व्यवस्थापन एक कला

व्यवस्थापन एक कला

मेरी पारकर, फेलोट, हेरॉल्ड, कुन्टझ आदि मान्यवरांनी व्यवस्थापनाची केलेली व्याख्या व्यवस्थापन म्हणजे एक कला आहे असे स्पष्ट करणारी आहे. “Management is art of getting things done through people.” आता कला म्हणजे काय हे पाहू. नाविण्यपूर्ण कृती करण्याचे एखाद्याचे कौशल्य

ज्यामध्ये त्याची बुद्धीमत्ता वापरली जाऊन विशिष्ट कार्य पूर्ण करुन एक निश्चित ध्येय पूर्ण केले जाते आणि ही कला काही सगळ्यांकडे नसते. ती जन्मजात तसेच अभिजात असते. परंतु एखाद्याला जन्मताच ती कला जरी अवगत नसेल तरी त्याला ती प्रयत्नातून, सरावातून शिकता येऊन उपयोगात आणता येऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापन अमूक एकाचाच वारसा असू शकत नाही आणि मेहनती प्रयत्नवादी सराव करणारा या कलेपासून वंचित राहू शकत नाही अशीच एक कला आणि ती कला जगाच्या पाठीवर अत्यंत उत्कृष्ठपणे ज्यांना जमली ते म्हणजे शिवाजी महाराज आणि ज्यांनी महाराजांच्या नेतृत्वात ती कला आत्मसात करुन शिकून जगाला तोंडात बोटे घालायला लावले ते कलाकार हरहुन्नरी माणसं म्हणजे महाराजांचे मावळे. उदा. शिवा काशीदने महाराज असण्याचेच वठविलेलं नाटक आणि पन्हाळ्यातून महाराजांची सूटका मोठ्या कलेचं हे मोठं नेमकं उदाहरण आपणा सर्वांच्या परिचयाचे परंतु डोळस माणसाला आरसा दाखविण्यासारखे.

आता व्यवस्थापन कला का म्हणून म्हणायचे तर त्याची कारणे खालीलप्रमाणे

१. Innovative नाविण्यता

व्यवस्थापन करताना नेहमी काहीतरी नाविण्यतेचा उपयोग केला जातो. व्यवस्थापन करणाराला नेहमी प्रश्न सोडविण्यासाठी नवीन नवीन युक्त्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. नवीन प्रश्न, नवीन उत्तरे, नवीन अडचण नवीन मार्ग, नवीन संकट तर नवीन समाधान, शिवाय एकच निर्णय प्रत्येक परिस्थितीला प्रसंगाला जसाच्या तसा लागू पडत नसल्यामुळे नवीन नवीन पर्याय उपाय समाधान हे शोधावे लागत असल्यामुळे ही एक कलाच म्हटली पाहिजे.

आणखी दुसरे कारण म्हणजे एका विशिष्ट समस्येचे, प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या माणसाकडे वेगवेगळे असू शकते. आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तसे ही वेगवेगळी उत्तरे म्हणजे प्रत्येकाची आपापल्या बुद्धीमत्तेनुसार योजलेली कलाच आहे.शिवाय तोच माणूस तोच निर्णय, प्रक्रिया पुन्हा तशीच परिस्थिती असताना घेईलच याचा काही नेम नाही. तो त्याच परिस्थितीत एखादा वेगळा निर्णयही घेऊ शकतो. म्हणजे आपली चलाखी दाखवू शकतो ही एक कला नाहीतर काय म्हणावी लागेल. म्हणजेच काय तर व्यवस्थापनात कॉपी करायला जागाच नाही. कारण ती एक कला असून व्यक्ती ते व्यक्ती, स्थळ ते स्थळ आणि काळानुसार बदलत राहणारी अशीच आहे. महाराजांनी प्रत्येक वेळा नवीनच क्लुप्त्या वापरुन यश मिळविलेले आहे आणि कोणताही निर्णय रिपीट केलेला नाही. अफजलखान वध, लाल महाल छापा, आग्रा सुटका, पन्हाळ्यातून सुटका, सुरत, कारवार, बुऱ्हाणपूर मोहीम.

