आयडॉल कडूभाऊ काळे…!!!

                    »♦•  कडूभाऊ काळे  •♦«

 

सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा… आय.टी.आय. पास होऊन दारोदारी जाऊन साधी शिपायाची नोकरी न मिळालेला बेकार… रस्त्याच्या कडेला टपरी टाकून वायंडिंग करणारा तरुण… हाताला घट्टे पडेस्तोवर मंडपाचे खड्डे खोदणारा कष्टकरी… शिक्षण आणि अर्थ याचा संबंध नसताना ‘अर्थ विश्व’ निर्माण करणारा जिद्दी तरुण… शेकडो कोटी रुपयांची मल्टीस्टेट चालवून हजारोंना स्वावलंबी करणारा समाजाचा आयडॉल… असे असतानाही संत नागेबाबांचा वैराग्याचा आदर्श घेऊन सामान्यांसारखेच सामान्य असणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे… कडूभाऊ काळे…

नेवासा तालुक्यातील कुकाणा-भेंड्यासारख्या ग्रामीण भागातील १९८८-८९चा कडूभाऊंचा कालखंड ज्यामध्ये एक सामान्य मुलगा म्हणून त्यांची ओळख. कसाबसा दहावी व आय.टी.आय. झाल्यावर अडाणी असणाऱ्या पित्याने ‘कडू’ला कारखान्यावर वायरमन नाही तर वॉचमन… नाहीच तर स्वच्छता कर्मचारी म्हणून तरी घ्या… अशी विनंती केलेली. पण त्याचा उपयोग झाला नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं…

कडूभाऊंनी १९९२ साली रस्त्याच्या कडेला एक टपरी टाकली. लोकांच्या विवाह मंडपाचे खड्डे करून पोटाची खळगी भरण्यास त्यांनी

प्रारंभ केला. सोबत इलेक्ट्रीक साहित्य रिपेअरींगची कामे सुरू होती. हे करताना वडिलांनी दिलेला ‘प्रामाणिकपणाचा’ संस्कार सतत परीक्षा घेणारा ठरला. मात्र, प्रामाणिकपणा जपताना सर्वांशी मैत्री करण्याचे सूत्र त्यांनी अंगिकारले व वडिलांचे संस्कार सतत वाढवत पुढे नेले.

१९९७ साली राजकीय वादातून कडूभाऊ व त्यांच्या मित्रांच्या रस्त्यावरील टपऱ्या उचकटून टाकण्याचा प्रयत्न झाला. कडूभाऊंनी या गोष्टीला विरोध केला. हातावर पोट असणाऱ्या अतिसामान्य टपरीधारकांचे त्यांनी नेतृत्व केले. तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. पर्याय निघाला, टपऱ्या वाचल्या… कडूभाऊंचे हे नेतृत्व सर्वांना आपलेसे करून गेले व यामधूनच ते फुलत गेलं. बहरत गेलं…

गरीबांना मदतीचा हात –

भेंड्यासारख्या छोट्या गावात बँका सहजासहजी कर्ज देत नव्हत्या. गावात असलेल्या पतसंस्थेतून ठराविक लोकांचीच कर्जे मंजूर व्हायची छोट्या व्यापाऱ्यांची, शेतकऱ्यांची यामधून कुचंबणा व्हायची… कडूभाऊंनी ग्रामीण जनतेची गरज ओळखून मित्रांच्या सहकार्यातून सामान्यांच्या जीवनात ‘पत’ आणण्यासाठी व त्यांना ‘अर्थ’ प्राप्त करून देण्यासाठी निर्धार केला. यामधून संकल्पना पुढे आली ती ‘संत नागेबाबा’

पतसंस्थेची. ‘संत नागेबाबा’ हे भेंड्याचे ग्रामदैवत. ज्या माणसाने अंगावर कधीही कपडे घातले नाही, निःस्वार्थीपणे जीवन समाजाला समर्पित केले ते समाजासाठी आदर्श होते. त्यांच्याच वैराग्याच्या शिकवणुकीवर पतसंस्थेस नागेबाबा नाव देण्याचे ठरले.

