११. विस्ताराची रणनिती बनवा.

११. विस्ताराची रणनिती बनवा.

२. सैन्य अजिंक्य असल्याची खात्री करा-

आता राजे मोहिमेसाठी अत्यावश्यक असणारी दुसरी बाजू म्हणजे जे सैन्य आपण सोबत घेऊन जाणार तेही खात्री करून तपासून घ्यावे. सैनिक अधिकारी खासे निवडक पण जीवाला जीव देणारे असावेत. शिवाय ते अजिंक्य असे असतील याची देखील खात्री करावी. कारण आपण परगावी उघड्या मैदानावर असणार तेव्हा कधी युद्ध होईल, कधी लढाई तर कधी छापा पडेल, कधी चकमक झडेल हे सांगता येणार नाही. अशावेळी आपली सुरक्षितता याच अधिकारी आणि सैनिकांच्या भरवशावर असते. तेव्हा ही माणसं देखील शूर, पराक्रमी, हरहुन्नरी त्याचवेळी जागरूक सतर्क असतील, प्रामाणिक असतील याची खात्री करून घ्या.

तेव्हा आपल्या सैनिकांची आपल्याच देशात परीक्षा घेतली तर ते सहज पात्र होतील. यापेक्षा आपण आपले राज्य सोडले की परीक्षा घ्यावी असा महाराजांचा बेत होता. आणि महाराजांनी तसेच केले. स्वराज्याची सीमा
ओलांडून महाराज भागानगरीत पोहोचले. येथूनच महाराज दक्षिण दिग्विजयी मोहिम सुरू करणार होते आणि इथेच सैनिकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा-घेणारा एका प्रसंग घडला तो असा.

महाराजांच्या तलवारीचे पाणी काय असते याचा चांगलाच अनुभव मोगलांना व आदिलशाहीला होताच. कुतुबशहा मराठ्यांच्या तलवारीची विष परीक्षा करू इच्छित नव्हता. त्यांने महाराजांशी तह केला व दोस्तीची भूमिका घेतली. महाराजांचे शाही स्वागत करून महाराजांचा मोठा सत्कार केला. मावळे लष्कर अंगावर घेणाऱ्यांना चांगलाच धडा शिकायला मिळायचा. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या नियमाप्रमाणे कुतुबशहाने स्वराज्याच्या वाढत्या ताकदीचा अंदाज घेऊन समयसूचकता दाखवून महाराजांशी सुलुख केला.

दुसऱ्या दिवशी एका मोठ्या प्रांगणात महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. महाराजांसोबत असणारे बरेच मावळे सडपातळ आणि काटक बांध्याचे. लोकांना वाटायचे तसे धिप्पाड, वजनदार असा एखादाच मावळा महाराजांच्या सैन्यात असायचा. आणि असे शिडशिडीत काटक मावळे पाहिल्यावर या असल्या सुडक्या लोकांकडून एवढा पराक्रम होत असावा याबद्दल कुतुबशहाच्या मनात शंका आली. परंतु तसे थेट विचारणे राजशिष्टाचाराला अनुसरून होणार नाही म्हणून त्याने आडपडद्याने परंतु हा विषय काढलाच. “महाराज, आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाबद्दल फक्त ऐकून आहोत. परंतु प्रत्यक्ष कधी पाहण्याची संधी मिळालीच नाही. आपल्याशी मैत्रीपूर्ण सुलुख असल्याने ते रणांगणांत तसा पराक्रम पाहण्याची संधी मिळणार नाही. तेव्हा या मैदानात एखादी झलक पहायला मिळाली तर भागानगरीच्या लोकांचा त्यांच्या कानावर विश्वास बसेल.” महाराजांना कुतुबशहाला काय म्हणायचे होते हे लक्षात आले.