२. Individual Approach: व्यक्तीगत दृष्टीकोन

व्यवस्थापन करणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वतःचा असा वेगळा दृष्टीकोन असू शकतो. प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी असू शकते त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःचीच स्टाईल वापरलेली बरी. दुसरा तसे करतो म्हणून मी तसे करायला गेलो तर गुजराती म्हण येथे तंतोतंत लागू पडते ती अशी, ज्याने काम त्यानो करो दुजा करे सो गोता खाय. म्हणजे काय तर दुसऱ्याची पद्धत आपण वापरायला गेलो तर तोंडावर आपटण्याची किंवा बुडण्याची वेळ येणारच ना! त्यामुळे दिलेल्या परिस्थितीत हाताशी असलेल्या त्याच साधन सामग्री वातावरण एकच असताना काही लोक लवकर काम करतील तर काही उशीरा काम करु शकतील कारण तो प्रत्येकाच्या कौशल्याचा भाग असतो.

३. Application and Dedication मन आणि मेंदू दोन्हीचा उपयोग करणे म्हणजे काय तर Mind Application and Intelligence चे हे दोन्ही घटक एकाच वेळी कामात आणणे. थोडक्यात काय तर ज्याला कोणाला उत्तम व्यवस्थापक व्हायचे आहे त्याच्याकडे फक्त कौशल्य आणि ज्ञान असून उपयोग नाही तर त्याने Discipline (शिस्त), Dedication (समर्पण), Commitment (बांधलिकी) हे गुण सुद्धा आत्मसात करुन घेतले पाहिजेत.

शिवाजी महाराजांवर आयुष्यात कितीतरी जीवघेणी संकटे आली तरी त्यांनी शिस्त संयम सोडला नाही की स्वराज्य निर्मीती बद्दलची आपली बांधिलकीही सोडली नाही आणि रयतेच्या कल्याणासाठी महाराज समर्पणाच्या भूमिकेतूनच आयुष्यभर कार्यरत राहिले आहेत. म्हणून शिवाजी महाराज म्हणजे निश्चय, बांधिलकी आणि समर्पणया व्यवस्थापनेच्या तीन तत्त्वांचा सुरेख संगम असून ज्यामुळे रयत कल्याणकारी राज्य त्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही फक्त ३५ वर्षात निर्माण करता आले. त्यामुळे महाराज किंवा एखाद्या व्यवस्थापक यांचे यश म्हणजे काय तर Knowledge, Intelligence and dedication म्हणजेच समर्पण होय. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा आपण मन आणि मेंदू एकत्र करुन काम करतो तेव्हाच यशस्वी होतो. टंगळमंगळ काम तर अघळपघळ निकाल लागणारच. काम जेवढे बिनचूक निकाल तेवढा अचूक त्यासाठी आपल्या भाषेत सांगायचे तर तनमन से काम करणे होय. धन नंतर आपोआप येणारच.

४. Result oriented निकालावर आधारीत

प्रत्येक यशस्वी व्यवस्थापक हा निकालावर आधारीत जी गुणवत्ता सिद्ध होते त्या मापदंडावरच मोजला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापनाचे काम हे practical आणि Action based असेच आहे. बोलबच्चन लोकांचे हे कामच नव्हे. संत तुकाराम महाराज म्हणतात तसे येथे पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजेच काय तर रिझल्ट देऊ शकणारे, वांझोटे नकोत. आपण किती काम केले हे महत्वाचे नसून निकाल फलश्रृती काय दिली हेच महत्वाचे असते. फक्त मी एवढा अभ्यास केला, असा केला, तसा केला हे सांगून प्रश्न संपत नाही फलश्रुती काय यावर सगळे कळतेच ना की काय दिवे लागले आणि किती पणती विझल्या त्या. त्यामुळे कामाचा दिखावा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचा नसून फलश्रुती महत्वाची आहे. महाराजांनी आग्र्यातून सुटका करुन घेण्यासाठी काय काय उद्योग भानगडी केल्या यापेक्षा त्यांनी यशस्वीपणे सुटका करुन घेतली ही फलश्रुती महत्वाची आहे.

