स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
यशस्वी होणे हे ‘येऱ्यागबाळ्याचे काम नोहे’. तुमची स्वतःतील क्षमता याची
ओळख झाली पाहिजे. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो, स्वतःचे
नैसर्गिक गुण ओळखून आवडीच्या क्षेत्रात हनुमान उडी घ्या.
जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात प्रथम प्रत्येकाने ‘मी कोण आहे?’ हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येकाने सर्वप्रथम मनुष्यजन्म मिळाल्याबद्दल परमेश्वराचे तसेच जन्म दिल्याबद्दल मातापित्याचे ऋण व्यक्त केले पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीत, कोणत्या परिवारात जन्माला येतो, हे आपल्या हातात नसते. परंतु आपण काय म्हणून जगाचा निरोप घ्यावा, हे नक्कीच आपल्या हातात असते. यासाठी ‘Who am I? मी कोण आहे?’ हे कळणे महत्त्वाचे आहे.
रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मी कोण आहे, हा प्रश्न स्वतःला विचारून स्वतःच त्याचे उत्तर द्या. एकवीस दिवस असे नित्यनियमाने केल्यावर बाविसाव्या दिवशी तुम्हाला स्वतःलाच योग्य उत्तर मिळेल. ते उत्तर तुमच्या भावी यशाचा राजमार्ग खुला करेल. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…. या सद्गुरू वामनराव पै यांच्या वचनाची प्रचिती तुम्हाला नक्की येईल, असा मला विश्वास आहे.
तुम्ही जर सकारात्मक दृष्टीने विचार कराल आणि ठाम निर्धार कराल, तर स्वामी समर्थ तुम्हाला ‘यशस्वी भवा’ असा आशीर्वाद नक्कीच देतील. तुमची स्वतःची ताकद ओळखायला शिकले पाहिजे. यश हे कोणाही येऱ्यागबाळ्याला मिळत नाही. ते त्यांनाच मिळते, ज्यांना ते हवे असते. यासाठी तुम्हाला म्हणावे लागेल, चाहे जो कीमत अदा करनी पडे, वह कीमत मैं खुद अदा करूंगा, लेकिन सफलता पाकरही रहूँगा।
मुंगी व हत्ती
तुमची ताकद, तुमच्यातील क्षमता याची ओळख तुम्हाला झाली पाहिजे. पृथ्वीतलावर सर्वात छोटा प्राणी कोणता आहे, असे विचारले तर बहुतेकांचे उत्तर येईल की, ‘मुंगी.’ आणि सर्वात मोठा प्राणी कोण, तर ‘हत्ती.’ हत्ती भला मोठा, तर मुंगी अतिशय छोटी. प्रथम मुंगीचा विचार करू. मुंगी मुळातच अतिशय लहान असते. मग तिचे तोंड, नांगी किती छोटे असतील, याचा विचार करा. पण तीच मुंगी जर कडकडून चावली, तर आपण किमान दोन तास हैराण होतो. मुंगी व माणसाची तुलनाही होऊ शकत नाही. असे म्हणतात की, एका माणसाची ताकद एक लाख मुंग्यांइतकी असते. मला सांगा, एक मुंगी चावली, तर माणूस दोन तास परेशान होतो; जर एक लाख मुंग्या एकाचवेळी चावल्या तर माणसाची काय अवस्था होईल? फक्त लहान आहे, म्हणून मुंग्यांची ताकद कमी लेखून चालणार नाही. तसेच आपलेही आहे, आपली ताकद आपण स्वतःच जोखली पाहिजे.
परमेश्वराने आपल्याला हत्तीचे बळ दिलेले आहे. फक्त तो हत्ती सर्कसमधला की जंगलातला खुल्या वातावरणातला हा मुख्य प्रश्न आहे. सर्कसमधील हत्तीला एका छोट्या दोरखंडाने बांधलेले असते. तो त्या खुंटीभोवती फिरत राहतो. पण ताकद असूनही दोरखंड तोडण्याचा प्रयत्नही करत नाही. कारण सर्कसमधील
रिंगमास्टरने त्याला मारून मारून त्याच्या मनावर बिंबविले असते, हा दोरखंड आपल्याला तोडता येणार नाही. याउलट जंगलातला मुक्त असलेला हत्ती एकावेळी मोठमोठे वृक्ष उन्मळून काढू शकतो. कारण तो मुक्त संचार करीत असतो. त्याला त्याच्या अफाट ताकदीची कल्पना असते.
मनुष्यप्राण्याचे हत्तीसारखेच असते. तो जेव्हा जन्म घेतो, तेव्हा तो जंगलातील हत्तीप्रमाणे असतो. परमेश्वराने त्याला तेवढी बुद्धिमत्ता व ताकद दिलेली असते. या बुद्धिमत्तेच्या जोरावरच माणूस हत्ती, वाघ, सिंह अशा प्राण्यांनाही वश करू शकतो. त्यांना आपल्या तालावर नाचवू शकतो. परंतु माणूस जसजसा मोठा होत जातो, तसतसा सर्कशीतील हत्ती होतो. लोक त्याला तसे बनवितात. सतत नकारात्मक बोलून त्याला नाउमेद करतात. कालांतराने माणूसही स्वतःला कमजोर समजू लागतो. ‘आपल्याला हे जमणार नाही, ते करणे खूप अवघड आहे.’ अशी मानसिकता एकदा तयार झाल्यावर कोणीच काही करू शकत नाही. या जोखडातून मुक्त व्हायला पाहिजे. त्यासाठी एक करायचे… मोकळ्या जागेत जायचे व स्वतःलाच ओरडून सांगायचे, ‘माझ्यात हत्तीचे बळ आहे तेही जंगलातील हत्तीचे. मी मोठे स्वप्न पाहू शकतो व ते पूर्णही करू शकतो. इतकी अफाट शक्ती माझ्यात आहे.'” असे सलग एकवीस दिवस केल्यावर तुमच्यात झालेला बदल तुम्ही स्वतःच अनुभवाल.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
