जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१६७३ साली फ्रेंच अॅबे कॅरेने महाराजांचे केलेले वर्णन, “महाराजांची बुद्धीमत्ता एवढ्या श्रेष्ठ प्रतीची आहे की, त्यांच्या बुद्धीला अनाकलनीय असे जगात काहीच नसेल. त्यांची कर्तृत्वशक्ती तर त्यांच्या बुद्धीमत्तेपेक्षाही वरचढ आहे. ते अतुलनीय पराक्रमी योद्धे आहेत, थोर मुत्सद्दी आहेत. वाटेल ती गोष्ट हाती घेण्याला आणि करुन दाखविण्याला समर्थ आहेत. महाराजांना दगदगीचे काहीच वाटत नाही. कार्यात विघ्ने आल्यास त्यांना विशेष अवसान चढते आणि कधी कधी तर कित्येक मोहिमा केवळ अवघड म्हणून अंगावर घेऊन त्यांनी पार पाडून दाखविल्या आहेत. स्वराज्य
संस्थापनेसाठी त्यांचा जन्म असल्यामुळे सेनापतीच्या अंगी कोणते गुण असावे लागतात. सैनिकाच्या ठिकाणी कोणते गुण असावे लागतात याचा त्यांनी बारकाईने विचार केलेला आहे. चांगल्या चांगल्या तज्ञांची अक्कल गुंग व्हावी एवढा त्यांनी गडाच्या तटबंदीचा अभ्यास केला आहे. भूगोलाचा त्यांचा विशेष व्यासंग आहे. देशातील केवळ लहान-मोठी शहरेच त्यांना माहित आहेत असे नव्हे तर प्रत्येक जागान् जागा व झुडुप न झुडुप त्यांना ठाऊक आहे. अशा सर्व मुलुखाचे त्यांनी नकाशे तयार केलेले आहेत.

त्यांच्या चपळतेचा वा दक्षतेचा शत्रूला ठाव लागणे कठीण असते. ते आज इथे असतील तर, उद्या उलट दिशेला दुसरीकडे लांब जातील. स्वतःच्या शौर्यावर व सैनिकांवर त्यांचा पूर्ण विश्वास असला तरी, संपूर्ण देशातील प्रत्येक राजाच्या दरबारात महाराजांचे गुप्त हेर आहेत. हेरांसाठी ते प्रचंड धन खर्च करतात,… आपल्या देशाला वैभवाच्या मार्गावर आणून सोडण्यासाठीच महाराजांचा अवतार आहे.”

महाराजांबाबतची ही माहिती अँबे कॅरेला एका मराठा सरदाराने दिली होती. ती त्याने व्यवस्थीत नोंद केली म्हणून आपल्याला मिळाली बरं!

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

error: Content is protected !!