हेच पन्हाळा किल्ला वेढला तेव्हाही सिद्ध झाले. महाराजांनी नानाविध प्रयोग केले आणि अखेर वेढ्यातून सुटका करुन घेतली याला म्हणतात Result oriented काम. महाराज सुरतेत जाऊन मोकळ्या हातांनी परत आले नाहीत किंवा बसरुर, कारंजा, बुन्हाणपूर येथूनही भरल्या हातांनी करोडो होनांची दौलत घेऊनच आले. हा झाला Result. त्यासाठी फौज किती कशी कोणत्या मार्गाने नेली हे एवढे महत्वाचे ठरत नाही. जेव्हा त्यांनी निकाल स्पष्ट लावलेला दिसताना बाकी मोगलांच्या मोहिमा म्हणजे Result oriented ची जागोजागी आणि पावलोपावली नुकसानीचे नमूने.

आता एखाद्याची फलश्रुती कशात मोजायची हा प्रश्न तुम्हाला पडला तर त्याचे उत्तर खालीलप्रमाणे :Higher productivity वाढलेली उत्पादन क्षमता, Better Relation चांगले संबंध, Disciplined work force शिस्तबद्ध काम करणारी माणसे किंवा माणसांची काम करण्याची शिस्तबद्धता good working condition

काम करण्यासाठी चांगली वातावरण निर्मीती Increase in profit आर्थिक लाभात वाढ Reduction in Absenteeism लोकांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे Reduction in wastage वस्तूची नुकसानी कमी होणे.

महाराजांच्या लोकांची वाढलेली उत्पादन क्षमता पहा. ३०० लोकांनी ५००० शत्रूना ८ तास घोडखिंडीत रोखून धरले. चांगले संबंध पहा. एकाही माणसाने मरेपर्यंत खिंड सोडण्याची इच्छा प्रकट केली नाही. मरणापेक्षा स्वराज्याची बांधिलकी मोठी मानली.

शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत पहायची तर पहा. महाराज आग्र्यातून २६०००० फौजेच्या गराड्यातून सुटले आणि औरंगजेबाला काहीच करता आले नाही. महाराजांचा एकही माणूस पकडण्यात यश आले नाही. ३००० लोक अचानक शत्रूच्या राजधानीतून काय रातोरात गायब होतात का ? नाही तर मग काय तर शिस्त बद्ध काम करण्याची महाराजांच्या माणसांची महाराजांची कला.

काम करण्यासाठी चांगली वातावरण निर्माती पहा. दोन स्वारामागे तीन घोडी म्हणजे एक घोडं प्रवासानं थकलं तर दुसरे वापरता येईल किंवा छापा टाकण्याच्या वेळी माल वाहायच्या कामी येईल अशी व्यवस्था. मोहिमेला जातानाच सैनिकांना चार महिन्यांचा Advance पगार आणि एखादा मावळा शहीद झालाच तर त्यांच्या कुटूंबाची कायम स्वरुपी केलेली व्यवस्था. स्वतःची ऐपत नसलेल्या मावळ्यांना सरकारातून घोडा, कपडे, शत्र आणि धान्य सुद्धा देणे.

आर्थिक लाभात वाढ पहा जिवंत उदाहरणे. १६५५ जुन्नरवर छापा ३ लाखांची कमाई, १६५६ जावळी ताब्यात ७ लाखांची कमाई, १६५९ प्रतापगडची लढाई १० लाखांची कमाई. १६६३ सुरतेवर छापा २ कोटी रुपयांची कमाई. १६७६ दक्षिण दिग्वीजय ४ कोटी रुपयांची कमाई.

गैरहजेरीचे प्रमाण कमी होणे बघा. महाराजांच्या व्यवस्थापनात गैरहजेरी, न सांगता विनाकारण दांडी हा प्रकारच नव्हता बरं. उत्तम व्यवस्थापनाचे आणखी कायज्वलंत उदाहरण असावे. साधन सामग्रीची नुकसानी कमी होणे किंवा करणे. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनात साधन सामग्रीचे नुकसान हा प्रकारच पहायला मिळत नसताना नुकसान कमी करण्याचा प्रश्नच येतो कुठे ?