पतसंस्थेच्या या उभारणीसाठी शेअर्स गोळा करताना ३०० रुपये प्रमाणे केवळ चार तासांत लोकांनी विश्वास दाखवीत ते खरेदी केले. विरोधकांनी अनेक अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला. पण ही ‘विश्वासाची’ लढाई होती. संत नागेबाबांच्या जीवनाचे पावित्र्य राखत १५ जुलै १९९९ रोजी संत नागेबाबा पतसंस्थेचा शुभारंभ झाला… स्वातंत्र्यदिनी ग्रामीण गरजूंना ‘अर्थ’ स्वातंत्र्याची ती पहाट ठरली. उद्घाटनाच्या प्रसंगी उद्घाटक असलेल्या ह. भ. प. मीराबाई महाराज मिरीकर यांनी, ‘कडूभाऊ, जनसामान्यांचा विश्वास व संत नागेबाबांचा कृपाआशीर्वाद आहे. यामध्ये काही चूक झाली तर याच ठिकाणी कुणालाही न विचारता तुम्हाला चपलांचा हार घालीन’, असा इशारा दिला. आदरयुक्त धाकाने दिलेला हा प्रामाणिकपणाचा संस्कार कडूभाऊंनी आजीवन पाळला. संत नागेबाबांच्या आशीर्वादाने हे पतसंस्थेचे रोपटे सतत वाढत गेले, बहरत गेले…

‘तप’ केल्याशिवाय ‘पत’ येत नाही ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे विचार कडूभाऊंनी सतत उराशी बाळगले. काही महिन्यांत पतसंस्थेने स्वतःची जागा घेऊन भेंड्यात स्वतःची वास्तू उभी केली. सामान्य व्यापाऱ्याला व्यवसाय वृद्धीसाठी, सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी तसेच लग्न, शिक्षण, घर बांधणी अशा एक ना अनेक गरजा पूर्ण होऊ लागल्या.

कडूभाऊंनी चाकोरीबाहेर जाऊन देडगाव येथे दुसरी व नेवासा फाटा येथे तिसरी शाखा सुरू केली. नेवासा तालुक्याच्या बाहेर जाऊन कडूभाऊंनी शेवगाव येथे भाडोत्री जागा घेऊन पतसंस्था सुरू केली. आपली कोणतीही ओळख नसताना मित्रांच्या सहकार्याने शेवगावकरांना आपलेसे केले. केवळ पाच वर्षांत भाडोत्री वास्तूत चालणाऱ्या पतसंस्थेची स्वमालकीची वास्तू उभी राहिली. त्याचा शुभारंभ ह.भ.प. भास्करगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने झाला आहे.

पुनर्जन्म मिळाला

खरं तर कडूभाऊंचा शेती हाच श्वास… वडिल अडाणी पण दूरदृष्टीचे… आयुष्यभर त्यांनी पायात चप्पल घातली नाही… वयांच्या पंच्याहत्तरीनंतर आजही ते शेतात कष्ट करतात… मुलांना मात्र त्यांनी प्रामाणिकपणाची शिदोरी दिली. भेंड्यामध्ये भेंड्याच्याच घरात या अतिशय गरीब काळे कुटुंबाचे वास्तव्य. नियतीने एका प्रसंगी कडूभाऊंवर घाला घातला. १९९४ साली चोरट्यांनी घरावर दरोडा टाकला. त्याला विरोध करताना चोरांनी केलेल्या हल्ल्यात जखमी

झालेल्या कडूभाऊंचे ‘आतडे कातडे’ बाहेर निघाले. तशा अवस्थेत हॉस्पिटलमध्येही कोणी घेईना. अखेर डॉ. मासुरकर व डॉ. राजीव शिंदे यांच्या उपचार व उपकारामुळे कडूभाऊंना जीवनदान मिळाले. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये जमा झालेला हजारो स्नेहींचा जनसमुदाय ही त्यांच्या प्रेमाची, आपुलकीची पावती होती. सर्वसामान्यांच्या प्रेमामुळे आपल्याला मिळालेले हे बोनस लाईफ आपण त्यांच्याच विकासासाठी वापरायचे याच निर्धाराने ते सतत क्रांतिकारी पावले उचलत गेले.