महाराज म्हणाले, “तुम्ही आमच्या मावळ्यांच्या देहयष्टीकडे न पाहता त्यांच्या दृढ निश्चयाकडे पहा. त्यांच्या अंगाखांद्यावरून त्यांचे मूल्यमापन करण्याऐवजी त्यांच्या स्वराज्य निष्ठेवरून करावे. माझा एक-एक सर्वसामान्य
मावळा हा हत्तीच्याच ताकदीचा आहे. म्हणूनच संख्येने चारपट, आठपट असलेल्याला गनिमाला सुद्धा ते पळता भुई थोडी करतात.” यावर कुतुबशहा म्हणाला, “महाराज, आपल्या म्हणण्याला आमची संमती आहेच परंतु तुम्ही म्हटलाच आहात तर तुमच्या एखाद्या मावळ्याची खरोखरीच एखाद्या हत्तीशी झुंज लावली तर ते सिद्ध होईल का? महाराज म्हणाले, “आमच्या बोलात कोठेही कमतरता येणार नाही एवढा पराक्रम आमच्या मावळ्यांच्या मनगटात आहेच, आपण परीक्षा घेऊन पहावीच हवी तर म्हणजे खातरजमा होईल आपली. हत्तीशी झुंज देण्यासाठी आपणच एखादा मावळा निवडा. तो तुमचे मनोरथ पूर्ण करेल.” कुतुबशहाने सर्व मावळ्यांवर एक कुत्सित नजर फिरवून त्याच्या दृष्टीस पडलेल्या एकदम कडकासा मावळा निवडला. महाराजांच्या मावळ्यांची सत्त्वपरीक्षा घेणारा कुतुबशहा मावळ्यांच्या पराक्रमालाच आव्हान देऊन त्यांची शक्ती, युक्ती आणि रणकौशल्य याची चाचपणी करू पहात होता.

कुतुबशहाने त्या मावळ्याकडे बोट दाखविले आणि महाराजांना विचारले, “हा मावळा देईल का हत्तीशी झुंज?” तेव्हा महाराज म्हणाले, “तुमचा उन्मत्त हत्तीच काय, पण प्रत्यक्ष इंद्राच्या ऐरावतालाही लोळवणारे माझे मावळे शक्तीमान आहेत. त्यांची शक्तीपेक्षा युक्ती कशाप्रकारे श्रेष्ठ असते हे आपण उघड्या डोळ्यांनी आता पहालच.” त्या मावळ्याचे नाव होते येसाजी कंक. पायदळातील तो मावळा अनेक मोहिमांमध्ये महाराजांसोबत होता. त्याचा पराक्रम आणि अनुभव याची नोंद घेऊनच महाराजानी त्याला दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत सहभागी करून घेतले होते. महाराजांनी येसाजीला इशारा करताच धन्याची आन-मान आणि शान राखण्यासाठी येसाजी तयार झाला. महाराजांना मुजरा केला आणि समोरच्या मैदानात जाऊन उभा ठाकला.

कुतुबशहाने भला मोठा एक धिप्पाड जंगली हत्ती आणि तोही भरपूर दारू पाजलेला, येसाजीच्या झुंजीसाठी आणून मैदानात उभा केला. इशारा होताच माहुताने मद्यधुंद, बेफाम असा तो अफाट ताकदीचा हत्ती येसाजीच्या
अंगावर सोडून दिला. अंगावर धावत येणाऱ्या हत्तीला पाहून येसाजीने थोडे पळण्याचे नाटक केले. लोकांना वाटले येसाजी हत्तीला पाहून पळत आहे आणि पुढच्याच क्षणाला येसाजीने आपला मोहर वळवला. झटकन एका बाजूला फिरून विजेच्या वेगाने त्याने हत्तीचा रोख बदलला. आता मगाचे चित्र उलट झाले. वेगाने आलेला हत्ती आपला वेग नियंत्रित न करू शकल्यामुळे तसाच पुढे गेला आणि येसाजी त्याच्या मागे राहिला. हत्ती पुढे गेल्यावर त्याने वळण्याअगोदर येसाजीने हत्तीचा पाठलाग करून त्याचे शेपूट पकडले. येसाजीने हत्तीचे शेपूट एवढ्या जोरदार, घट्टपणे पकडले होते की, प्रसंगी हत्तीचे शेपूट तुटेल परंतु मिठी मात्र सुटणार नाही. येसाजीच्या हातातून शेपूट सोडविण्यासाठी आणि येसाजीला आपल्या पायाखाली घेण्यासाठी हत्ती बेचैन झाला होता. तो जागेवरच गरागरा फिरू लागला. पण येसाजी मात्र काही पाठ सोडत नव्हता. विशेष म्हणजे येसाजी हत्तीच्या मागील पायावर मधे-मधे लाथा मारून आपला तोलही सांभाळत होता आणि हत्तीला चवताळायला भाग पाडत होता.

