प्रतिभावंत कलाकार सदाशिव अमरापूरकर

                                                                      ♦  सदाशिव अमरापूरकर  ♦

 

 

१९५० साली अहमदनगर येथे जन्मलेल्या तात्यांच्या वडिलांचे शेतीसह अनेक व्यवसाय. शेतमजुरांची मुले असलेल्या सर्व जाती धर्माच्या सवंगड्यांसह बालपण मजेत जात असतानाच त्यांच्या ताटातील भाकरी- चटणी खाताना नकळत ‘माणूस ही एकच जात’ हा संस्कार रुजला. याच मुलांसोबत स्टेशनरोडच्या म्युनिसिपल शाळेत व नंतर नवीन मराठी शाळेत प्राथमिक तर ‘सोसायटी हायस्कूल’मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत मन फारसे रमले नाहीच. याच शाळेत नगरकरांसारख्या मुख्याध्यापकांमुळे क्रिकेटची आवड जोपासली गेली आणि पास होण्यापुरता अभ्यास आणि पूर्ण वेळ क्रिकेट असे दिवस सुरू झाले. क्रिकेटमध्ये अष्टपैलूत्व सिद्ध केल्याने अकरावीच्या वर्गात प्रवेश घ्यावा म्हणून सारडा कॉलेज व नगर कॉलेजमध्ये स्पर्धा लागली. सारडा कॉलेजने खूप प्रयत्न करूनही तात्यांनी नगर कॉलेजला प्रवेश घेतला. इथेच त्यांची ‘कुच बिहार’ करंडकासाठी निवड झाली.

नाटकाची आवड

नगर कॉलेजमध्ये तेव्हा फार सुरेख आणि मोलाची परंपरा होती (कदाचित आजही असेल.) स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांनीच नाटके लिहायची, दिग्दर्शित करायची आणि सादर करायची! त्या काळात प्रा.

मधुकर तोरडमलांचा व त्यांच्या नाटकांचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांवर होता, राज्य नाट्य स्पर्धांसाठी त्यांना दरवर्षी रौप्य पदके व बक्षिसे मिळत. त्यांच्या नाटकांच्या रंगीत तालमी (त्याही ४ ते ५) विद्यार्थ्यांसमोर होत असत. यातूनच सदाशिव अमरापूरकरांना नाटकांविषयी, अभिनयाविषयी विलक्षण गोडी निर्माण झाली. आपणही असेच काहीतरी करायला हवे, ही प्रेरणा मिळत गेली. सर्वांनी मग राज्य नाट्य स्पर्धात भाग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजातील एका एकांकिकेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आणि त्यांना नाटकाचा ‘विंचू’ चावला ! त्यानंतर युथ फेस्टीव्हल्स्च्या निमित्ताने शहरातील सर्व कॉलेजमधील एकांकिका तात्यांनी बसवायच्या आणि अनेकांना त्यासाठी पारितोषिक मिळायची असा विलक्षण ‘माहोल’ तयार झाला.

राज्य नाट्य स्पर्धेसाठी दरवर्षी नाशिक केंद्रावर नाटके सादर करताना चिठ्ठ्या टाकून एक नाव निश्चित होत असे. ज्याचे नाव निघेल तो ‘दिग्दर्शक’ जाहीर व्हायचा. पण नाटक बसवायचे तात्याच. स्वतः कष्ट घेऊन नाटक यशस्वी करून अनेकांना त्यांनी रौप्यपदके मिळवून दिली. दुर्दैवाने त्या कलावंतांचा प्रवास त्या पदकापाशीच थांबला. तात्या मात्र झपाटल्याप्रमाणे नाटक करत होते. क्रिकेट बंद झाल्याची खंत मात्र आयुष्यभर कायम राहिली.

सुधाकर निसळसारख्या पेशाने इंजिनियर असलेल्या मित्राने ‘बॅकस्टेज’ची सगळी जबाबदारी सांभाळत मोलाची मदत केली. ‘काही स्वप्न विकायची आहेत’ हे नाटक नाशिक केंद्रातून प्रथम आणि मुंबईतही प्रथम आले. दिग्दर्शन आणि अभिनयाची रौप्यपदके मिळाली. परीक्षक म्हणून गोवा-हिंदू असोसिएशनचे पदाधिकारी भिकूभाई आंग्ले होते. त्यांनी तात्यांच्या अभिनयाचे कौतुक करणारे पत्र पाठवून ‘तू भविष्यात खूप मोठा अभिनेता होशील’ असा आशीर्वाद दिला.

