९. ध्येय निश्चिती करा.
जिजाऊसाहेबांच्या या शिकवणीनुसार महाराजांनी रायरेश्वर मंदिरात काही हजार मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली आणि पुढे सलग २९ वर्षे स्वराज्य या ध्येयाचा पाठपुरावा केला. आणि ६ जून १६७४ म्हणजे वयाच्या केवळ ४४व्या वर्षी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती ही पदवी धारण केली आणि “प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस राजा शिवछत्रपती की जय” असा रयतेने जयजयकार केला ध्येयनिश्चितीच्या कालापासून ते पूर्ततेपर्यंतचा काळ हा ३५ वर्षांचा असताना महाराजांनी सहा वर्षे अगोदरच ध्येय प्राप्त केले. ५० व्या वर्षी होणारा राज्याभिषेक ४४ व्या वर्षी झाला. लवकरात लवकर ध्येय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात मुदतीपेक्षा आधी Deadline पूर्वीच महाराजांनी ध्येय प्राप्त केलं आणि सोबत ठरलेल्या दोन गोष्टी देखील पूर्ण केल्या. एक म्हणजे राज्याभिषेकापासून स्वतंत्र कालगणना शिवशक सुरू केला आणि मराठी भाषेला अधिकृत असा राजभाषेचा दर्जा दिला. स्वतःची नाणी पाडली. स्वतःचे सार्वभौम चलन निर्माण केले. ७२ प्रकारची नाणी तयार केली. सामान्य रयतेसाठी कवडी पासून ते सोन्याचा होन इथपर्यंत ही व्याप्ती होती. तेव्हा चला तर आपणही आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवा. ते प्राप्त करायला आराखडा plan तयार करा आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ताबडतोब कृती करणे ते पहिले करा. चला तर जग जिंकायला, तुम्हाला अडविण्याची हिंमत जगात कोणाचीही नाही कारण तुमच्या मागे रक्षण करायला शिवाजी महाराज आहेत आणि पुढे दिशा दाखवायला राजमाता जिजाऊ आहेत. तेव्हा आता फक्त लढायचं पुढे चालत राहायचं आणि जिंकत जायचं. शिवबाराजे आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी चार माणसांचा यात समावेश होतो आणि या चारही माणसांच्या सचोटीवरच आपले स्वराज्य हे ध्येय पूर्ण होऊ शकेल. यातील चार माणसे म्हणजे एक मी, एक तुम्ही तिसरे सैनिक आणि चौथी रयत. चौघांचेही ध्येय एकच आहे आणि प्रत्येकाने ते लक्षात ठेवून कृती केली तर ध्येयप्राप्ती नक्कीच होईल. प्रत्येकाला आपले ध्येय सतत लक्षात रहावे म्हणून आपण एक काळजी घेऊ. साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक दिवसाला ६०,००० विचार येतात आणि जातात. त्यातील काहीच विचार विचार करण्याजोगे तर त्यातील काही निवडकव विचार कृत्तीत आणण्यासारखे असतात. तेव्हा एकंदरीत विचारांच्या या भाऊगर्दीत ध्येयाचा विचार कुठे हरवला नाही गेला पाहिजे. म्हणूनच आपण एक बारकोड सिस्टम बनवू. सर्वांना आपले लक्ष्य कायम स्मरणात राहावे यासाठी आपण सर्वांनी आपआपल्या कपाळावर कुंकू आणि गंध अशाप्रकारे लावू की सर्वांना आपले ध्येय रोज स्मरणात येईल.
राजे आपण दोघा मायलेकरांनी आपल्या राजमुद्रेची सुरुवात असणारी अक्षरे प्रतिपच्चचंद्र लेखेव लक्षात असावी म्हणून कपाळावर चंद्रकोर कोरायची आणि आपल्या राजमुद्रेचा भाग जो पूर्णत्वाचा प्रतीक आहे तो विश्ववंदिता हा शब्द लक्षात रहावा म्हणून आपली रयत आणि सैनिक यांनी कपाळावर चंदनाचा किंवा गंधगोळीचा गोल पूर्ण असा चंद्र कोरायचा. स्वराज्याची सुरूवात ही प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखी शून्यातून करायची आणि शेवटी ते स्वराज्य विश्ववंदिता म्हणजे जगाला मान्य होईल अशा स्वरूपाचे पूर्णत्वाला नेण्याचे प्रतीक म्हणून गोलचंद्र पौर्णिमेचा चंद्र याची आठवण म्हणून कपाळावर गोल टिळा लावायचा. रयतेनं आणि सैनिकांनी सुद्धा. कारण हे स्वराज्य सैनिक आणि रयत या दोघांच्या सहकाराशिवाय पूर्णत्वाला जाणार नाही तेव्हा या खूप मोठ्या कार्यात रयत आणि सैनिक या दोघांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा असा आहे. शिवाय सैनिक आणि रयत यांना आपण आपल्यासोबत कायम जोडून ठेवण्यासाठी आणखी एक काम करायला हवं आणि ते म्हणजे आपल्या स्वराज्य निर्मिती या कार्याला एक ईश्वरी अधिष्टान सुद्धा निर्माण करून घ्यायला हवे. यासाठी आपण एक काम करूया. जिथे जिथे आपण गड – कोट- किल्ले बांधू तिथे तिथे किल्ल्यावर आपण शंभूमहादेवाचे मंदिर बांधू आणि किल्ल्याखालील आपल्या स्वराज्याच्या भूमीत विठ्ठलाची मंदिरे बांधू,