हत्ती या प्राण्याची ताकद सर्वांना माहित असली तरी या ताकदवान प्राण्याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याला पटकन जागेवर वळता येत नाही. आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या ताकदवान प्राण्याला मागील पायाने साधी लाथही मारता येत नाही किंवा पाय जोरात झटकताही येत नाही. गनिमी काव्यात तरबेज असणाऱ्या महाराजांच्या मावळ्याचे शत्रूच्या कमजोरीवर असे नेमके लक्ष असायचे.शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ असे उगाच म्हटले जात नाही. त्यासाठी अगोदर शत्रूची कमजोरी शोधून त्या मर्मस्थळावरच हल्ला करावा लागतो. तासभर हत्ती गरगरा फिरून वैतागून गेला आणि सोंड वर करून, थकून चक्क खाली बसायला लागला. तेवढ्यात येसाजीने त्या हत्तीची शेपूट सोडली आणि कंबरेची तलवार बाहेर काढून हत्तीच्या पुढे सरकला. हत्तीने वर केलेली सोंड खाली येण्याच्या अगोदर एका क्षणात तलवारीचा एक जोरदार घाव त्याच्या सोंडेवर टाकून एका घावात सोंडेचे दोन तुकडे केले. हत्ती जागेवर
लोळत पडला. आणि काही वेळातच गतप्राण झाला. कुतुबशहाच्या वेड्या हट्टापायी एका निरपराध हत्तीचा बळी गेला होता. परंतु महाराजांचा एक-एक मावळा, शिलेदार हत्तीच्या ताकदीचा असतो हे मात्र कुतुबशहाने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले. आणि दख्खनचे राज्य शिवाजी महाराजांच्या हातात सुरक्षित राहू शकते याची त्याला खात्रीच पटली. त्याच्या पुढील काळात, कुतुबशाहीने मराठ्यांबरोबर असलेला तह मोडण्याची कधीच हिंमत केली नाही. उलट वेळोवेळी मराठ्यांकडे सलोखा कसा राहील, संबंध कायम कसे करता येतील यासाठीच प्रयत्न केले. मावळ्यांची पुन्हा परीक्षा पहाण्याची गरज पडली नाही.

आपले सैन्य अजिंक्य आणि पराक्रमी असल्याची महाराजांची खात्री होतीच ती आता आणखी पक्की झाली. आता मावळ्याची निष्ठा किती होती, स्वराज्य कार्यावर त्यांची भिस्त किती होती हे तपासणी करणारा देखील एक प्रसंग या मोहिमेत घडला आणि तो प्रसंग होता कोप्पळ प्रांतातील. महाराजांनी हैद्राबाद-भागानगरी सोडून पुढे निघाले आणि पहिलीच लढाई करण्याचा प्रसंग आला. महाराजांसोबत ४० हजार फौज होती. त्यात काही अनुभवी सरदार, अधिकारी, शिलेदार होते तसेच नव्या दमाचे तरुण मावळे देखील होते. यात संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि नागोजी जेधे असे तिघे होते.

