७८.बचत आणि गुंतवणूक
उतार वयात मुलाबाळांवर इतर कोणावर अवलंबून राहायचे नसेल आणि 3 आपल्याला पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य हवे असेल, तर तरुणपणीच पैशाला कामाला लावा. म्हणजेच बचत आणि गुंतवणूक करा. नसता मरेपर्यंत तुम्हाला काम करावे लागेल. सर्वच श्रीमंत लोकांच्या यशामध्ये बचत आणि गुंतवणुकीचे महत्व अनन्यसाधारण असते. नासधूस कमी केली की बचत वाढते. तसेच वायफळ खर्च कमी केला, तरीही बचत वाढते. तुम्हाला १०,००० रुपये जरी पगार असला तरीही तुम्ही त्यामधून ५०० रुपये तरी बचत करा. फक्त बचत आणि गुंतवणुकीतून अरबपती कसे व्हावे? यासाठी वारेन बफे यांचे चरित्र वाचा. वारेन बफेचा, बचतीचा फॉर्म्युला असा आहे. उत्पन्न वजा गुंतवणूक बरोबर खर्च. परंतु सर्वसाधारण किंवा गरीब लोक उत्पन्नातून अगोदर खर्च करतात. म्हणून त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसेच उरत नाहीत. म्हणून ते कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत. म्हणून तुम्ही १०,००० कमवता का १० लाख हे महत्त्वाचे नसून, तुमच्या उत्पन्नातून तुम्ही बचत आणि गुंतवणूक किती आणि कुठे करता. यावरच तुमचे नेटवर्थ अवलंबून असते.
मी “rich dad poor dad’ हे पुस्तक वाचल्या नंतरच मला Assets & Liabilities चा खरा अर्थ समजला. पैशाचे व्यवस्थापन म्हणजे Money Management केल्याने श्रीमंत कसे होता येते?
बचतीमधून गुंतवणूक कुठे आणि कशी करावी. त्याचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे पैशाची शंभर टक्के सुरक्षितता आणि गॅरेटेड रिटर्न्स हवे
असतील तर तुम्ही बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवा. या एक डी मध्ये तुम्हाला एकरकमी पैसे गुंतवावे लागतात. तर बँकेच्या आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट मध्ये दर महिन्याला १०० रुपयापासून पुढे आणि ६ महिने ते १० वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मधील गुंतवणूक ही रिटायरमेंट प्लॅन असते. त्यामध्ये वार्षिक ५०० रुपया पासून पुढे गुंतवता येतात. त्यावर इन्कम टॅक्सच्या ८० सी या नियमानुसार इन्कम टॅक्स मधन सवलतही मिळते. एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम, ही सुद्धा रिटायरमेंट स्कीम आहे. यामध्ये ९ ते १०% व्याज आणि इन्कम टॅक्स मधून सूटही मिळते. आता सांगितलेल्या सर्व प्रकारांमध्ये पैसे बुडण्याची भीती शून्य असते. परंतु त्या मानाने व्याजदर कमी असतो.
आता गुंतवणुकीचा दुसरा प्रकार.. या मध्ये तुम्ही सोन्यात गुंतवणूक करा. मागील ३०-४० वर्षात सोन्याने खूप चांगला परतावा दिलेला आहे. त्यांनंतर रियल इस्टेट म्हणजे प्लॉट, जमीन, दुकान, ज्यामध्ये नफा नक्कीच होतो पण त्यासाठी एकरकमी मोठी रक्कम गुंतवावी लागते. त्यानंतरचा प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड यामध्ये तुम्ही एक रकमी किंवा महिन्याला ५०० रुपयांपासून पुढे गुंतवणूक करू शकता. आणि शेवटचा प्रकार म्हणजे शेअर मार्केट. यामध्ये सर्वात जास्त रिटर्न्स मिळतात. तुम्ही राकेश झुनझुनवाला, राधाकिसन दमानी यांची नावे ऐकलीच असतील. ते शेअर मार्केटच्या मधूनच अरबपती झाले. पण शेअर मार्केटमध्ये अनेक करोडपती सुद्धा कंगाल झालेले दिसतील. म्हणून म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही अभ्यास करून आणि जाणकाराच्या मदतीने करावी. म्हणजे तोटा होणार नाही. म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये ग्रोथ ऑप्शन आणि डेट फंड ऑप्शन असतात. ग्रोथ फंडात सर्वात जास्त रिस्क असते पण सर्वात जास्त पैसेही मिळू शकतात.
आणि डेट फंडामध्ये रिस्क कमी असते त्यामुळे त्यावर मिळणारे रिटर्नही थोडे कमी असतात. आर्थिक जाणकार सांगतात की तुमची सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका. Don’t put all your eggs in a single basket.’ ग्रोथ आणि डेट फंडात किती प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी एक फॉर्म्युला असतो तो म्हणजे १०० वजा तुमचे वय बरोबर ग्रोथ फंड आणि सर्वात महत्वाचे गुंतवणूक ही कर्ज घेऊन कधीच करू नका.
आता तुम्हाला मी बचतीचा खूपच महत्त्वाचा ‘चार वा’ चा फार्म्युला सांगत आहे. पहिला वाः म्हणजे वाचवा म्हणजे काटकसर करा, बचत करा. दुसरा वा म्हणजे वाढवा म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तिसरा वा म्हणजे वापरा वाढविलेले पैसे स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी खर्च करा. आणि चौथा वा म्हणजे वाटा दानधर्म करा, गरीब अंध, होतकरू विद्यार्थ्यांना मदत करा. ज्यामधून तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळेल.
माझ्या एकंदरीत संपत्तीमध्ये ३० टक्के वाटा फक्त बचतीतून गुंतवणुकीचा आहे. म्हणूनच मी मागील पाच वर्षांपासून माझ्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हॉटेल सुवर्णम प्राईड येथे अन्नछत्र चालवीत आहे. तेथे दररोज २०० लोकांना मोफत जेवण देत आहे. कोरोना काळात नगर शहरात पन्नास हजार जेवणाचे डबे मोफत पुरवले. आता हॉटेल सुवर्णम रेसिडेन्सीमधून फक्त ५०० रुपयांत गरिबांची राहण्याची सोय केली आहे. तसेच माझ्या एन.बी. धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब, हुशार व होतकरू मुलांना दत्तक घेऊन त्यांना उद्योजक बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.\
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