१९९९ साली त्यांनी आपल्याच गावात ‘सुपर मार्केट’ची अभिनव संकल्पना राबविली. लग्न समारंभासाठी लागणारे फर्निचर, मंडप, किराणा, भांडी, कपडे, सौंदर्य प्रसाधने यासारख्या सर्व गोष्टी एकाच छत्राखाली सुरू केल्या. बँक ऑफ बडोदाने यासाठी अर्थसहाय्य दिले. ‘मॉल’ संस्कृती आता मूळ धरू लागली असताना तत्कालीन स्थितीत भेंड्यासारख्या ग्रामीण भागातील ‘सुपर मार्केट’ची संकल्पना दूरदृष्टीचे प्रतीक होते.

नागेबाबा पतसंस्थेच्या उभारणीत अनेक चढ-उतार येत असताना त्यामधून सतत काहीना काही शिकत गेले. पतसंस्था क्षेत्रात अनेक प्रवृत्ती अपप्रवृत्ती वाढत असताना सुरुवातीपासून गैर प्रवृत्तींपासून दूर राहिले. अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले. पतसंस्थेच्या उभारणीच्या पहिल्या दिवसापासून ३६५ दिवस सकाळी ९ ते रात्री ९ अशी सेवा दिली. प्रारंभी या गोष्टीला चेष्टेचा विषय ठरविला गेला. मात्र, नंतर सकाळीच ग्राहकांची पतसंस्थेसमोर रांग लागायची. व्यापारी, उद्योजक सराफ, आठवडा बाजार करणारे छोटे व्यावसायिक यांना या ‘सेवे’मुळे निर्भयता, विश्वास मिळाला. हे सर्व करताना राज्यातील सुमारे ४०० पतसंस्थेला भेटी दिल्या. कोणत्या चांगल्या गोष्टीमुळे पतसंस्थेची प्रगती होत, ते पाहत गेले व त्याची अंमलबजावणी आपल्या पतसंस्थेत केली. ‘बंद’ पडलेल्या पतसंस्था ‘का’ बंद पडल्या याचा अभ्यास करून त्या चुका आपल्याकडे होऊ नये, याकडे कडूभाऊंनी जाणीवपूर्वक लक्ष दिले.

विश्वासार्हता हाच दागिना –

आयुष्यातील अविस्मरणीय गोष्टीबद्दल बोलताना ते स्तब्ध झाले व पुढच्या क्षणाला श्वास रोखून बोलले, माझ्यावर चोरांनी केलेला हल्ला व पतसंस्थेच्या चांगल्या कारभारावर द्वेषाने विघ्नसंतोषी लोकांनी केलेला अफवांचा हल्ला हा न विसरण्यासारखा. ‘आष्टी’ शाखेत अफवांमुळे पैसे

काढण्यासाठी झालेली गर्दी. पण व्यवस्थापनाने न डगमगता सर्वांना विश्वास दिला. पहाटेपर्यंत ठेवीदारांचे सुमारे साडेपाच कोटी रुपये पतसंस्थेकडून वितरित झाले. यावेळी पोलिस निरीक्षक तांदळे यांच्या मदतीने सुमारे ३५ पोलिसांचे दंगल नियंत्रक पथक तैनात होते. यामध्येही कडूभाऊंनी नैतिकता, माणुसकी न विसरता रांगेत उभ्या असणाऱ्या प्रत्येक ठेवीदाराची चहा, नाष्टा, पाणी यांची व्यवस्था केली. वृत्तपत्रे व ‘अफवा’ यामुळे विविध शाखांतून सुमारे २२ कोटींच्या ठेवी परत गेल्या, अफवेमुळे दिलेला ‘धडा’ वेळेआधी काढलेल्या ठेवींमुळे सुमारे १७ लाख रुपयांचे व्याज वाचल्याचा फायदा देऊन गेला… कडूभाऊ बोलत होते.

मित्र मिळविणे, जमविणे व टिकविणे हाच आपला छंद हे आपुलकीने सांगताना कडूभाऊंचा ऊर भरून आला. संत नागेबाबा पतसंस्थेच्या परिवारामागे समाज उभा राहिला. यापुढे धार्मिक कार्यक्रमाबरोबर स्थायी स्वरुपात काम करण्याचा पतसंस्थेचा उद्देश आहे. गोंडेगाव येथे मुर्लीच्या शिक्षणाचा मागासपणा कमी करण्यासाठी २००३ मध्ये शाळा सुरू झाली ती हनुमान विद्यालयाच्या माध्यमातून राजकारणी लोकांपेक्षा सर्वसामान्य मित्रमंडळींनी अडचणीच्या प्रसंगी दागिने गहाण टाकून पैसे पतसंस्थेत भरले. हा आपुलकीचा झरा हीच आपली ‘प्रेरणा’ असल्याचे ते कृतज्ञतापूर्वक सांगतात.