महाराज दक्षिण दिग्वीजयी मोहिमेला जात आहेत असं कळल्याबरोबर बाजी जेधे यांचा हा मुलगा मोहिमेवर यायला एका पायावर तयार झाला. एक आठवड्यापूर्वीच याचं लग्न झालेलं. महाराजांनी सांगितलं तुला पुन्हा कधीतरी दुसऱ्या मोहिमेवर सोबत नेतो आता तु घरीच थांब. पण १६ वर्षाचं पोरगं काही केल्या ऐकेना. त्याने आधी लगीन कोंढाण्याचं हे उदाहरण महाराजांना सांगून महाराजांची बोलती बंद केली. आता पोरगं तर असं हट्टाला पेटलं की काही झालं तरी मी महाराजांसोबत मोहिमेवर येणारच असं म्हणू लागलं. शेवटी पर्यायाच राहीला नाही. महाराजांनी बाजी जेधेंना सांगितलं येऊ देत पोराला आपल्यासोबत मोहिमेवर आणि मग आला हा नागोजी महाराजांच्या सोबत.
कोप्पळ प्रांतात मराठ्यशांची गाठ पडली हुसेन खान मियाना याच्यासोबत. मराठ्यांनी आपल्या शिस्तबद्ध युद्ध रितीप्रमाणे त्याला चारही बाजूंनी बरोबर कोंडला आणि याचा हत्ती नेमका नागोजी जेधेच्या समोर आला. तरुण पोरगं संयम सुटला. युद्धाचा ज्वर अंगात चढलेला त्याने बचावाची फळी मागे टाकली आणि सताड घोडा ताणला. हाती असलेला भाला त्याने नेम धरून हुसेन खानाला मारणार तेवढ्यात हत्तीवरील अंबारीत बसलेल्या हुसेनखानाने आपल्या धनुष्यातून एक बाण सोडला आणि नागोजीचा भाला फेकला जाण्याआधीच त्याने सोडलेला बाण नागोजीच्या नरड्यातून-कंठातून आरपार गेला. नागोजी जेधे जागेवरच कोसळला. मराठ्यांनी युद्ध तर जिंकले, हुसेन खान ताब्यात आला होता. परंतु नागोजी जेथे बलिदान करून गेला होता. महाराजांनी बाजी जेधेंना विनंती केली की आपण हा मृतदेह घेऊन ताबडतोब परत कारीला जावे. तर बाजी जेधे म्हणाले महाराज मुलगा स्वराज्यासाठी जिथे शहीद झाला, तेथेच त्याचे अग्नीसंस्कार करेन पण परत माघारी जाणार नाही. तुमच्यासोबत आलो आहे, तुमच्या सोबतच परत घरी जाईन. आपल्या राजाला सोडून मोहिमेतून अर्धवट परत जाणार नाही. जेव्हा मोहीम संपेल आपण आपल्या घरी जाल तेव्हाच मी पण परत माघारी आपले घरी जाईन तोपर्यंत अजिबात नाही.