आता मात्र सदाशिव खूप ‘सिरिअसली’ नाटकं करतोय हे बघून आतापर्यंत कौतुक करणाऱ्या वडिलांनी ‘नाटक-बिटक’ बंद करून मेडिकलच्या दुकानात लक्ष देण्याचा आदेश दिला ! ऐकत नाही हे बघून त्यांनी त्यांना एका नाटकाच्या तालमीला जाऊ नये म्हणून चक्क कोंडून ठेवले. तेव्हा त्या एकांतात आणि विचित्र मानसिक अवस्थेत जाणवलं की आपण नाटकाशिवाय काहीच करू शकणार नाही. निर्णय पक्का झाला आणि तात्यांनी वडिलांना ओरडून सांगितलं, ‘दादा, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण मी नाटक करणारच !’

अपयशाची पायरी –

तशातच गोवा हिंदू असो. ने दत्ता भटानंतर युवा अभिनेत्याला घेऊन ‘नटसम्राट’ करायचे ठरवले. भिकुभाईंनी तात्यांची ‘आदर्शवादी शिक्षकाची काही स्वप्ने’मधील भूमिका पाहिली असल्याने त्यांनी ‘नटसम्राट’ साठी त्यांची शिफारस केली व मुंबईत बोलावले. ‘व्यावसायिक रंगभूमीने’ आपली दखल घेतली, परिश्रमांचे चीज झाले या आनंदाने त्यांना भेटण्यास गेले. नगरच्या मित्रांना, नाटक मंडळींना आनंद झाला. प्राथमिक चर्चा करून नगरला परतले व नंतर कळले की, ती भूमिका सतीश दुभार्षीना देण्यात आली. विषण्ण मनःस्थितीत नगरच्या मंडळींसाठी नवनवीन नाटके बसवावीत असा परिपाठ कायम झाला. ‘छिन्न’, ‘मसिहा’ अशी अनेक नाटके ‘राज्य नाट्य’ साठी सादर झाली.

पुन्हा ‘गोवा हिंदू असो.चे बोलावणे आले. ‘बॅरिस्टर’ या नाटकातील प्रमुख भूमिकेसाठी भेटी झाल्या, चर्चा झाल्या आणि विजया मेहतांकडे तात्यांना पाठवण्यात आले. विजयाबाईंसह काम करायला मिळणार या कल्पनेने ते आनंदून गेले. मात्र, त्यांना भेटले तेव्हा ती भूमिका विक्रम गोखलेंना देण्याचे त्यांनी नक्की केल्याने सांगितल्याने पुन्हा निराशा… पण रंगभूमीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. हौशी रंगभूमीवर नाटके सुरूच होती. तेव्हाच ‘दुर्वांची जुडी’ संस्थेने ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या प्रा. दिलीप परदेशी या अत्यंत प्रतिभावान नवोदित लेखकाच्या नाटकासाठी विचारणा केली. पुन्हा मुंबईत दाखल झाले. स्क्रीप्ट वाचन झाले. मुक्कामाचे हॉटेलही निश्चित झाले. प्रत्यक्ष तालमींना अवकाश असल्याने नगरला येऊन स्क्रीप्टचा अभ्यास सुरू केला. तालीम सुरू होताच मुंबईत दाखल झाले. प्रॅक्टीस हॉलवर मात्र दारव्हेकर सर

ओळखच दाखवेनात. दुसरे संचालकही ओळख दाखवेनात.. शेवटी निमकरांना विचारले तेव्हा ती भूमिकाही कमलाकर सोनटक्केंना दिल्याचे सांगण्यात आले. हताश… निराश आणि उद्ध्वस्त मनःस्थितीचा अनुभव रंगभूमीशी इतका प्रामाणिक असताना आपल्याबाबतीत असं का घडावं? हा निरुत्तर करणारा प्रश्न ते स्वतःला विचारत होते. तेव्हाच दारव्हेकर म्हणाले, ‘अमरापूरकर, या नाटकात दोन छोट्या भूमिका आहेत. माझी खात्री आहे, त्या तुम्ही करू शकाल. !’

