९४.बुद्ध आणि बुद्धिवंत डॉ. बी. आर. आंबेडकर !
शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा यशाचा मंत्र जगाला देणारे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र आहे. यशोशिखरावर पोहोचण्यासाठी शिक्षण हाच एकमेव राजमार्ग आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो जे पिणार तो कर्तृत्वाने गुरगुरणारच. तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरीने एका वेळेची भूक भागेल पण जन्मभराची भूक भागविण्याची ताकद फक्त पुस्तकांमध्ये आहे.
माणूस जन्माने नव्हे तर कर्माने किती मोठा होऊ शकतो. स्वकर्तृत्वाने स्वतः बरोबरच, समाज आणि देशाचे भविष्य घडवणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर. ते मूळचे रत्नागिरीचे; पण त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सुभेदार पदावर नोकरी करीत होते. बाबासाहेब फक्त ६५ वर्षे जगले. परंतु त्यांची कीर्ती अजरामर राहिली याचं महत्त्वाचं कारण ते स्वतः साठी न जगता समाजासाठी, भारत मातेसाठी जगले.
महात्मा गांधी म्हटलं की डोळ्या समोर चरखा येतो. पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी स्वतःजवळ फुलं बाळगत. पण बाबासाहेबांचा कुठलाही फोटो पाहिला तर त्यांच्या हातात राज्यघटनेचे पुस्तक असते. कारण ते पुस्तकावरच सर्वात जास्त प्रेम करत होते. ओशो म्हणतात ५००० वर्षांत बाबासाहेबांसारख बुद्धिमान व्यक्तिमत्व जन्म घेत असते.
बाबासाहेबांना जीवनाची दिशा दाखविली ती आई भीमाबाई, वडील रामजी सकपाळ आणि त्यांचे ब्राह्मण गुरुजी कृष्ण केशव आंबेडकर. भीमरावांना सवर्णांकडून त्रास होऊ नये म्हणून गुरुजींनी स्वतःचे आडनाव बाबासाहेबांना लावून शाळेत दाखल केलं. आणि भीमराव रामजी सकपाळचे भीमराव रामजी आंबेडकर झाले. पुढे भीमरावाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले.
त्या काळी दक्षिण आफ्रिकेत जसे निग्रोंना गुलामासारखी वाईट वागणूक दिली जात होती, तसीच वागणूक भारतामध्ये दलितांना दिली जात होती. म्हणून बाबासाहेबांचे बालपण अत्यंत संघर्षमय गेले. शाळेमध्ये त्यांना वर्गाबाहेर बसून शिकावं लागलं. सार्वजनिक नळावर पाणी प्यायला पण परवानगी नव्हती. शाळेतील शिपाई वरून पाणी ओतायचा आणि भीमराव ऑजळीने पाणी प्यायचे. कधी शिपाई सुट्टीवर असला तर बाबासाहेबांना दिवसभर पाण्याबिना राहावं लागत असे.
बाबासाहेबांना संस्कृत शिकायचे होते; परंतु तो अधिकारही त्यांना नाकारला गेला. पण बाबासाहेब जिद्दी होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना फार लवकर कळलं होतं म्हणूनच त्यांनी ३२ पदव्या घेतल्या. ४ डॉक्टरेट पदव्या मिळविल्या, त्यांचे ९ भाषांवर प्रभुत्व होतं. उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप दिल्याने अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सटी मध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. तिथे १८-२० तास वाचन करीत. लायब्ररी उघडण्याच्या अगोदर येत असत व सर्वात शेवटी ते जात असत.
२००४ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील टॉप १०० स्कॉलरची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर नंबर एकवर आहेत. त्यांना घर कोणीही भाड्याने देत नव्हते, कारण ते दलित होते. शेवटी त्यांनी पारशी बनून खोटे बोलून एक रूम भाड्याने मिळविली. त्यानंतर ते भारतात आले काही दिवसानंतर बाबसाहेब पुन्हा इंग्लंडला जाऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील कोर्स पूर्ण केला. जो कोर्स पूर्ण करण्यासाठी आठ वर्षे लागतात तिथे बाबासाहेबांनी तो फक्त २ वर्षे आणि ३ महिन्यांत पूर्ण केला. भारतात आल्यावर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली; पण उच्चवर्णीय विद्यार्थी त्यांच्या वर्गात बसायला तयार नव्हते. ती नोकरी सोडून त्यांनी वकिली सुरू केली.
१९२३ साली सरकारने जातिभेद कमी करण्यासाठी सार्वजनिक नळावर, तळ्यावर सर्वांना पाणी देण्यात यावे असा आदेश काढला. परंतु त्या तळ्यावर कोणी पाणी पिल्यास त्यांचे हातपाय तोडत असत. म्हणून बाबासाहेबांनी महाडचा ऐतिहासिक सत्याग्रह केला आणि चवदार तळ्यातील पाणी सर्वांसाठी खुले केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना समितीची स्थापन केली. काँग्रेसचा विरोध असताना महात्मा गांधींनी २८ ऑगस्ट ला बाबासाहेबांना राज्यघटना समितीचे अध्यक्ष बनविले. कारण त्यांच्या इतका शिक्षित आणि हुशार माणूस त्यावेळी भारतात नव्हता. त्यांनी आपल्या देशातील ६५०० जार्तीचा अभ्यासासोबत जगातल्या ६० देशांच्या राज्य राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांच्यामधील चांगल्या गोष्टी घेऊन आपल्या देशाची जगातील सर्वो त्कृष्ट राज्यघटना बनविली. त्यामुळेच २६ जानेवारी १९५२ पासून भारत देश प्रजासत्ताक बनला. महात्मा गांधींनी डॉक्टर आंबेडकरांना स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनविले. त्या काळी कामगारांना १२- १४ तास काम करावं लागत असे ते काम बाबासाहेबांनी ८ तासावर आणलं. डियरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता ही बाबासाहेबांचीच देण आहे. त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीच, म्हणजे बोलण्याचा अधिकार, आपल्या धर्माचा अधिकार, महिलांना मतदानाचा अधिकारही दिला. आजच्या काळातही कोणाला अर्थतज्ज्ञ व्हायचे असेल, कोणाला कृषी तज्ज्ञ व्हायचे असेल किंवा कोणाला धर्मपंडित व्हायचं असेल तरी बाबासाहेबांचा अभ्यास केल्याशिवाय होता येणार नाही हे आहे त्यांचे श्रेष्ठत्व. लहानपणीच बाबासाहेबांना दादा केळुस्कारांनी एक पुस्तक दिलं होत, त्याचं नाव आहे बुद्ध की जीवनी. त्यामुळे गौतम बुद्धाबद्दल लहानपणापासून ते वाचत होते. अनुभवत होते, समजून घेत होते. आणि शेवटी १४ ऑक्टोबर १९५६ ला. नागपूरला ५ लाख लोकांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
ज्यावेळी अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांना त्यांच्या धर्मात येण्याचं निमंत्रण दिलं परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर फक्त ७आठवड्यानंतर म्हणजे ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचं महानिर्वाण झाले. त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीत ३५ हजार पुस्तके होती. त्यावरून त्यांचं पुस्तकाबद्दल प्रेम आणि आदर समजून येतो. आपण बाबासाहेबांच्या विचाराचे १ टक्का जरी अनुकरण केले तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