शंभूमहादेवाची मंदिरे ही सैनिकांना आपण घेतलेल्या स्वराज्य शपथेची सतत आठवण करून देत राहतील आणि दिशादर्शन करत राहतील. शंभूमहादेवाची पिंड ही कायम उत्तर-दक्षिण दिशा दाखवते. म्हणजे आपल्या सैनिकांना भूगोलाचा नीट अभ्यास होईल आणि त्यातूनच इतिहास निर्माण होईल. दिशा योग्य असेल तरच ध्येय प्राप्ती होते. तेव्हा वेग तर महत्त्वाचा आहेच. परंतु दिशाही तेवढीच महत्त्वाची आहे. जे आपले सैनिक भूगोलाचा नीट अभ्यास करतील तेच सैनिक आपला इतिहास देखील निर्माण करतील तेव्हा ज्याला ज्याला आपले ध्येय प्राप्त करताना इतिहास घडवायचा असेल त्याने त्याने आपला भूगोल नीट अभ्यासला पाहिजे. भू-गोल म्हणजे पृथ्वी गोल आहे. आणि याची आठवण म्हणूनच कपाळावर चंदनाचा गोल आणि तो गोल (goal) पूर्ण करण्यासाठीच योग्य दिशा आणि त्यासाठीच किल्ला तेथे शंभूमहादेवाचे मंदिर जरूर बांधा. पण ते बांधताना एक काळजी घ्या ही मंदिरे छोटी अशीच बांधा जेणेकरून एकावेळी यात चार पेक्षा जास्त माणसे एकाचवेळी आतमध्ये थांबू शकणार नाहीत. कारण चारपेक्षा जास्त लोक एकत्र आले की मग ते पवित्र मंदिरालाच कुचाळकी करण्याचा, कर्मकांड करण्याचा अड्डा बनवतील. तेव्हा सैनिकांना दिशा मिळेल याची काळजी घ्या पण ते सैनिक देवभोळे होणार नाहीत, कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या नादाला लागणार नाहीत याची पण काळजी घ्या. नाहीतर ध्येय राहीले बाजूला आणि सैनिक दुसऱ्याच अनावश्यक गोष्टीत अडकून पडतील.
प्रत्येक सैनिक ध्येयप्राप्तीसाठी तयार झाला पाहिजे. ध्येयप्राप्तीच्या दिशेने चालला पाहिजे. आणि वाटेवर हजारो संकटे आली तरी ती संकटे पेलून हलाहल विष पचवून देखील त्यांनी ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचले पाहिजे याचे प्रतीक म्हणजे शंभूमहादेव. सर्वस्व पणाला लावणारे, सर्वस्व अपर्ण करणारे आणि सर्वस्वाचा त्याग करणारे सैनिक निर्माण करणे हेच शंभूमहादेवाच्या स्थापनेचा उद्देश राहिला पाहिजे. आता राहता राहिली ती आपली रयत. आपण आपल्या रयतेसाठी सगळीकडे बांधायची ती केवळ विठ्ठलाचीच मंदिरे. विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्णाचेच आधुनिक रूप. या सावळ्या विठ्ठलाला जात-पात-धर्म उच्चनीच असा भेदभाव मान्य नाही. तेव्हा असं सर्व जाती जमातींना आपलेसे वाटणारे समतेचे प्रतीक असणारे श्री विठ्ठलाचे मंदिर जागोजागी बांधावे. जेणेकरून आपली रयत एकसंघ राहील. रयतेत एकोपा राहील आणि समाजात शांतता नांदेल. ज्या समाजात शांतता नांदत नाही तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही. तेव्हा आपल्या स्वराज्यातील रयतेला कायम शांतता अनुभवता यावी आणि त्यातूनच त्यांना समृद्धी मिळावी यासाठीच असे समतेची महता आणि महत्त्व सांगणारे विठ्ठलाचे मंदिर बांधावे. आपल्या स्वराज्यासाठी सैनिक म्हणून भरती होणारे लोक हे आपल्या स्येतीतलच असणार आहेत. तेव्हा ते सर्व जाती धर्माचे असतील. त्या सर्वांना एकोप्याने वागायला मिळाले तर जसा समाज एकनिसी राहील तसेच आपले सैन्य देखील एकसंघ राहील. आणि कलियुगात एकसंघ राहणं रयतेच आणि मैनिकांचे हे स्वराज्य या ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक अशीच बाब आहे. राजे आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी मी आणखी काम करणार आहे. आणि ते काम म्हणजे मी आपल्या मुकुटात मोरपिस लावणार आहे. मोरपिस ही तुमच्या ध्येयप्राप्तीचा सर्वोच्च असा मानबिंदू ठरेल. तुम्ही म्हणाल की मोरपिस कशासाठी आऊसाहेब तर तेही तुम्हाला सांगून टाकते. राजे मोरपिस हे यशोदामैयाने आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला सदैव मुकुटात धारण करायला लावले. मोरपिस हे राजेपणाचे लक्षण आहे. मोर हा पक्षांचा राजा असतो. तसा तुमच्या मनामध्ये आपण रयतेचा राजा आहोत ही भावना सतत येईल. मोर हा जंगलातील सापांना खातो. तर तुम्हाला रयतेच्या अन्यायाला कारणीभूत असणाऱ्या दुष्टांना संपवावे लागेल याची आठवण हे ही मोरपिसे देतील. श्रीकृष्णाची ओळख म्हणजेच मोरपिस. आणि सर्व रयत एकत्र करून त्यांचा काला करणे प्रत्येकाने आपण का आलो याचे आत्मपरिक्षण करून आपआपली जबाबदारी सांभाळून एकत्र येणे हाच तो काला. यासाठी श्रीकृष्ण यमुनाकाठी सर्व बालगोपाळ जमा करून काला करीत. जातीभेदाला मूठमाती हीच काला करण्याची मुख्य प्रेरणा आहे.
****************************************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
