१५.आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.

१५.आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.

५) आपल्या यशाचे मोजमाप करत चला Constant Review mechanism

जी माणसं यशस्वी होत असतात ती नेहमीच आपल्या कार्याचं आपल्या यशाचं मुल्यमापन करत असतात. मुल्यमापन करणे म्हणजे काय तर आपण किती मेहनत करत आहोत आणि त्याच्या बदल्यात आपण किती कमावत आहोत याचा हिशोब करणं. आपण किती काम केलं आणि किती परिणाम मिळाला याचाही अभ्यास करणं म्हणजेच आपण आपल्या कष्टाचं मुल्यमापन करणं होय. जी माणसं असं मोजमाप करायला मुल्यमापन करायला वेळच काढत नाहीत किंवा ते मुल्यमापन नीट करू शकत नाहीत. अशा माणसांना आपण कमावत आहोत की गमावत आहोत आणि आपण जिंकत आहोत की हरत आहोत हेच कळायला मार्ग नसतो. मग मेहनत वाया जाते, वेळ वाया जातो, ऊर्जा संपते, पैसे संपतात आणि अशी माणसं मग खंगून कंगाल होऊन मरून जातात.

शेतकरी हा समाज जो कायम कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो. त्याला ही एकच गोष्ट जबाबदार आहे की तो कधी वेळ काढून याचे मूल्यमापनच करीत नाही की मी पेरतो किती उगवले किती, खर्च करतो किती? मेहनत करतो किती ? आणि कमावतो त्यात नफा होतो की तोटा ?

त्यामुळेच शिवबाराजे शहाणा माणूस नेहमी याचं मुल्यमापन करतो की मी काय केल्यावर काय होते आणि मी किती पैसे गुंतवल्यावर मला किती पैसे मिळतात. म्हणूनच आयुष्यात मोजून मापून कामे करत चला आणि प्रत्येक कामाचे मुल्यमापन करत रहा. आता हे मुल्यमापन कसे करायचे तर तेही नीट समजून घ्या. प्रथमतः आपल्या कागदाचे दोन भाग करा. एकावर श्रमाचे प्रमाण Effort score लिहा तर दुसऱ्या बाजूला प्राप्त प्रमाण म्हणजे Result score लिहा. थोडक्यात काय तर आपण नियोजित केलेली संख्या किती होती आणि आपण प्रत्यक्षात किती संख्येपर्यंत पोहोचलो याचे मोजमाप करायचे.
जा आपण नियोजित संख्या गाठू शकलो नाही तर ते का झाले नाही आणि किती कमी पडले? कसे कमी पडले? या सर्व बाबींचा विचार करायचा आणि पुढच्या वेळी झालेली चूक राहिलेली कमतरता दूर करायची. कधी कधी असं होतं, असं चालतं कधी-कधी, चलता है, It happens असं म्हणून आपण मुल्यमापन न करण्याची चूक कधी करायची नाही. आपल्या चुकांवर पांघरूण घालून त्या दुरुस्त करता येणार नाहीत. परंतु जर आपण योग्य मुल्यमापन करायला शिकलो तर मग मात्र एक तर चूक होणार नाही आणि जर झालीच तर ती वेळेत दुरुस्त तरी करता येईल. तेव्हा काम जरूर करा पण मुल्यमापन करायला विसरू नका. यशस्वी माणसं आपले आयुष्य असच बदलतात. लक्षात ठेवा जे यश मोजता येणार नाही त्याचे मुल्यमापनही करता येणार नाही. तेव्हा आपले यश मोजत चला. आपल्याला आपल्या यशाचे परिमाण कळेल आणि मग पुढे परिणाम वाढवता येतील.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!