणि आपल्या आवडी, स्वप्न यांना समजून घेऊन प्रयत्न केले तर यश त्यांना लवकर मिळेल असे अमृता यांना वाटते. आजच्या स्पर्धेच्या काळात अनेकजण अपयशाला घाबरून लगेच हार मानतात. सोशल माध्यमे हे आभासी जग आहे. यावर आपल्या यशापयशाला न तोलता सातत्याने प्रयत्न केले तर यश मिळणारच. आपले काम बोलले पाहिजे. आपल्या संघर्षातून अमृता हाच संदेश आपल्याला देतात.

लेखक- अज्ञात

संपर्क : 9869990944

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!