महाराजांचे लष्कर व्यवस्थापन
महाराजांच्या फौजेत असणाऱ्यांना त्यांची नीट माहिती कळू शकत नव्हती. तर गनिमाला ती कशी कळणार? आणि या गुप्तहेर खात्याच्या बातमीवरच महाराजांच्या मोहिमेचे नियोजन आणि यश अवलंबून असायचे. महाराज गुप्तहेर खात्याला भरपूर पगार देत असत. आणि योग्य महत्त्वाची बातमी देणाऱ्या हेराला मान-मरातबासह मोठे बक्षिस देऊन त्याचा गौरवही करत असत.
इतर कोणत्याही राजापेक्षा गुप्तहेरांना सर्वात जास्त आणि रोख पगार देणारी राज्यव्यवस्था म्हणजे स्वराज्य. त्याचवेळी खोटी, दिशाभूल करणारी बातमी देणाऱ्या हेराला कडक शिक्षेची तरतूद असायची. त्यामुळे खोटी, अर्धवट, दिशाभूल करणारी बातमी महाराजांना कधीच मिळत नव्हती. परंतु खरी माहिती टिपण्यासाठी महाराजांचे गुप्तहेर जीव धोक्यात घालूनही माहिती गोळा करीत असत. आणि महाराजांपर्यंत पोहचवित असत. महाराजांच्या हालचालींची एकही बातमी फुटली नाही. हे गुप्तहेर खात्याचे महाराजांवरील प्रेम आणि निष्ठा व्यक्त करते. त्याचवेळी महाराजांचे कठोर व्यवस्थापनही सिद्ध करते.
सैन्यात काम करणाऱ्या सर्व लोकांना रोख पगार, आणि तोही ठरलेल्या वेळीच होणार. सैनिकांना पगार मिळायला उशिर झाल्याची नोंद एकाही प्रसंगात होऊ शकली नाही. प्रत्येक महिन्याच्या एक किंवा तीन तारखेला तो रोख पगार दिला जायचा. मोहिमेवर असतांना सैनिकाला जर काही दुखापत झाली तर त्याचा सर्व खर्च सरकारातून केला जायचा. आणि कायमस्वरुपी अपंगत्व आले किंवा सैनिक मारला गेला तर त्याच्या कुटुंबाला आजीवन पेन्शनची व्यवस्था अधिक त्या घरातील मुलांचे शिक्षण आणि त्यांना सरकारी सेवेत सामील करणे अशी शेवट पर्यंतची जबाबदारी महाराज पालक या नात्याने पार पाडीत असायचे.
मोहिमेवर निघताना प्रत्येक सैनिकाकडे असलेल्या वस्तूची यादी केली जायची आणि मोहिम संपताना पुन्हा त्याची तपासणी करून त्याला मोकळे केले जायचे. मोहिमेतून मिळालेला माल सैनिकांनी लपवून नजरचुकीने किंवा लालचेने घरी जाऊ नये याची ती दक्षता. सैन्या अंतर्गत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महाराजांची खबरदारीची योजना आणि व्यक्तिगत लाभासाठी सैनिकांनी आगळीक करू नये म्हणून तयार केलेला हा शिरस्ता.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
