स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल

स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल

गोष्ट विश्वासाची

आपल्या आयुष्यात विश्वास हाही एक महत्त्वाचा घटक असतो. तीन जिवलग मित्र होते. पहिला होता ज्ञान, दुसरा होता धन आणि तिसरा विश्वास. लहानपणापासून एकत्र असलेले हे तिघे मोठे झाल्यावर वेगवेगळ्या मार्गांनी जाऊ लागले. निरोप घेताना ते तिघे एकमेकांना म्हणाले, “आपण परत पुन्हा एकत्र येऊ शकतो का व एकत्र कुठे भेटणार?” ज्ञान म्हणाला, “मी शाळेत, मंदिरात, चर्च, गुरुद्वारा अशा विविध ठिकाणी असेन, तिथे आपण भेट्या.” धन म्हणाला, “मी श्रीमंत लोकांजवळ मोठ्या मोठ्या महालांमध्ये, बँकांमध्ये असेन, तिथे या.” तिसरा विश्वास होता, तो शांत होता. इतर दोघे त्याला म्हणाला, “तू का गप्प बसला आहेस? तू कुठे भेटशील?” त्यावर विश्वास म्हणाला, “मी एकदा गेलो की, परत येत नाही.” म्हणून मित्रांनो, ज्ञान, धन हे कधीही भेटू शकते, पण विश्वास कायम जपा. तो एकदा गेला की परत येत नाही. जीवनात तुमची खरी कमाई कोणती असेल, तर तुम्ही कमावलेला विश्वास. तोच तुमच्या कामास येतो.

नैसर्गिक गुण हीच मोठी संपत्ती

भारत हा बुद्धिवंतांचा देश म्हणून ओळखला जातो. जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय (मल्टिनॅशनल) कंपन्यांत सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) पदावर भारतीय किंवा भारतीय वंशांचे परदेशस्थ विराजमान असल्याचे सहज पाहायला मिळते. ही भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ही मंडळी या पदांवर पोहचली, याला कारण त्यांनी त्यांच्यात उपजत असलेल्या गुणांना, बुद्धीला वेळीच ओळखले. बरेच जण आपल्याला बुद्धी कमी आहे, असे मानूनच चालतात. बुद्धीचा वापरच करीत नाहीत व नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देतात. एका सर्वेक्षणात आढळून आले आहे की, ज्यांना आपण स्वतःपेक्षा बुद्धिमान मानतो, तेसुद्धा त्यांच्या एकूण बुद्धिमतेचा २५ टक्केच वापर करतात. मग सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल, हे लक्षात घ्या. ‘उघडा डोळे, बघा नीट’ ही एका वृत्तवाहिनीची टॅगलाईन मला खूप आवडते. फार मोठा संदेश आहे त्या एका ओळीत. आपण उघड्या डोळ्यांनी सगळे काही पाहतो, पण काय पाहतोय हे समजून घेत नाही. उलट बुद्धिमान लोक जे जे काही पाहतात, त्याचे बारकाईने निरीक्षण करतात, सुज्ञपणे निर्णय घेतात व यशस्वी वाटचाल करतात. बाकी सगळे डोळे असून आंधळे असेच राहतात. कारण बुद्धी वापरायचे कष्टच ते घेत नाहीत.

असे म्हणतात, ‘जिदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये.’ संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली व एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली, भगतसिंह वयाच्या तेविसाव्या वर्षी शहीद झाले, राणी लक्ष्मीबाई अठ्ठावीस वर्षे जगल्या, स्वामी विवेकानंद अवघे एकूणचाळीस वर्षे जगले, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवराय फक्त पन्नास वर्षांच्या आयुष्यात जागतिक कीर्ती मिळवून गेले आणि संत तुकाराम बावन्न वर्षे जगले, पण जगद्गुरू बनले. या सर्वांमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे अतिशय कमी वयात त्यांनी आपल्यातील नैसर्गिक गुण ओळखून, ध्येयनिश्चिती करून वाटचाल केली होती. त्यांच्या वयाचा वर्गमूळ झाला असेल, पण कार्याचा मात्र वर्ग झाला. चोवीस तास जगणाऱ्या बिनवासाच्या ‘तगर’ फुलांपेक्षा अल्पकाळच टिकणारी पण सुगंधाने परिसर प्रसन्न करणारी प्राजक्ताची फुले केव्हाही श्रेष्ठच !

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!