५. Initiative : पुढाकार घेणे. अर्थात नवीन गोष्ट करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि ते काम म्हणजे Doing the right things right at the right time and right place योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य काम करणे हे जसे स्वतःच्या बाबतीत तसेच उत्तम व्यवस्थापकाने आपल्या सहकाऱ्यांनाही या प्रक्रियेत येण्यासाठी Initiative घेण्यासाठी प्रवृत्त करणे फायदेशीर असते त्यामुळे संस्थेची ध्येय आणि धोरणे प्रभावीपणे अंमलात आणता येतात. उदा. महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडताना शिवा काशीदच्या ऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर काय झाले असते ? प्रतापगडच्या प्रसंगी जीवा महाले ऐवजी दुसऱ्या माणसाला जबाबदारी दिली असती तर ? आग्र्यातून सुटताना हिरोजी फर्जद ऐवजी दुसरा माणूस निवडला असता तर ? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच येईल महाराज पुढे आपल्याला पहायला मिळाले नसते. महाराजांचे जीवन तेथेच संपले असते. परंतु तसे झाले नाही कारण महाराजांनी येथे ही कला अंमलात आणली. योग्य कल्पना राबवली आणि ती म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य माणूस निवडला.

महाराजांनी पुढाकार घ्यायला मावळ्यांना नेहमी संधी दिली त्यामुळे स्वराज्य एवढ्या कमी वेळेत एवढे पुढे आले. पाच प्रस्थापित शाह्यांना आव्हान देत उभे राहिले, स्थिर झाले.६. Intelligence : बुद्धीमत्ता

यशस्वी व्यवस्थापक हे बुद्धीमान असतात हे काय वेगळे सांगायला हवे का ? Successful people are Intelligent म्हणा किंवा Intelligent people are successful म्हणा दोघांचा अर्थ एकच. दोन्ही गोष्टी म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू यशस्वी माणसं बुद्धीमान असतात तसेच बुद्धीमान माणसेच यशस्वी होतात हेच ते तत्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सिद्ध केले म्हणूनच तर वयाच्या १५ वर्षी ३६००० उत्पन्न असणाऱ्या महाराजांनी वयाच्या ४५ व्या वर्षी ४ कोटीचे वार्षिक उत्पन्न घेतले. आजच्या किंमतीनुसार हे उत्पन्न होते जवळपास दोन लाख कोटी रुपये वार्षिक. त्यामुळेच स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर महाराज पाच प्रस्थापित शाह्यांना प्रतिस्पर्थ्यांना पालथे घालत स्वराज्य निर्माण करु शकले.

आता व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून माणूस बुद्धीमान असणे म्हणजे काय ते बघू. व्यवस्थापनातील बुद्धीमान माणूस चार प्रकारची बुद्धीमत्ता बाळगतो.

A) Mental intelligence मानसिक बुद्धीमत्ता

आपल्या भाषेत धैर्य, पराभवात, संकटात मात करण्याची माणसाची एकमेव शक्ती म्हणजे मानसिक संतुलन ढळू न देण्याची क्षमता थोडक्यात काय तर भावनिक न होता व्यवहारवादी दृष्टीकोन ठेवणे म्हणजे Mental intelligence होय. भोळी माणसे भावनेच्या आहारी जातात तर बुद्धीमान माणसे बुद्धीच्या आधाराने काम करतात. भोळी माणसे बावळट सिद्ध होण्यास वेळ लागत नसतो आणि व्यवहारवादी दृष्टीकोनातून काम करणारा माणूस पराभूत होत नसतो. महाभारताच्या प्रसंगी जेव्हा अर्जुन या द्वंदात (Dilemma) सापडला तेव्हा त्याला मानसिक बुद्धीमत्ता म्हणजे काय हे श्रीकृष्णाने सांगितले. नाहीतर सर्व श्रेष्ठ धनुर्धर बावळट ठरायला वेळ लागला नसता. महाराजांनी आयुष्यात कधीच भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या भरात काम केलेले नाही. नाहीतर पाहुणा म्हणून गेले आणि चार महिने कैद झाले. असा प्रसंग सामान्य माणसावर कोसळला तर तो एकच काम करेल आणि तो सोपा भावनिक मार्ग म्हणजे आत्महत्या करणे. महाराजांची निर्धार क्षमता किंवा व्यवहारीक बुद्धीमत्ता येथे सिद्ध करताना दिसतात तशी ती अनेक प्रसंगातून त्यांनी वेळोवेळी दाखविलेली आहे. सविस्तर पुढे पाहूच.

