महाराजांचे लष्कर व्यवस्थापन
मोहिम फत्ते केल्यावर त्याच ठिकाणी मिळालेल्या संपत्तीची मोजदाद केली जायची. आणि मोहोरबंद थैलीतून ती राजधानीत सरकारी तिजोरीत जमा करण्यासाठी पाठविली जायची. प्रत्येक गडावर एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची आणि तिघांचेही अधिकार समान. एकावाचून दुसऱ्याचे आणि दुसऱ्यावाचून तिसऱ्याचे आणि एकट्या कोणाचेही काहीच चालणार नाही अशी रचना केली त्यामुळे दांडगाई करणारा किंवा बेईमान होऊ इच्छिणारा अशा सर्वांनाच एकात एक गुंतवून महाराजांनी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य होऊ शकणाऱ्या कामांना
प्रतिबंध घातला.
त्याचवेळी जाती पातींना मुठमाती देत गुणवत्ता असणाऱ्या सर्वांना समान पातळीवर आणण्याचे सामाजिक समरसतेचे कामही केले. सबनीसपदी ब्राह्मण तर कारखानीसपदी प्रभु जातीचा आणि हवालदार मराठा अशी रचना किल्ल्यासाठी तर किल्लेदार पदी असणारा किल्लेदार यांचा नियंत्रक (कंट्रोलर) अशी रचना केली. सैन्यात कधीही गैरव्यवहार होऊ नये म्हणून सैन्य प्रमुख निराळा आणि सैन्याला लागणाऱ्या दारुगोळ्याचा पुरवठा करणारा (सप्लायर) निराळा, आणि त्याचा हिशोब ठेवण्यासाठी वेगळा अधिकारी (ऑडिटर) असे धोरण ठेवून सरकारी बारुद, हत्यारे, खाजगी कामासाठी वापरली जाणार नाही किंवा हलगर्जीपणा होणार नाही याचा पुरेपुर बंदोबस्त केला.
सैनिकांनी पोटासाठी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांना चांगले आणि वेळेवर
पगार व भत्ते दिले. सर्वसामान्य सैनिकाचा महिन्याचा पगार तीन होन तर मुजुमदाराचा
वार्षिक पगार १२५ होन तर सुभेदाराचा वार्षिक पगार ४०० होन असा असायचा.
भ्रष्टाचार जन्मालाच येणार नाही अशी यंत्रणा राबवून स्वराज्याचे प्रशासन भ्रष्टाचार मुक्त ठेवून आदर्श राज्यकारभारची जगासमोर एक चांगली संकल्पना मांडून ती यशस्वी करून दाखविली.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