प्रायोगिक सुरुवात –

आता नगरला जाऊन अपमानास्पद स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा या भूमिका स्वीकारून हा ‘संघर्ष’ मुंबईत करण्याचा तात्यांनी निर्णय घेतला. त्या दोन छोट्या भूमिका स्वीकारल्या. ते त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक ‘सत्यम शिवम सुंदरम’. ऑल इंडिया रेडिओची अनाऊंसरची नोकरी सोडलेली, लग्न झालेले, मुंबईत ओळखी नाहीत, हाताशी कामं नाहीत, राहायला जागा नाही, कधी कुठे कुणा मित्राच्या घरी, कधी गच्चीवर, कधी जिन्यात झोपून दिवस काढायचे. नगरला येण्यासाठी खिशात पैसे नसायचे. पत्नी नगरला, ते मुंबईत. द्विधा मनःस्थितीत असताना त्यांच्या हाती ‘यात्रिक’ या नाटकाचे स्क्रिप्ट आले. ‘आयएनटी’चे मराठी विभाग प्रमुख भाऊसाहेब सप्रे यांना भेटून हे नाटक करण्याची इच्छा सांगितली. त्यांनी अमरापूरकरांची कामे पाहिलेली असल्याने ‘आयएनटी’तर्फे ते ‘यात्रिक’ करू शकले. तात्या, नगरचा विनय जोशी, प्रमोद पवार अशा अनेकांना घेऊन छबिलदास पद्धतीचे ते नाटक स्टेज संकल्पनेसह केले. नगरला असताना सोसायटी हायस्कूलच्या मदतनिधीकरिता उत्तमोत्तम व्यावसायिक नाटके आणली जात. तेव्हा परिचय झालेल्या अनेक नामवंत कलावंतांचा तात्यांनी उपयोग स्वतःच्या नाटकामध्ये केला. ‘आयएनटी’ची अनेक नाटके, एकांकिका बसविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. मुंबईच्या चकरा वाढल्या. तेव्हाही नगरच्या हौशी मंडळींसाठी बांधिलकी म्हणून त्यांचीही नाटके बसवत होते. या काळात वैयक्तिक आयुष्यात मात्र तणाव होता. पैसे वेळेवर मिळत नव्हते, राहण्याची सोय होत नव्हती. पण मुंबई सर्वांना सांभाळते तसे तिने तात्यांनाही सांभाळले. सुहास जोशीसारख्या मित्राने स्वतःच्या छोट्या घरात त्यांना हॉटेलातून अक्षरशः उचलून आणलं. ९-१० वर्षे ते त्यांच्याच घरात राहिले, जेवले, त्यांचीच मोटार सायकल वापरली. पण त्याने एका अक्षराने आजपर्यंत त्याची वाच्यता केलेली नाही.

अशाच एका एकांकिकेसाठी विजय तेंडुलकरांच्या मुलीला नेण्या-आणण्याची जबाबदारी तात्यांनी स्वीकारली आणि त्यांचा तेंडुलकरांच्या घरी प्रवेश झाला. हळूहळू त्यांच्यात अकृत्रिम स्नेह निर्माण झाला. इतका की ते त्यांना ‘बाबा’ म्हणू लागले. तेंडुलकरांच्या घरी तेव्हा महेश भट, ओम पुरी, अमरीश पुरी, नसरुद्दिन शाह, शाम बेनेगल असे अनेकजण येत, त्यांचे मार्गदर्शन घेत. त्यांच्या विचारांमुळे व चर्चेमुळे तात्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. तेव्हाच त्यांनी त्यांचे ‘कन्यादान’ हे नाटक डॉ. श्रीराम लागूंना घेऊन सुरू केले. तेंडुलकरांच्या घरी ‘घरचाच एक सदस्य’ अशी आस्थेची वागणूक त्यांना मिळत गेली तर डॉ. लागूंमुळे कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकरांकडेही येणे-जाणे वाढले. त्यांनी तर अमरापूरकरांवर अफाट प्रेम केले. त्यांची भेट म्हणजे ‘आनंद’ फक्त आनंद !

