११. विस्ताराची रणनिती बनवा.

११. विस्ताराची रणनिती बनवा.

शिवबाराजे आपणाला जे स्वराज्य उभे करायचे आहे ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने विस्तारीत देखील करावे लागेल. यासाठी काय करावे लागेल तर त्या तीन गोष्टीसुद्धा आज मी तुम्हाला सांगते. जेव्हा माणूस एखादे ध्येय आपल्या आयुष्याचे कार्य आणि ध्येय ठरवितो तेव्हा त्याच्यासमोर ते ध्येय कोणत्याही परिस्थितीत कितीही संकटे आली तरी प्राप्त करणे गरजेचे असते. ध्येय ठरविणाराने माघार घ्यायची नसते आणि माघार घेणारा कधी ध्येय गाठत नसतो. तेव्हा एकदा ध्येय ठरले की काहीही करून ते ध्येय प्राप्त करायचे त्यासाठी सुद्धा एक रणनिती असली पाहिजे आणि ती रणनिती खालीलप्रमाणे असली पाहिजे. वेगाने पुढे जात आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी लागणारी विस्ताराची रणनिती खालील तीन गोष्टींनी साध्य होते. त्या तीन गोष्टी खालीलप्रमाणे.

१. शिका – Learn

२. लक्ष केंद्रित करा – Focus करा.

३. आणि मग विस्तार किंवा वाढ करा. (growth & expansion)

यातील पहिली गोष्ट म्हणजे शिका. शिका म्हणजे आपल्याला ध्येयाकडे घेऊन जाणारी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट नीट शिकून घ्या. आपल्या ध्येयाकडे जाण्याबाबतचे जे-जे ज्ञान माहितीत येईल कळेल ते सर्व ज्ञान शिकून घ्या. ज्याला ध्येयाकडे जायचे त्या माणसाने सतत शिकत राहीले पाहिजे म्हणजे स्वतःचे ज्ञान काळाप्रमाणे अद्ययावत update करत गेले पाहिजे. जो थांबला तो संपला, जो चालेल तो जिंकेल तसं जो शिकणार नाही तो जिंकणार नाही आणि जो आपले ज्ञान माहिती, कौशल्य अद्ययावत update करणार नाहीत तो एकदा जिंकलेले राज्य टिकवू शकणार नाही. तेव्हा राज्य जिंकण्यासाठी
जसं अद्ययावत होणं गरजेचं असतं तसंच जिंकलेले राज्य टिकविण्यासाठी सुद्धा अद्ययावत व्हावं लागतं. म्हणून राजे आयुष्यभर नवनवीन गोष्टी अर्थात दुनियाभरच्या गोष्टी नव्हे तर आपल्या कामासदंर्भात आपल्या ध्येयाबाबतचे ज्ञान सतत अपडेट करत रहा.

आता दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष केंद्रित करणं. आपलं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित असलं पाहिजे. आपला Focus कायम आपल्या लक्ष्यावर असला पाहिजे. आपली सगळी ऊर्जा वेळ आणि पैसा ही सर्व साधने केवळ आणि केवळ लक्ष केंद्रित कामावरच लावली पाहिजेत. प्रसंग कितीही बाका असो, अडचणी अनंत येवोत, निसर्ग आपली संयमाची परीक्षा पाहो जे होईल त्या प्रसंगाला मोठ्या धीराने सामोरे जायचे आणि आपले लक्ष्यप्राप्तीसाठी कायम आपले लक्ष आपल्या कामावर केंद्रित असलं पाहिजे.

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील की आपणाला ते ध्येय प्राप्त करण्यापासून प्रवृत्त करू पाहतील परंतु आपण तसे होऊ द्यायचे नाही. प्रसंगी ध्येयाकडे जाणारा मार्ग बदलू, प्रसंगी रणनिती बदलू परंतु ध्येय मात्र बदलता कामा नये. माणूस जगातील कोणतेही अशक्य ध्येयसुद्धा प्राप्त करू शकतो

फक्त त्याने ध्येयावरील आपला फोकस गमावता कामा नये. जो युद्ध सुरू करतो तो युद्ध जिंकत नसतो तर तो शेवटपर्यंत मैदानात उभा राहतो तोच जिंकतो तसं शेवटपर्यंत आपलं लक्ष आपल्या ठरविलेल्या ध्येयावर असले पाहिजे. ‘नजर हटी तो दुर्घटना घटी’ तसं ध्येयाबाबतचं असतं. एका क्षणाची गफलत एका सेकंदाचा गाफीलपणा सगळ्या मेहनतीवर पाणी पाडू शकतो तेव्हा कायम सावध रहा, सतर्क रहा आपल्या ध्येयावर फोकस करत रहा.

आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विस्ताराची रणनिती बनवा. आपणाला आपले ध्येय प्राप्त करायचे तर तशी विस्ताराची रणनिती देखील बनवा, सांप्रत आपण आपले स्वराज्य वाढविण्यासाठी तीन मार्ग हाताळू शकतो. या तीन प्रमुख मार्गांनी आपण स्वराज्याचा विस्तार आणि वाढ (Expansion & growth) वेगाने करू शकतो ते तीन मार्ग खालीलप्रमाणे

१) युद्ध

२) मोहीम

३) छापा

स्वराज्य विस्तारासाठी उपयोगी पडणाऱ्या ह्या तीन रणनिती आहेत त्या कधी कशा कोठे आणि का वापरायच्या हे काळानुसार ठरविले जाईल. परंतु येणाऱ्या प्रत्येक संकटाला आणि संधीला सामोरे जाण्यासाठी आपल्याकडे हे तीनही मार्ग उपलब्ध आहेत, या रणनितीमुळे बऱ्याचदा आपणाला संकटाला संधीत रुपांतर करता येईल तर अनेकदा संधीला सुवर्णसंधीत बदलता देखील बेईल, तेव्हा आता या एक-एक रणनिती समजून घ्या.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!