समाजकारण व राजकारण यांच्यामधला दुवा होताना कडूभाऊंनी केलेले काम त्यांच्या आयुष्यांची पुंजी ठरली. ‘तुम्ही सरपंच व्हा’ या गावकऱ्यांच्या अट्टाहासापायी कडूभाऊ सरपंच झाले. प्रारंभीच कडूभाऊंनी आदर्श गाव ‘हिवरे बाजार’ला गावकऱ्यांची भेट घडविली. योगायोगाने तेथे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व पोपटराव पवार यांची भाषणे ऐकल्यावर ‘भेंड्या’चे गावकरी प्रभावीत झाले. गाव विकासासाठी पेरलेले ते बीज ठरले… कडूभाऊ बोलत होते.

राजकारणाला रामराम –

दुसऱ्याच दिवशीपासून महिलांच्या सहभागातून ग्रामस्थ विकास कामांसाठी सरसावले. हागणदारीमुक्त गाव होण्यासाठी कडूभाऊंच्या नेतृत्वाखाली २००२ ते ०५ हा काळ सुवर्णकाळ ठरला. सर्वांच्याच सहकायनि प्रत्येक घराला सारखा रंग, घर तेथे शौचालय, शिक्षण, साक्षरता, घरासमोर झाड, रांगोळी अशा एक ना अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या. शासनाच्या ४ घरकुलापासून ते भेंड्यासारख्या गावात एकाच वेळी ७२ घरकुले मंजूर होण्याचा विक्रम झाला. या सर्वांचे यश म्हणजे केंद्राचा ‘निर्मलग्राम’ हा ५ लाखांचा पुरस्कार भेंड्याला जाहीर झाला. मात्र, अभिनंदनाच्या ग्रामसभेत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी जावे म्हणून या कामासाठी जीवाचे रान करणाऱ्या कडूभाऊंचे नावही कोणी घेतले नाही. त्याचक्षणी कडूभाऊंनी स्वार्थी राजकारणातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला.

कार्यकाळ पूर्ण होण्यास एक महिना असताना कडूभाऊंनी दिलेला सरपंच पदाचा राजीनामा महाराष्ट्रभर गाजला. सुमारे १ किलोमीटरच्या मिरवणुकीने, वाजत-गाजत. ११ किलो पेढे वाटत कडूभाऊंनी मिरवणरणाला पूर्णविराम दिला. मात्र, दिल्लीपर्यंत ‘भेंड्याचे नाव सुवर्णाक्षराने लिहूनच.

वाणामान्य माणसांच्या आर्थिक गरजेतून निर्माण झालेले संत नागेबाबा पतसंस्थेचे विश्व कडूभाऊंनी विविध संकल्पना राबवून विकसित केले. जिल्हाभर आपले जाळे विणताना ‘जिथे कमी तिथे मी’ या तत्त्वाने कडूभाऊ प्रत्येक जागेवर काम करू शकतात. मल्टीस्टेट पतसंस्था होण्याअगोदर २३ कोटींच्या ठेवी संस्थेकडे होत्या. मल्टीस्टेट झाल्यावर वाढलेला विश्वास ठेवींना ३५० कोटींपर्यंत घेऊन गेला. तत्पर सेवा, सोने तारण यासारख्या गोष्टीमधून ग्राहक संतुष्ट होत गेला. भविष्यात संत नागेबाबांच्या १ हजार कोटी रुपयांच्या ठेर्वीचे उद्दिष्ट असल्याचे भाऊ सांगतात. पण केवळ ठेवीच नव्हे तर इतर अनेक सेवा एकाच छत्राखाली देण्यास संस्थेने प्रारंभ केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या बरोबरीने आपल्या पतसंस्थेचे व्याजदर होतील, तो आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण असेल, अशी त्यांची धारणा आहे.