B) Social Intelligence : सामाजिक बुद्धीमत्ता समाजाच्या देशाच्या चालीरीती परंपरा यांचा अभ्यास आणि त्याचा आपल्या

व्यवस्थापनात उपयोग करणं म्हणजे सामाजिक, बुद्धीमत्ता. सामाजिक बुद्धीमत्ता नसेल तर समाजाचा देशाचा आपणाला पाठींबा मिळणे शक्य नाही आणि असा पाठींबा जेवढा कमी तेवढी आपली वाटचाल अवघड होते. त्यामुळे समाजाचा पाठींबा मिळावा हे कार्य ईश्वरी आहे, राष्ट्रीय आहे ही भावना मरगळलेल्या लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच महाराज नेहमी हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा म्हणत असावेत आणि याचाच एक भाग म्हणजे तुळजा भवानी देवी नेहमी महाराजांना स्वप्नात येऊन दृष्टांत देत असे. जिथे स्वप्नच खोटी असतात तिथे दृष्टांत किती खरे मानावे. परंतु महाराजांचे स्वप्नही लोकांनी खरे मानले हा लोकांच्या परंपरेचा महाराजांनी केलेला अभ्यास याचा परिणाम होय.

C) Interpersonal intelligence: अंतर व्यक्ती बुद्धीमत्ता उत्तम माणसाने स्वतः बुद्धीमान राहून फक्त चालत नाही. तर त्याने बुद्धीमान

लोकांचा शोध घेऊन आपल्या सोबत घेण्याची बुद्धीमत्ता. बुद्धीमान लोक शोधण्याची बुद्धीमत्ता म्हणजे Interpersonal intelligence असं म्हणतात की बुद्धीमान लोक आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान लोक कामाला ठेवतात ते हे असे. उदा. एखादा उद्योगपती आपल्यापेक्षा जास्त अक्कलवान माणसाला व्यवस्थापक बनवतो आणि त्याच्याकडून सगळा कार्यभार संपन्न करुन होतो. मग आता सांगा खरा शहाणा कोण ? आणि मोठा शहाणा कोण? खरा शहाणा व्यवस्थापक तर मोठा शहाणा उद्योजक. म्हणून तर उद्योजक नेहमी व्यवस्थापकांपेक्षा जास्त श्रीमंत आणि यशस्वी असतो. कारण तो आपल्यापेक्षा जास्त सुशिक्षित क्वाली फाईड बुद्धीमान माणसे पैशासाठी कामाला ठेवतो. म्हणतात ना व्यवस्थापक पैशासाठी काम करतो आणि बुद्धीमान माणूस उद्योगपती पैशाने काम करतो.

Managers work for money and Intelligent people like businessmen keep the managers with the money as payment, for payment.

श्रीमंत माणसाला शहाण्या माणसाकडे जावे लागते असं नाही तर बऱ्याच वेळा शहाण्या माणसाला श्रीमंत माणसाकडे हात पसरुन जावे लागते कारण Inter-personal intelligence बुद्धीमान माणसे आपल्याकडे पगाराने कामाला ठेवण्याचं त्या बुद्धीमान माणसाचं कौशल्य.C) Emotional intelligence भावनिक बुद्धीमत्ता