रामा शेट्टी गाजला –

शाम बेनेगलांकडे तेव्हा ‘अर्धसत्य’ या सिनेमातील एका छोट्या भूमिकेसाठी विजय तेडुलकरांनी तात्यांचे नाव सुचवले. अमरापूरकरांनी ती भूमिका केली आणि वडिल आणि मोठ्या भावाच्या आग्रहाने नगरला येऊन मेडिकल सांभाळू लागले. ‘अर्धसत्य’ प्रदर्शित झाला आणि चमत्कार घडावा तसे सर्वत्र ‘रामा शेट्टी’चे कौतुक सुरू झाले. तात्यांना मुंबईच्या मित्राचे फोन येऊ लागले, ‘अरे! तू मुंबईत ये, इथे सगळीकडे फक्त तुझीच चर्चा चाललीय. मॅगझीनवाले, पेपरवाले, निमति तुला शोधतायत!’ तेव्हा वडिलांची परवानगी घेऊन तात्या एस.टी.ने मुंबईला दादरला उतरले. त्यांना पाहताच टॅक्सीवाल्यांनी ‘जल्लोष’ केला. त्यांच्याभोवती लोक गोळा झाले तेव्हा एका सरदारजीने त्यांना अंधेरीत त्यांच्या घरी ‘फुकट’ सोडले ! हा त्यांच्यासाठी खरा पुरस्कार होता.

पुढे इतिहासच घडला. ८७ चित्रपटांच्या एकाचवेळी ऑफर आल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत ही विलक्षण गोष्ट होती. पण तात्या मात्र अस्वस्थ होते. कारण ‘अर्धसत्य’ सारखा सिनेमा करूनही प्रायोगिक कमी व व्यावसायिक चित्रपटांच्या जास्त ऑफर येत होत्या. ‘असे का व्हावे ?’ असा प्रश्न त्यांनी तेंडुलकरांना विचारला, ते म्हणाले, “आताशा असे चित्रपट बनत नाहीत. तू कर ना व्यावसायिक सध्या.” आणि मग तात्यांनी ‘हुकूमत’, ‘एलान-ए-जंग’, ‘आखरी रास्ता’ अशा सर्व टॉपच्या नटांसोबत खलनायक साकारला.

‘स्काय इज लिमीट’ अशी अवस्था असताना मराठी रंगभूमीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. तशातच त्यांच्या हाती ‘हेलन केलर’च्या आयुष्यावरचे एक ‘इंग्रजी स्क्रिप्ट’ आले. ते वाचून झपाटलेच. ते स्क्रिप्ट त्यांनी शिरवाडकरांना दिले. त्यांनी विचारले ‘यात नाटक कुठायं ?’ मला तर काहीच दिसत नाही नाट्य ! तुला काय दिसलं ते तू कागदावर लिहून काढ.’ तात्यांनी संक्षिप्त कथानक लिहून दिल्यावर त्यांनी परत दुरुस्त्या सुचवल्या मग तात्यांनाच संवाद लिहायला सांगितले. नंतर आठ दिवसांनी निरोप दिला, “नाटक तयार आहे. घेऊन जा” पाहतात तर तात्यांच्या संवादाच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी आवश्यक तेवढे संवाद लिहिले. बाकीचे ‘जसेच्या तसे’ असे लिहून स्क्रिप्ट दिले. अत्यंत जगावेगळ्या लिखाणाचे हे ‘वर्कशॉप’ घेऊन शिरवाडकरांनी तात्यांकडून हे नाटक लिहून घेतले- ‘किमयागार’, शिवाय लेखक म्हणून स्वतःचे नाव न टाकता, ‘अमरापूरकर, हे तुमचंच नाटक आहे । हेही सांगितले. हे सर्व घडत असतानाही तात्यांना मुंबईत स्वतःचे घर नव्हतेच आणि घर घ्यावे इतके पैसेही नव्हते. अंधेरीच्या भाडोत्री घरात राहत असताना मालकाने ते खाली करायला सांगितले. तेव्हा वैतागून तेंडुलकरांकडे गेले. ते त्यांना घेऊन प्रभाकर कुंटे यांच्याकडे गेले, तेथून तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे सर्व मंडळी पोचली. तेंडुलकर आल्याचे कळताच मुख्यमंत्री स्वतः बाहेर आले. तेंडुलकरांनी सांगितले, मला स्वतःला काहीच नको. हे माझ्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत, गुणवान अभिनेते, तुमच्यासारखेच ग्रामीण भागातून आलेत. यांना १०% मधून घर मिळावे. त्याच अर्जावर वसंतदादांनी सही करून घर मंजूर केले. त्या घराचे पैसे भरण्यासाठी वडिलांना पैसे मागितले तेव्हा त्यांनी, ‘बायकोचे दागिने मोडायचे आणि पैसे भरायचे, पुन्हा पैसे जमले की दागिने करायचे’ असा व्यवहारी सल्ला दिला. दागिने मोडूनही कमी पडणारे पैसे दामुभाई जव्हेरी, डॉ. लागू यांनी भरले आणि तात्यांना मुंबईत घर मिळाले.

