‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…
कर्नाटकातील भीमण्णा खंडरे यांचे आशीर्वाद
कर्नाटकातील बिदरच्या शाखा कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही माझ्या आठवणीत आहे. बिदरमधील बड़े राजकीय प्रस्थ असलेल्या भीमण्णा खंडरे यांना आम्ही या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. ते वीरशैव लिंगायत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते व जवळपास तीस वर्षे कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. भीमण्णा यांचे वय त्यावेळी पंच्याहत्तर वर्षांचे होते. त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारले, पण ‘जास्त वेळ थांबणार नाही’ असे सांगितले होते. आम्ही होकार दिला. नेहमीप्रमाणे आमचा तो कार्यक्रमही खुल्या मैदानात होता. जवळपास पंधरा ते वीस हजारांची गर्दी होती. भीमण्णा आले, त्यांनी एवढी प्रचंड गर्दी पाहिली. त्यांच्याच हस्ते आम्ही विमाधारकांच्या गोरगरीब वारसांना धनादेशाचे वितरण केले. त्यावेळी निर्माण झालेल्या भावनिक वातावरणामुळे भीमण्णा स्वतःही हळवे झाले. त्यांनी मला आधी भाषण करायला सांगितल. माझे भाषण झाल्यावर ते भाषणाला उभे राहिले. त्यांनी माझे, माझ्या कंपनीच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले, “गोरगरिबांना खऱ्या अर्थाने मदत
करण्याचं काम तुमची कंपनी करत आहे. आज जी गर्दी आहे, तशी गर्दी जमवायला आम्हा राजकारण्यांना किती परिश्रम ध्यावे लागतात, किती पैसे खर्च करावे लागतात.” हेसुद्धा त्यांनी प्रांजळपणे सांगितले, “धुमाळसाहेब, तुमचे विचार ऐकायला इतके लोक इथे पाणीही न पिता चार तास मांडी घालून बसतात हे सोपं नसते. धुमाळसाहेबांच्या रूपाने भगवान बसवेश्वरच तुमचं दुःख, पीडा दूर करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत।” असा गौरव त्यांनी केला. त्यांचे हे उद्गार माझ्यासाठी भारावून टाकणारे होते. इतकी मोठी दुवा करोडो रुपये खर्चुनही मिळाली नसती, ती मला माझ्या व्यवसायामुळे मिळाली. असे अनेक प्रसंग आहेत, ज्यांनी मला माझ्या कामाचा व्याप आणखी वाढविण्यासाठी बळ दिले.
मला आजही वाटते, माझ्या या यशात अशा दुवा, आशीर्वादांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या कंपनीने जवळपास सदतीस हजार कुटुंबांतील विझलेले दिवे पुन्हा प्रज्वलित केले. या वेळी माझ्या मनःपटलावरं
आशा रूठी ममता रूठी। रूठ गया है किनारा।
बंद करो मत द्वार दया का। दे दो कुछ तो सहारा।
दीप दया के जलाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो।
ज्योत से ज्योत जगाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो।।
‘संत ज्ञानेश्वर’ या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या या ओळी तरळून गेल्या. आपल्या हातून काही तरी चांगले घडते याबद्दल धन्यता वाटली. भारत सरकारच्या माध्यमातून सत्तेचाळीस करोड रुपये गरजवंतांपर्यंत पोहोचते केले. हताश, निराश, सर्वस्व गमावलेल्यांना जगण्याचा आधार दिला. या सर्व गोष्टीसाठी मी केवळ निमित्तमात्र ठरलो, असे मला आजही वाटते. कर्ताकरविता वर बसलेला जगाचा दाता आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