जेव्हा Mental आणि Emotional intelligence हे शब्द एकाच वेळी येतात तेव्हा आपण मेंटल चा अर्थ वैचारिक असाच घेणे उचित होईल. फरक करायचाच तर एवढाच करता येईल की जेथे वैचारिक बुद्धीमत्ता संपते तेथे भावनिक बुद्धीमत्ता सुरु होते. खरे तर भावनिक न होणे हीच खरी बुद्धीमत्ता आहे. एका हुशार व्यवस्थापकाला Mental आणि Emotional अशा आघाड्यावर आपली बुद्धीमत्ता दाखवावी लागते नाहीतर त्याची अक्कल हुशारी मातीत जायला वेळ लागत नाही. अर्थात माणूस वैचारीक आणि भावनिक पातळीवर बुद्धीमत्ता राखतो, दाखवतो तेव्हा आपोआपच एक गोष्ट घडून येते आणि ती म्हणजे त्याचे सहकारी त्याचा आदर करु लागतात. त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांची गुणवत्ता वाढीस लागते. उदा, छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडच्या युद्धाच्या वेळी सईबाई आजारी असताना सुद्धा अगदी मरणाच्या दारात असताना सुद्धा वैचारिक पातळीवर ढळले नाहीत. किंवा भावनिक झाले नाहीत. याचा पुढील आशय म्हणजे सहकाऱ्यांना जी प्रेरणा मिळाली त्यातूनच तानाजी मालुसरे म्हणाला आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. याला म्हणतात सहकाऱ्यांची Emotional intelligence वाढविण्याचे कसब आणि तेच तानाजीच्या मृत्यूनंतर सूर्याजी मावळ्यांना सांगतो युद्धातून पळून जाऊन कड्यावरुन उड्या टाकून फुकट मरण्यापेक्षा शौर्याने लढा. आणि भावनिक झालेले मावळे पुन्हा Emotional intelligence वर आणून निर्णायक विजय मिळवून कोंढाणा जिंकला.

काही लोकांच्या मते व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे हरकत नाही. व्यवस्थापनाला कोणी कला म्हणू की शास्त्र त्याने काही फरक पडत नाही. शेवटी काय तर व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनच. तर आता शास्त्र कशाला म्हणतात ते पाहू.

Science is a systematic body of knowledge which is universally accepted.

शास्त्र म्हणजे ज्ञानाची व्यवस्थीत अभ्यास करणारी पद्धत जी जगाला मान्य आहे. जगात व्यवस्थापनाला शान्त्र संबोधणारा पहिला माणूस म्हणजे F. W. Taylor. यांच्या मताप्रमाणे व्यवस्थापन शास्त्राने आपला व्यवसाय काही निर्धारीत मानांकनाच्या आधारेच चालवावा. म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय चालवला जावा अशी ती रास्त अपेक्षा.आता या शास्राचेही दोन भाग पडतात ते खालीलप्रमाणे :

A. Physical science भौतिक शास्त्र

B. Social science सामाजिक शास्त्र

A. Physical science भौतिक शास्र

यामध्ये भौतिक रासायनिक गणित अशा अचूकपणे निर्णय देणाऱ्या शास्त्राचा समावेश होतो जे Accurate म्हणजे अचूक असते ते भौतिक शास्त्र आणि जे चुकू शकते ते सामाजिक शास्त्र अशी थोडक्यात आपणाला विभागणी करता येईल.

B. Social science सामाजिक शास्त्र

व्यवस्थापनाला समाज शास्त्र म्हणायचे कारण याचा माणसांशी संबंध येतो आणि हे शास्त्र बिनचूक का म्हणता येत नाही तर त्याचे कारण असे की माणसांचा स्वभावच चंचल असेल तर त्याचे निर्णय कसे एकच किंवा बिनचूक येऊ शकतील. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे जगातील सर्व माणसे एकाच पद्धतीने वागतील असा काही नियम नाही. त्यामुळे समाज शास्र बिनचूक म्हणता येणार नाही. जेथे माणसांच्या भविष्यातील वर्तुणुकीचा अंदाजच लागत नाही तेव्हा त्यांच्या कार्याबद्दल निष्कर्ष आणि तेही अचूकपणे कशातून आणि कसे काढावे ? त्यामुळे Decisions taken in management may just be one way of doing things in an given situation and not the only way of doing things.

