कार्यसंस्कृतीनेच यश मिळते
कार्यसंस्कृतीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. महात्मा गांधी म्हणायचे,
‘जो बदल तुम्हाला जगाकडून अपेक्षित आहे, त्याची सुरुवात
स्वतःपासून करा.’
मनुष्य आपल्या संपूर्ण जीवनात काही ना काही कार्य म्हणजे काम करीतच असतो. भगवद्गीतेतही कर्म म्हणजे कार्याला महत्त्व दिलेले आहे. आता काम तर सगळेच करतात. पण आपण काम कशासाठी करतो, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. काम केल्यावर आपल्याला फक्त पैसेच मिळतात का? नाही, त्यासोबत आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. चांगला, वाईट अनुभव मिळतो, आत्मसन्मान मिळतो, कामाचा आनंद मिळतो… यालाच ‘कार्यसंस्कृती’ म्हणतात.
कार्यसंस्कृतीचा नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल तर ‘७ क’ चा फॉर्म्युला समजून घ्यावा.
१. काय करावे, तर काम करावे २. का करायचे, तर कामातून मला अनुभवासह आत्मसन्मान व पैसा हवा आहे, ३. कसे करायचे, तर स्मार्ट वर्क करायचे, ४. कुठे करायचे, तर ठरवून दिलेल्या जागेत करायचे आहे, ५. कधी करायचे, तर दिलेल्या वेळेतच करायचे, ६. कोणासाठी करायचे, तर माझ्यासाठी, माझ्या कंपनीसाठी, कुटुंबासाठी, देशासाठी करायचे, ७. काय मिळणार, तर पैशासोबतच आनंद, अनुभव, आत्मसन्मान मिळणार आहे.
विसाव्या शतकातील लोक खऱ्या अर्थाने कार्यसंस्कृतीने काम करीत होते. आताच्या एकविसाव्या शतकात सगळेच बदलले आहे. आता फक्त आणि फक्त पैसा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले जाते. पैशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व दिलेच जात नाही. त्यामुळे कार्यसंस्कृतीचे पावित्र्य नष्ट होत आहे. एक मोठा डॉक्टर होता. त्याचा मोठा दवाखाना होता. परंतु तो पैसे मिळाल्याशिवाय रुग्णाला हातही लावत नसे. तशा सूचनाच त्याने आपल्या स्टाफला दिलेल्या होत्या. ‘आधी माल, मग उपचार’ असे त्याचे ब्रीदवाक्यच होते. एकदा रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका एका मुलाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात आणण्यात आले. अपघातग्रस्ताची प्रकृती अतिशय चिंताजनक नर्सने ते पाहिले आणि डॉक्टरांना फोन केला, “सर, मुलगा चांगल्या घरचा दिसतोय; पण त्याच्याकडे पाकीट, मोबाईल वगैरे काहीच नसल्याने त्च् चा पत्ता शोधणं, नातेवाईक लगेच सापडणं अशक्य आहे. त्यामुळे इतर गोष्टीत वेळ न घालविता त्याच्यावर लगेच उपचार सुरू केले पाहिजेत.” पण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले, “आधी पैशाची व्यवस्था होऊ द्या, मगच मी उपचार करेन.” तेवढ्यात एक माणूस दवाखान्यात आला. याच माणसाने त्या अपघातग्रस्ताला मुलाला मदत करीत रुग्णवाहिकेतून पुढे दवाखान्यात पाठविलेले होते. आल्यावर तो सांगू लागला, “तुम्ही आधी उपचार सुरू करा, वाटल्यास त्यासाठीचे पैसे मी देतो.” असे आश्वासन मिळाल्यावर डॉक्टर घरातून खाली आले. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत खूपच उशीर झालेला होता, तो मुलगा मरण पावलेला होता. एकदा त्या मृताचा चेहरा तरी पाहू या, या विचाराने डॉक्टरांनी मृताच्या अंगावरील कापड काढले, चेहरा पाहिला व मोठ्याने ओरडले, “राजू, तू हे काय केलंस?” कारण तो मृत त्या डॉक्टरचा एकुलता एक लाडाकोडात बाबविलेला मुलगा होता. या धक्क्यांमुळे स्वतः डॉक्टरही हार्ट अॅटॅक येऊन जागीच गतप्राण झाले. आता या सर्व गोष्टीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला, तर उत्तर एकच येते, आजच्या काळातील चुकीची कार्यसंस्कृती. डॉक्टरांना आपल्याकडे देवदूत मानतात. पण देवदूतच असा निष्टूर झाल्यावर असे जीव जाणारच…
असे असले, तरी आताच्या काळातही अनेक संस्था, उद्योजक उत्तम कार्यसंस्कृतीचे पालन करून यशस्वी होताना दिसतात. ‘झिरो टू हिरो’ असा अनेकांचा प्रवास होतो. आता अशा संस्था किया उद्योग यशस्वी का होतात, तर तिथे एक चांगली कार्यसंस्कृती असते. तिथे काम करणाऱ्यांमध्ये प्रेमाचे, स्नेहाचे, जिव्हाळ्याचे संबंध असतात. ही सर्व मंडळी नेहमी विन-विन सिच्युएशनमध्ये काम करून यशस्वी होतात. टाटा ग्रुप, इन्फोसिस, टोयोटा, फोर्ड, रिलायन्स अशा अनेक मोठ्या व नावाजलेल्या कंपन्यांत आदर्श कार्यसंस्कृती पाहायला मिळते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