सामाजिक बांधिलकीची कास –

तात्यासाहेब शिरवाडकर आणि विजय तेंडुलकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव अमरापूरकरांवर पडला. ते साहित्यिक होतेच पण जनसामान्यांच्या वेदना, प्रश्न, सामाजिक चळवळींचे आधारस्तंभही होते. त्यांच्या नाटकातून, चित्रपटातून याचे प्रतिबिंब पडलेले आढळते. हे सामाजिक भान त्यावेळच्या प्रायोगिक, छबिलदास व व्यावसायिक रंगभूमीवरही जपले जायचे. कुसूमाग्रजांनी आणि डॉ. लागूंनी समाजाच्या सेवेकरिता आयुष्य देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारण्याचे ठरवले तेव्हा निळु फूले, डॉ. बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर, लक्ष्मण माने, डॉ. अनिल अवचट यांच्यासोबत फिरत अमरापूरकरांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करून ५० लाखांचा निधी जमवला !

कलाकाराने सामाजिक बांधिलकी, सामाजिक समस्या सोडविण्याचा पुढाकार घ्यावाच हा संस्कार तात्यांच्या पिढीवर झालेला होता. या लोकांसोबत काम करतानाच तात्या महेश भटांचा ‘सडक’ सिनेमा करीत होते. वंचित, शोषितांचे प्रश्न समजावून घेताना अस्वस्थ होत होते. या लोकांचे प्रश्न सोडवण्याचे आव्हान हेच खरे नाटक, सिनेमाचे ध्येय आहे. आपण करतो तो व्यावसायिक सिनेमा हे कचकड्याचे जग त्यांना वाटू लागले. मेधा पाटकरांसोबत नर्मदा घाटीतील आदिवासींचे वास्तव जीवन पाहून स्वतःवरच प्रश्नचिन्ह लावू लागले आणि याच ‘मुख्य प्रवाहात’ सामीलही झाले.

‘ज्याचा त्याचा विठोबा’ हे नाटक करताना व ‘तुकाराम’ वैश्विकसंदर्भात साकारताना हे समाजऋण, त्यांचे प्रश्न, तुकोबांच्या अभंगांचे आजच्या सामाजिक प्रश्नासंदर्भात भान याची सांगड घालता आली, याचे त्यांना समाधान आहे. आजचे नाटककार, कलावंत मेहनत घेतात पण साचा तयार करून आठ दिवसाच्या तालमीवर नाटक सादर करतात. खरे तर जितक्या प्रामाणिक तालमी, तेवढे सशक्त सादरीकरण पण….. असो. त्यांच्या काळात जसा विचार व्हायचा, तसा या पिढीचा असावाच असा दुराग्रह धरणाऱ्यातले ते नाहीत. प्रेक्षकांची अभिरुचीही बदलतेय, माध्यमं बदलतायत तसे सादरीकरण होणे अपरिहार्य असेल असे ते मानतात.

भविष्यात एक विनोदी व्यावसायिक नाटक आणि अहमदनगरच्या नवोदित कलाकारांसाठी ‘महाभारतावर’ आधारित एक नाटक अशा योजनांवर सध्या ते काम करतायत. नाटककारांनी मात्र सामाजिक प्रश्न पोटतिडकीने साहित्यातून, नाटकातून मांडावेत. या उपेक्षित, दुबळ्या वर्गाचा ‘आवाज’ म्हणजे आपलं ‘माध्यम’ असावं, नाहीतर ‘बकासूर’ झालेल्या राजकीय अवस्थेत हे लोक यापासून कायम वंचित राहतील आणि आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीत, असे वाटणारे सदाशिव अमरापूरकर प्रतिभावंत कलाकार ठरतात…

error: Content is protected !!