आता व्यवस्थापनाला काही तज्ञ मंडळी शास्र का म्हणतात ती कारणे ही पाहून घेऊ म्हणजे आपल्यालाही ते बऱ्यापैकी कळून येईल. व्यवस्थापनाला शास्त्र म्हणण्याची काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे

१ . Systematic decision making शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याची पद्धत. म्हणजे काय तर व्यवस्थापनाने कोणताही निर्णय घेताना तो शिस्तबद्ध किंवा व्यवस्थीत पद्धतीने घेणे अपेक्षित असते आणि यासाठी व्यवस्थापकाने योग्य माहिती योग्य यंत्रणेद्वारे योग्य वेळेत मिळविली पाहिजे. Right information from the right source at the right time. शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचे तर तुमचे गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम असले पाहीजे. जेणेकरुन तुम्हाला काय निर्णय घ्यायचा कधी घ्यायचा कसा घ्यायचा. याबाबत निकाल लावण्यासाठी योग्य माहिती योग्य माध्यमातून योग्य वेळी मिळाली पाहीजे. उशीरा आलेली माहिती, अपूर्ण माहिती सगळेनियोजन बिघडवू शकते आणि पर्यायाने निर्णयच चुकू शकतो. त्यामुळे माहिती ती ही Reliable source मधून Reliable अशी मिळून ती Relevent time म्हणजे वेळेत मिळवावी लागते. म्हणूनच महाराजांनी असा नियम केला होता की अपूर्ण अर्धवट चुकीची माहिती देणाऱ्या गुप्तहेराला एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यूदंड. Death penalty महाराजांनी थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कानून राबविला. यावरुन स्पष्ट होते की महाराज राज्य चालवताना व्यवस्थापन करताना योग्य माहिती योग्य माध्यमातून योग्य वेळेला पोहचण्यासंबधीच्या गोष्टीला किती गांभिर्याने घेत होते.

त्यामुळे योग्य ती माहिती मिळविणे, त्या माहितीचे योग्य पद्धतीने विश्लेषण करुन ती व्यवस्थीतपणे नियोजनाच्या कामी लावणे हे खूप महत्वाचे आणि अवघड असे काम आहे. जे फक्त कुशल व्यवस्थापकच करु शकतो. त्यामुळे अशी गोळा केलेली माहिती जी विश्वसनीय असून ती विश्वसनीय माध्यमातून अचूकपणे आलेली असेल ती processing प्रक्रिया करुन विश्लेषण केली गेली आणि त्यानंतर जर निर्णय घेतला तर तो अचूक ठरणार यात काय संशय. त्यामुळे अशी शास्त्रशुद्ध पद्धत वापरली तर उत्तम आणि अचूक निर्णय घेता येतात. उदा. महाराजांनी सूरतेवर स्वारी करण्याअगोदर बहिर्जीला पाठवून माहिती गोळा केली. खातरजमा करायला स्वतः एकदा सुरतेला फेरफटका मारुन जमीनीवरील वस्तुस्थिती Zero ground information गोळा करुन मगच सुरतेची मोहीम काढली. विना सायास किंवा खूप कमी प्रतिबंध Resistance होऊन एकही सैनिकाचा जीव न गमावता महाराजांना दोन कोटी रुपये आणि ४००० घोडे प्राप्त करता आले. म्हणजे सुरतेच्या मोहिमेचा निर्णय अचूक ठरला. काय शास्त्रशुद्ध पद्धती महाराजांनी वापरल्या असतील त्यातील ही एक युक्ती बरं. अशा शेकडो मोहिमा महाराजांनी बिनचूकपणे केल्या हे आपणाला माहीतच आहे. उदा. बुऱ्हाणपूर छापा, बसरुर मोहीम, कारंजावर छापा, जालना छापा इ.

२. Output may vary the inputs being the same. Same inputs असूनसुद्धा वेगळा निष्कर्ष निघू शकतो किंवा तेच सर्व कच्चे माल वापरले तरी उत्पादन वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकते.

भौतिक शास्त्रात काय असते तर तुम्ही input बदलले की output आपोआप बदलते. परंतु समाज शास्रात तसे होत नाही. तुमचे input न बदललाही output बदलले जाऊ शकतात किंवा तेच input ठेवले तरी output जवळजवळ वेगळे येऊ शकतात. Output may vary without a change in input. उदा. जेव्हा तुम्ही सहकाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरीत करता प्रवृत्त करता तेव्हा त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावू शकतो. अगदी तुम्ही पगार वाढवून दिला नसेल किंवा तेवढाच वेळ कामासाठी दिला जो पूर्वी देत होता तरीही output वाढू शकते. उदा. १६५९ ला १८ नोव्हेंबर पन्हाळा जिंकायला महाराजांना ५००० फौज वापरावी लागली आणि तोच पन्हाळा १६७२ ला महाराजांच्या एका अनुभवी शिलेदाराने नामे कोंडाजी फर्जद याने फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने तासाभरात जिंकून दाखवला.

