जिद्

जिद्

१००० × १०००… उद्योग यशाचा फॉर्म्युला

पराग व किशोर हे दोन वर्गमित्र होते. पराग अभ्यासात अत्यंत हुशार, तर किशोर रडतखडत काठावर पास होणारा. पराग उच्चशिक्षित होऊन प्रथम वर्गात मेकॅनिकल इंजिनिअर झाला. किशोर बारावीनंतर शिक्षण सोडून दुकानदारी करू लागला. पण तो मोठे स्वप्न पाहत होता. त्याने फॅब्रिकेशनचे एक छोटे युनिट सुरू केले. पराग मात्र एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला, पदोन्नती मिळवत थेट जनरल मॅनेजरच्या पदावर पोहचलो. गाडी, बंगला, बँक बॅलन्स बाळगून होता, तर दुसरीकडे छोटा व्यवसाय करणारा किशोर आपला जुन्या स्कुटरवरच फिरत होता. पराग नोकरीत असताना त्याला वाटू लागले की, आपण काम केल्यामुळेच कंपनी इतकी मोठी होते, मग आपण स्वतःच स्वतःचा व्यवसाय सुरू का करू नये? असा विचार करून त्याने नोकरी सोडली व व्यवसाय सुरू केला. पण एक-दोन वर्षातच त्याचा व्यवसाय बसला. तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने व्यवसाय कायमचा बंद करून पुन्हा नोकरीचा शोध सुरू केला. एके दिवशी त्याची व किशोरची गाठ पडली. परागचे बोलणे ऐकून किशोर त्याला त्याच्याच कंपनीत मॅनेजर म्हणून काम दिले. काही दिवसांनी पराग न राहून किशोरला विचारतो, मी कॉलेजमध्ये टॉपर होतो, गोल्ड मेडलिस्ट होतो. तू अभ्यासात एकदम ढ होतास. तरीही तू धंद्यात यशस्वी झाला, मी मात्र धंद्यात फेल का झालो. त्यावर किशोरने त्याला स्वतःच्या वडिलांनी दिलेला १००० × १००० हा फॉर्म्युला सांगितला. हा फॉर्म्युला लक्षात घेऊन मी करीत राहिलो व त्यामुळेच उद्योगात
मोठे यश मिळविल्याचे किशोरने सांगितले.

हा फॉर्म्युला काय आहे, हेसुद्धा किशोरने विश्लेषण करून सांगितले, बाळ जन्माला येते, तेव्हा ते खूप नाजूक असते. छोट्या व्हायरसनेही ते लगेच आजारी पडते. सर्दी, खोकला, ताप, थंडी हे आजार बाळाला सतत होतात. कारण त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्याला लगेच होते. मोठ्या माणसांची प्रतिकारशक्ती त्या बाळाच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे छोट्या छोट्या व्हायरसचा मोठ्यांवर परिणाम होत नाही. म्हणूनच जन्मल्यानंतर लहान बाळाला पहिले एक हजार दिवस खूप जपले जाते. एकदा ते एक हजार दिवसांचे झाले की ते पुढे १००० महिने म्हणजे ८४ वर्षे बिनधास्त जगू शकते. हाच नियम कोणत्याही व्यवसायालाही लागू होतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीचे १००० दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे आपण खूप काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आधी १०० दिवसांचे १० टप्पे करावे. प्रत्येक टप्प्यावर आधीपेक्षा थोडी तरी प्रगती झाली पाहिजे, असे बारीक नियोजन केले पाहिजे. त्यासाठी ‘चाहे जो कीमत अदा करना पड़े, वह कीमत मैं अदा करूंगा, लेकिन सफल बनकेही रहूंगा’, अशी मानसिकता हवी.

१०० दिवसांचे दहा टप्पे पार होईपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धार केला पाहिजे. एकदा हे टप्पे यशस्वीरीत्या पार केले की, पुढे १००० महिने म्हणजेच ८४ वर्षे, अगदी १०० वर्षेही व्यवसाय तेजीत राहतोच राहतो. यशस्वी व्यवसायाचा हा बेसिक फंडा आहे. परंतु जसे मुलगा मोठा झाल्यावर तो व्यसनी झाला, कुसंगतीमुळे बिघडला, तर तो ऐन तारुण्यातही जगाचा निरोप घेऊ शकतो. त्याचप्रमाणे काळजी घेऊन सेट झालेला व्यवसायही चुकीच्या गोष्टी केल्यास लयाला जाऊ शकतो. मालकाला व्यावसायिक यशाचा माज चढला, त्याने व्यावसायिक नीतिमत्ता, मूल्ये जपली नाहीत, तर व्यवसायाची अधोगती नक्कीच होते.

आपल्या गोष्टीतील पराग हुशार होताच. पण त्याला १००० १००० हा यशस्वितेचा फॉर्म्युला माहीत नव्हता किंवा त्याने तो पाळला नाही, म्हणून तो कर्जबाजारी होऊन व्यवसायात अपयशी ठरला. यानिमित्त मी माझे स्वतःचे अनुभवही आवर्जून सांगतो. नवीन सुरू झालेल्या व्यवसायांपैकी पन्नास टक्के व्यवसाय एक वर्षाच्या आत बंद पडतात. पुढील तीन वर्षांत उरलेल्या व्यवसायातील पन्नास टक्के बंद होतात. त्या पुढील दोन वर्षात राहिलेल्यापैकी पन्नास टक्के व्यवसाय बंद पडतात. बाकीचे दहा ते वीस टक्के व्यवसाय हे पिढ्यानपिढ्या यशस्वीपणे चालतात. म्हणून माझे सांगणे आहे की, तुम्हालाही व्यवसायात, धंद्यात यश मिळवायचे असेल; तर १००० x १००० हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तो आपल्या कामाच्या जागी, घरात बेडरूममध्ये मोठ्या बोर्डावर लिहून ठेवा. रोज त्याचे वाचन करा, मनाला सूचना देत रहा. तुम्ही आधीपासूनच व्यवसाय करीत असाल, तर व्यवसायाचा आजच जन्म झाला आहे, असे समजून या फॉर्म्युलानुसार नव्याने वाटचाल सुरू करा. असे केले, तर तुमचा व्यवसाय हा कायम टॉपवर चालेल, हा माझा विश्वास आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!