आणि बाजी जेधेंनी आपल्या नवीनच लग्न झालेल्या हळदीचे हात अजून तसेच पिवळे असलेल्या नागोजी जेधेचे अग्निसंस्कार तेथेच कोप्पळला केले आणि बाजी जेधे महाराजांसोबत पुढे दक्षिण दिग्विजयी मोहिमेला रवाना झाले. याला म्हणतात आपला राजा आणि स्वराज्य याबद्दलची निष्ठा. महाराजांना आता आपले सैन्य अजिंक्य आणि तेवढेच निष्ठावान असल्याची पूर्ण खात्री झाली. आणि मग सलग अठरा महिन्यांची दक्षिण दिग्विजयी मोहीम पूर्ण करून महाराज परत स्वराज्यात आले आणि प्रथम राजगडावर आपल्या घरी न जाता थेट नागोजीच्या घरी कारीला गेला. विधवा झालेल्या त्या मुलीचे सांत्वन केले आणि तिला नुकसान भरपाई म्हणून दरवर्षी शेरभर सोनं देण्याचा शब्द
दिला. जोपर्यंत ती मुलगी जीवंत होती तोपर्यंत दरवर्षी स्वराज्याच्या तिजोरीतून महाराज न चुकता एक शेरभर सोनं देत होते. याला म्हणतात राजाची आपल्या बलिदान केलेल्या सैनिकांप्रती निष्ठा. यथा प्रजा तथा राजा आणि यथा राजा तथा प्रजा. या प्रकरणाचा अर्थ एवढाच आहे की नवीन दुकान सुरू करण्याअगोदर पहिले दुकान नीट चालवा, नवीन फॅक्टरी काढण्याआधी असलेली नीट चालवा. ज्यांच्या भरवशावर नवीन फॅक्टरी काढायची ती माणसं तपासा. त्याची खात्री करून घ्या मगच उडी मारा, झेप घ्या नाहीतर एकदाचेच झोपाल. विश्वासू प्रामाणिक माणसं हीच राज्याची आणि कंपनीची संपत्ती असते हे लक्षात ठेवा. People first property Next हे तत्त्व समजून घ्या. राजमाता जिजाऊ साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे महाराजांना दोन दिग्विजय करून आपले राज्य सिंधूचे उगमापासून ते कावेरीच्या पल्याडपर्यंत विस्तारीत करायचे होते. त्यानुसार त्यांचा राज्याभिषेक झाला. त्याचवेळी म्हणजे ६ ऑक्टोबर १६७६ (दसरा) लाच पहिली दक्षिण दिग्विजयी मोहीम केली आणि सहा जिल्ह्यात असणारे स्वराज्य सहा राज्यातील ४८ जिल्ह्यात विस्तार केले. दक्षिण दिग्विजयी मोहिम ही महाराजांची आयुष्यातील पहिली आणि शेवटचीच मोहीम होय. कारण यानंतर महाराजांवर त्यांच्या मंत्र्यांनी विषप्रयोग केला आणि त्यातच महाराजांचे निधन झाले. महाराजांना दुसरा उत्तर दिग्विजय करून स्वराज्य पार पेशावर रावळपिंडीपर्यंत विस्तार करावयाचे होते. स्वराज्य तजांवर पर्यंत गेले परंतु दुसऱ्या मोहिमेअभावी पेशावरपर्यंत गेले नाही. परंतु ही त्रुटी नंतर मराठ्यांनी भरून काढली. मानाजी पायगुडे या मराठा सरदाराने अटकेपार झेंडे लावले. धनाजी जाधव, पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, दमाजी गायकवाड, रघोजी भोसले आणि पेशवा बाजीराव या सर्वांनी प्रयत्नपूर्वक स्वराज्याची सीमा सिंधूपार नेली आणि संपूर्ण भारतावर भगवा झेंडा फडकावून महाराजांचे ध्येय मराठ्यांनी पूर्ण केले. सलग ३५ वर्षे दिल्लीच्या लालकिल्ल्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला.
३. छापा :- स्वराज्य विस्तारासाठी आवश्यक असणारी तिसरी रणनिती म्हणजे छापा, छापा टाकणे म्हणजे काय तर ज्याठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करायचा आहे त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घ्यायची, नकाशा बनवायचा, शत्रूची कमजोरी हेरायची, किती सैन्य आहे. याची माहिती घ्यायची आणि ऐन मोक्याच्या वेळी शत्रू बेसावध ठेवून मग हल्ला करायचा, पण या हल्ल्याचा हेतू हा कधी युद्ध किंवा लढाई नसायचा तर तो असायचा केवळ आर्थिक, जेथे कारवाई करून केवळ आर्थिक फायदा पदरात पाडून घेणे हाच हेतू असतो त्यालाच छापा असे म्हणतात.

राज्यविस्तार आणि छापा टाकणे यांचा काय संबंध आहे असे म्हणाल तर तेही नीट समजून घ्या. शत्रूला नामोहरम करायचे तर अगोदर तो ज्या ताकदीवर उड्या मारतो, दादागिरी करतो ती आर्थिक ताकदच पूर्णपणे नेस्तनाबूत करायची. हाती पैसा राहिला तर सैन्य ठेवता येते. मग शत्रूकडून हेच पैसे काढून घ्यायचे आपोआप त्याचे सैन्य बळ कमी होते. आणि हेच पैसे वापरून आपले सैन्य वाढवता येते. किल्ले बांधता येतात, विकासकामे करता येतात आणि आपले राज्य आणखी बळकट करता येते. म्हणजे छापा टाकल्याचे दोन परिणाम सहज साध्य होतात आणि ते म्हणजे शत्रूला कमजोर करणे आणि आपण स्वतः प्रबळ होणे. शिवाय यात धोका बिलकूल कमी. छापा टाकायला लागणारा वेळ कमी, लागणारे सैन्य कमी आणि फायदा जास्त. तेव्हा महाराजांनी संपूर्ण आयुष्यात स्वराज्य वाढविण्यासाठी कोणती रणनिती सर्वात जास्त वापरली तर ती होती छापा टाकण्याची.