शाहिस्तेखानावर १६६३ छापा टाकण्यासाठी महाराजांनी २००० मावळे सोबत घेतले. १२५००० शत्रूसाठी २००० मावळे. परंतु तेच महाराज १६६६ ला आग्यातून औरंगजेबाच्या कैदेतून २६०००० फौजेच्या वेढ्यातून सुटण्यासाठी फक्त ६०० लोकांचा उपयोग करतात. शाहिस्तेखानावरील छाप्याच्या वेळी महाराजांचे मारले गेले फक्त ६ मावळे तर आग्र्यातून बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटताना हाच आकडा होता शून्य. एकही मावळ्याचा जीव न गमावता महाराज २६०००० फौजेच्या गराड्यातून सहीसलामत बाहेर पडणे ही व्यवस्थापनाची हाईट नाही तर काय म्हणावी!

3. Process of Management is universally followed

व्यवस्थापनाची प्रक्रिया जगभरात एकाच पद्धतीने अंमलात आणली जाते. थोडक्यात काय तर व्यवस्थापनाची प्रक्रिया वैश्विक आहे. आणि आश्चर्य म्हणजे महाराजांच्या राजमुद्रेत तसेच लिहलं गेलंय. विश्ववंदीता म्हणजे जगभर मान्यता पाववेल अशी व्यवस्थापनाची पद्धत महाराजांनी वापरली तर आणि ही Systematic management कशी असते तर Step by step तसेच महाराजांच्या राजमुद्रेत म्हटलेलं आहे.

प्रतिपच्चंद्र रेखेव वार्धिष्णु म्हणजे हळूहळू पण निश्चितपणे वाढणे होय. ज्ञानेश्वरांच्या भाषेतसांगायचे झाले तर तो हळूहळू ढाळे ढाळे, परी मार्गाचेनि बळे निश्चीत ठाकी. निश्चित म्हणजे Perfect result is clear achievement होय.

आणि व्यवस्थापनाचे हे शास्त्र जगभरातील सर्व संस्था मग त्या छोट्या असोत की मोठ्या त्यांना उपयोगी असून व्यवस्थापनाच्या सर्व पातळीवर उपयोगात येणारे आहे. प्रत्येक व्यवस्थापकाला व्यवस्थीत काम करावे लागते आणि ते म्हणजे नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण करणे हिच ती प्रक्रिया आणि शास्त्रशुद्ध पद्धत जी जगभर वापरली जाते.

4. Principles of Management are Universally Accepted

व्यवस्थापनाचे सिद्धांत जगभरात मान्य केले जातात किंवा पाळले जातात. प्रत्येक यशस्वी संस्था जी आपण पाहतो तिच्या यशाचे रहस्य काय असते तर ते व्यवस्थापनाचे जगभर मान्य असलेले नियम सिद्धांत काटेकोरपणे पाळतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे असे की जे व्यवस्थापनाचे नियम सिद्धांत पाळतात ते यशस्वी होतात. जे हे नियम पाळत नाहीत ते एकतर उदयाला येत नाहीत आणि उदयाला आल्यावर जरी त्यांनी सिद्धांत सोडले तरी अस्ताला गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे व्यवस्थापनाचे सिद्धांत सर्वकाळ पाळले गेले पाहिजेत. आदि मध्य आणि अंत करायचा असेल तरी. म्हणजे अगोदर देणेकरी भागवा आणि मगच शटर बंद करा. अचानक बाजारातून पळून जाणे ही फसवणूकीची योजना असू शकते व्यवस्थापनाच्या सूत्रात हे बसत नाही आणि जे व्यवस्थापनाच्या सूत्रात बसत नाही अशा गोष्टी करतात त्यांना बाजारातून पळ काढण्याशिवाय पर्यायच राहत नाही.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!