खुद्द संत नागेबाबाच पाठीशी –

मागील वर्षी श्री संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पैठण शाखेवर मोठा दरोडा पडला. ६ किलो सोने चोरीस गेले. वीज अंगावर पडावी अशी अवस्था झाली. पण न डगमगता कडुभाऊंनी मनोमन नागेबाबांची प्रार्थना केली – “हे नागेबाबा, तूच रक्षणकर्ता आहेस आणि तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढशील. आजवर प्रामाणिकपणे, सच्चाईने आणि विश्वासाने लोकांची सेवा केली. कुठलंही गालबोट तू संस्थेला लागू दिलं नाहीस. आम्हा सर्वांना पोटच्या लेकरासारखं सांभाळलंस. आता तूच रक्षण कर.” त्यानंतर रितसर औरंगाबाद पोलिसांकडे कायदेशीर तक्रार नोंदविली आणि तपास सुरू झाला. झोप आणि तहान-भूक विसरून अखंड पाठपुरावा सुरूच होता. कर्तबगार, कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाचा धडाका लावला. कसून चौकशी केली. गावन्गाव पिंजून काढले आणि धागेदोरे मिळाले. दरोडेखोरांचा शोध लागला. त्यांना जेरबंद केले गेले. सर्वच्या सर्व सोने सापडले. लोकांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास शाबूत राहिला. त्यांच्या आशीर्वादाने आणि खुद्द संत नागेबाबांच्या कृपेने पोलिसांच्या अथक परिश्रमाला यश आले.

कष्टकऱ्यांचा मसिहा –

‘अर्थविश्व’ निर्माण करताना हा पैसा सामान्य माणसाचा. शेतकऱ्यांचा, कष्टकरी समाजाचा आहे. यावर कुणाच्या मुलीचे लग्न, शिक्षण, व्यवसाय अवलंबून आहे, या सर्वांची जाणीव कडूभाऊंच्या मनातजिवंत आहे. सर्व काही संस्थेचे आह, मी नाममात्र असल्याने त्यांचा विश्वास शेवटपर्यंत टिकवून ठेवणे माझे कर्तव्य असल्याचे ते नम्रपणे सांगतात.

नगर जिल्ह्याच्या प्रगतीच्याबाबतीत कडूभाऊ म्हणतात, चुकीची माणसे व चुकीच्या मुद्यावर सातत्याने राजकारण होत असल्याने सामान्य माणसाचे ‘गणित’ चुकले आहे. जिल्ह्याच्या प्रगतीपेक्षा संस्थानिक होऊन स्वतःच्या संस्था व स्वतःचीच प्रगती करण्यातच आमचे राज्यकर्ते धन्यता मानतात. हे बदलणे केवळ नागरिकांच्या हातात आहे.

अर्थसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी व आध्यात्मिक सेवा हीदेखील संस्थेने जपली आहे. याच भावनेतून अयोध्यानगरी, भेंडा येथे १८ते २६ मार्च २०१२ या कालावधीत भव्य रामायण सोहळा ऐतिहासिक रुपात यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रसंगी आदरणीय रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुरेल वाणीचा पंचक्रोशीतील असंख्यग्रामस्थांनी व भाविकांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे ११ ते १८ ऑगस्ट२०१३ या कालावधीत भारतातील सर्वात मोठा नारळी सप्ताह-योगीराजसद्‌गुरु गंगागिरीजी महाराज यांचा १६६ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भेंडा येथे संपन्न होत आहे. या कार्यासाठी प. पू. भास्करगिरीजी महाराज, श्री क्षेत्र देवगड यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभत आहे.

युवा वर्गाने चाकोरीबाहेर जाऊन नवनवीन संधी शोधायला हव्या. जिद्द, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा असेल, तर अनेक संधी तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. मात्र, त्यासाठी खडतर तपः श्चर्येशिवाय पर्याय नाही. हे सर्व करताना जनसामान्यांचे उपकार व प्रगतीसाठीही प्रत्येकाने कटिबद्ध असावे असा कडूभाऊंचा आशावाद हृदयाच्या, माणुसकीच्या संवेदना जागृत ठेवणारा आहे. शून्यातून क्षीतिजाला गवसणी घालून त्याला ‘अर्थ‘ देणारे

 

»♦ कडूभाऊ काळे ♦«

                      अर्थविश्वाचे ‘आयडॉल ‘ ठरले आहेत…..

error: Content is protected !!