४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
१. कंपनीचे ध्येय आणि वाटचाल अशी असली पाहिजे की मालक असो किंवा नसो कंपनी चालली पाहिजे.
मालक ह्या जगातअसले तरी कंपनी चालली पाहिजे आणि मालक ह्या जगात नसले तरी कंपनी त्याच वेगाने चालू राहिली पाहिजे. कंपनी सुरू करताना ती आपणाशिवाय चालेल अशी Process प्रक्रिया निर्माण करा. अशी यंत्रणा किंवा system बनवा की ती तुमच्याशिवाय चालू शकली पाहिजे. त्यासाठी लोकांना ध्येय सांगा. mission statement सांगा आणि ते ध्येय पूर्ण करणारा रस्ता सांगा. तुमच्या नंतरही तुमचे लोक त्या वाटेवरून चालत जातील आणि ते ध्येय प्राप्त करतील. शिवाजी महाराजांचे ध्येय होते ‘अहद तजांवर तहद पेशावर’ म्हणजे अखंड हिंदुस्थान हीच आपली स्वराज्याची सीमा असावी. त्यासाठी त्यांनी नियम बनविले. आणि आपल्या सहकारी आणि सैनिकांना ते अठरा नियम शिकविले. यात शिस्त पालनापासून ते युद्ध करणे, राज्यविस्तार करणे यासंबंधीचे सर्व नियम आहेत. अर्थात हे नियम दोन प्रकारात मोडतात
१) काय करावे २) काय टाळावे What is to be avoided
महाराजांनी जिजाऊसाहेबांनी शिकविलेल्या तत्त्वांच्या आधारे स्वराज्याचा विस्तार अत्यंत सावधपणे पार नाशिक पासून ते खाली गोव्यापर्यंत केला. समुद्रात काही किल्ले बांधले, आरमार उभे केले. दक्षिण दिग्विजय करून स्वराज्याची हद्द पार जिंजी तामीळनाडूपर्यंत नेली. महाराजांनी वयाच्या ४८व्या वर्षातच तजांवर पार केले. आता राहिले होते पेशावर. परंतु त्याअगोदरच महाराजांवर विषप्रयोग झाला आणि काम अपूर्ण राहिले. परंतु महाराजांनी घालून दिलेले नियम सोबत होते आणि ध्येय नजरेसमोर होते. तेव्हा मराठ्यांनी ह्या संधी आड येणारा औरंगजेब हा एकमेव काटा दूर केला. यासाठी तब्बल २७ वर्षे लागली. खरंतर मराठ्यांनी याला अंगावर न घेता कात्रजचा घाट दाखवत अख्खा हिंदुस्थान त्याच्या नजरेसमोरच जिंकला असता पण हा बाबा शिवाजी महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर स्वतःच इथे महाराष्ट्राच्या छातीवर संसार थाटून बसला. तेव्हा मग मराठ्यांना याला सरळ करत करत आपले ध्येय गाठावे लागले. शेवटी थकून हा बाबा १७०७ ला मेला आणि मग मराठ्यांचा राहिलेला स्वराज्य विस्तार पेशावरपर्यंत गेला. आणि अखंड हिंदुस्थान मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाखाली आला. दिल्लीवर भगवा मोठ्या हिंमतीने आणि दूरदृष्टीने डौलाने फडकू लागला. शिवाजी महाराजांनंतर ५० वर्षे लागली तिथपर्यंत पोहोचायला आणि मग १०० वर्षे स्वराज्य टिकले.
महाराजांनंतरही स्वराज्य लढले, टिकले आणि वाढले. मला सांगा जर महाराजांनी ध्येयाकडे जाणारी व्यवस्था बनवली नसती, नियम बनविले नसते तर हे ध्येय प्राप्त झाले असते का? तेव्हा तुम्ही सुद्धा असेच मोठे ध्येय ठेवा आणि ते प्राप्त करण्याच्या असा काही मार्ग बनवा आणि तो आपल्या सहकाऱ्यांना शिकवा की ते स्वतः प्रतीशिवाजी बनून लढत राहतील. पुढे जात राहतील आणि जिंकत राहतील. तेव्हा कंपनी चालविणे किंवा नेतृत्व करणे म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपला वारसा तयार करणे हा अर्थ आहे. तेव्हा success story तयार करायची असेल तर successor तयार करा
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