त्यामुळे स्वराज्याची आर्थिक घडी नीट बसत होती. सैन्यबळ वाढत गेले. गडकोट बांधता आले. आणि शत्रूला खिळखिळे करता आले. स्वराज्य वेगाने वाढत गेले. महाराजांनी टाकलेले छापे हे वाढत्या ताकदीचे आणि जास्तीत जास्त नफा पैसे मिळवून देणारे ठरत होते. सर्वात प्रथम चालून आलेल्या फतेहखानाचा खजिना महाराजांनी बेलसरवर छापा टाकून या कामाला सुरूवात केली. मग जुन्नर, नंतर जावळी, मग कल्याण, नंतर सुरत, नंतर बसरूर परत सुरत, नंतर लाडकारंजा आणि शेवटी जालना असे अनेक छापे
महाराजांनी टाकले. महाराजांचा हा छापा मारीचा सर्वात सोपा पर्याय पुढे मराठ्यांनी कायम केला. संभाजीराजांनी बु-हाणपूरवर छापा टाकला. पुढे तर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा संताजी-धनाजी या जोडीने तर छापा मारून मारून औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला सतत धापा टाकायला लावल्या. याच छापा तंत्राने मराठे लढत गेले आणि एक दिवस औरंगजेबाला त्याच्या सात लाख लष्करासह संपवून मराठ्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला.

आपणही आपल्या आयुष्यात राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणे युद्ध लढाया, मारामाऱ्या कमीत कमी करत जास्तीत जास्त छापे टाकून सुवर्णसंधी मिळालीच तर दिग्विजयी मोहीम करून आपला राज्याचा उद्योगाचा, धंद्याचा विस्तार करायला पाहिजे. रणनिती विस्ताराची उत्तम रणनिती कोणती तर ती काळाप्रमाणे ठरवा आणि शक्यतो जास्तीत जास्त लक्ष आर्थिक उभारणीवर देण्यासाठी छापा टाकायची सवय लावून घ्या. कारण ज्याच्या हाती पैसा त्याच्या हाती जास्त तंत्रज्ञान. त्याच्या हातीच जास्त लोक कामाला आणि तोच बाजाराचा जगाचा जास्तीत जास्त भाग जिंकणार. जगावर राज्य करणार. तेव्हा आता धापा टाकणे सोडा, थापा मारणे बंद करा आणि केवळ छापा आणि छापाच टाका. हिच आपले राज्य विस्तार करण्याची योग्य आणि उत्तम अशी पद्धत आहे.

 

 

शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त छापे मारले ते मोगलांच्या बाजारपेठांबर पर्यायाने मोगलांना आर्थिक झळ बसायची आणि त्यातून उत्पन्न कमी झाल्यामुळे सैन्य कमी करावे लागे. सैन्य कमी झाले की युद्धाची शक्यता कमी आणि सत्तेचा उन्मादही कमी होतो. आणि या बाजारपेठावर मारलेल्या छाप्यातून महाराजसुद्धा पुन्हा हेच चक्र नीट बसवायचे. अधिक पैसे अधिक सैन्य आणि अधिक विस्तार अशी महाराजांची रणनिती असायची.

ज्याला कोणाला आपला जम बसवायचा, सत्ता प्राप्त करून ती कायम करायची त्याने हे चक्र समजून काम करायला पाहिजे. उद्योग, व्यापार-धंदा, यातून पैसा, नफा, सुबत्ता आणि याच पैशातून वाढते मनुष्यबळ पदरी कामाला लावायचे. या माणसांच्या मदतीनेच सत्ता मिळवायची आणि ती कायम करायची. तेव्हा शहाण्या माणसाने सर्वात जास्त लक्ष हे उद्योग व्यापार धंदा यावर देऊन स्वतःचे राज्य निर्माण करावे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!