कष्टाळू धुमाळ
माझे वडील : ‘दादा’
माझ्या जडणघडणीत आजीआजोबांइतकाच आईवडिलांचाही मोठा प्रभाव राहिलेला आहे. माझे वडील बाबूराव धुमाळ, त्यांना आम्ही सर्व भावंडे ‘दादा’ म्हणत म्हणत असू. दादांचा स्वभाव अतिशय शांत व संयमी होता. कष्टाचे संस्कार व बाळकडू तर त्यांना आजोबांकडून मिळालेले. राव राब राबणे, काळ्या आईची सेवा करणे, काम, काम आणि काम यातच ते रमायचे. ‘कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी’ ही संत श्री सावता माळी यांची पंक्ती जागवत ते मन लावून काम करायचे. त्याकाळची ती गरजच होती. अतिशय काबाडकष्ट करून आजोबांना साथ देत त्यांनी सव्वाशे एकर जमीन घेतलेली होती. त्याकाळी शेती यांत्रिकीकरणापासून मैलोन्मैल लांब होती. अशा काळात एवढा मोठा पसारा सांभाळणे किती जिकिरीचे असेल हे लक्षात येते. पण आमचे दादा या आघाडीवर अतिशय मजबूत होते. नांगरणी, पेरणी, कोळपणी, मोटा हाकणे, पाणी देणे ही सर्व कामे दादा दोन-तीन सालदार, गड्यांना सोबत घेऊन करायचे. जमिनीचे मालक आहेत, म्हणून गड्यांकडून काम करवून घेणे व स्वतः ऐटीत उभे राहणे असे त्यांनी कधीच केले नाही. स्वतः राबलो, तर गडी राबतील. आपण जितके जास्त काम करू, तितकेच काम गडीही करतील असा त्यांचा विचार असायचा. ‘उंटावर बसून शेळ्या हाकणे’ हा प्रकार त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे ते स्वतः काळ्या मातीत घाम गाळत. एवढी मोठी जमीन असल्याने मशागतही तितकीच करावी लागायची. मला आजही आठवते… दादांचा एक शिरस्ता होता. दुपारी स्वतः जेवायला बसण्याअगोदर ते एका छोट्या मडक्यात मूठभर तांदूळ घेऊन त्यात पाणी टाकून मडके चुलीवर ठेवायचे. त्याचा
भात तयार झाल्यावर तो भात विहिरीतील माशांना खाऊ घालायचे. त्यानंतरच ते स्वतः जेवण करायचे. त्यांनी कधीही ताटात हात धुतला नाही. सर्व खाऊन झाल्यावर ते ताटात पाणी टाकून ते पीत व नंतर बाहेर जाऊन हात भूत असत. अनाचा एकही कण वाया गेला नाही पाहिजे, असे त्यांचे व्रतच होते. कारण अन्न कमावण्यासाठी, पिकविण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, याची त्यांच्याइतकी जणीव दुसऱ्या कोणालाच नसेल. दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी संत समर्थ रामदासांचे साहित्य कदाचित वाचले नसेल, परंतु समर्थांची आपण यथेच्छ जेवणे। उरले अन्न ते वाटणे।। पण टाकून देणे। हा धर्म नोहे।। ही उक्ती जीवनात उतरविली होती. जे अन्न मिळविण्यासाठी आपण राब राब राबतो, ते टाकून देणे अव्यवहार्य तर आहेच, शिवाय ते पापही आहे, याची दादांना पूर्ण कल्पना होती. सध्याच्या विवाहसमारंभ किंवा अन्य सोहळ्ळ्यांतून ‘बुफे’ जेवणाच्या माध्यमातून भोजनभाऊ जी अन्नाची नासाडी करतात, त्या भोजनभाऊंनी दादांचा हा कित्ता जरूर अंगी बाणवावा. दरवर्षी ते नवनवीन प्रकल्प राबवीत. विशेषतः पावसाळ्याव्यतिरिक्त पिके घेता यावीत, यासाठी पाण्याची सोय असली पाहिजे, यावर त्यांचा भर असायचा. त्यामुळे ते दरवर्षी नवीन लक्ष्य समोर ठेवायचे. यात नवीन विहीर खोदणे, विहीर चिऱ्यांनी बांधून काढणे, खडकात सुरुंगाचे बार उडवून जुनी विहीर आणखी खोल करणे, कधी शेतजमिनीचे सपाटीकरण करणे, कधी नवीन शेतजमीन घेणे. घरच्या पाण्यासाठी थेट नदीवर जावे लागायचे, म्हणून त्यांनी घरातच आड (विहीर) खोदले. ५ फूट रुंद व ४० फूट खोल विहीर (आड) त्यांनी खोदली होती. एवढ्यावरच न थांबता दगडी चिऱ्यांनी बांधूनही घेतली. याच काळात विहिरीतून पाणी काढण्यासाठी ऑईल इंजिन त्यांनी घेतले. त्यावेळी किलर्लोस्कर कंपनीचे ऑईल इंजिन प्रसिद्ध होते. अशी अनेक कामे ते अक्षरशः दिवसरात्र करायचे. घरासाठी माडी बांधायचे कामही त्यांनी केले आहे. मी लहानपणी पाहिले आहे, माझ्या दादांचा दिवस पहाटे तीनचार वाजताच सुरू व्हायचा. पहाटे उठून ते बैलांना पडकात (गवताचे शेत) घेऊन जायचे. त्यांना चारापाणी करायचे, तांबडे फुटण्याच्या वेळी (सूर्योदय) ते शेतात नांगरायचे, औत चालवायला सुरू करून ते परत गोठ्यात यायचे. गोठ्यात आमच्या गायी, म्हशी, शेळ्या बांधलेल्या असत. त्यांचे चारापाण्याचे पाहणे, दुभत्या जनावरांची धार काढणे अशी कामे ते भल्या सकाळीच उरकून घेत. आमच्याकडे ३०-४० शेळ्या, १५-२० गायी व ८ बैलजोड्या असा मोठा बैलबारदाना होता. जोडीला कोणत्याही शेतकऱ्याच्या दारात असतात तशी एक सोडून ३ कुत्रीही होती. ही जनावरे आमच्या कुटुंबाचाच एक भाग होती. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच या मुक्या जिवांना माझे दादा तसेच आमच्या घरचे सर्वच जीव लावायचे. शेतकऱ्याच्या दाराला जनावरांशिवाय शोभा नाही, असेच दादा म्हणायचे. हा प्रचंड असा व्याप दादा कसलीही कुरकुर, खळखळ न करता सांभाळायचे. खूप कष्ट करावे लागायचे. त्यांना अशी ढोरमेहनत करताना किती त्रास होत असेल, हे जसजसा मोठा होऊ लागलो तसतसे कळायला लागले. शेतकऱ्याचे जीवन पुस्तकात वाचून कधी समजत नाही, ते अनुभवानेच कळते असे मला वाटते. मी असे अफाट कष्ट करणारे आजोबा, वडील जवळून पाहिले आहेत. त्यातून खूप गोष्टी नकळत शिकत गेलो. ज्या मला माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात खूप कामी आल्या.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
