कष्टाळू धुमाळ

कष्टाळू धुमाळ

हरहुन्नरी  आजोबा

आमच्या धुमाळ कुटुंबासाठी आमचे आजोबा आबासाहेब धुमाळ म्हणजे घरातील कर्ताधर्ता. त्यांना आम्ही नातवंडे ‘भाऊ’ म्हणायचो, त्यांचाही आम्हा नातवंडांवर प्रचंड जीव, आजीआजोबांसाठी नातवंडे ही दुधावरची साय असतात. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आम्हाला जपले. आजोबा अतिशय हिकमती म्हणून पंचक्रोशीत ओळखले जायचे. आमचा मुख्य व्यवसाय शेती होता. शेतीत आजोबा राब राब राबायचे. कष्टाचा बाऊ त्यांनी कधीच केला नाही. त्या काळात शिक्षणाचे महत्त्व इतके नव्हते. मुलगा हाताखाली आल्यावर शेतात जुंपला जायचा. हाच परंपरेप्रमाणे आलेला परिपाठ होता. आमच्या आजोबांना कष्टाचे बाळकडू जन्मतःच मिळालेले, ते लहानपणीच पोट भरण्यासाठी एकटे मुंबईला गेले होते. आजच्याप्रमाणेच त्या काळीही मुंबई सर्वांना सामावून घेणारी व कष्ट करणाऱ्यांचे चीज करणाऱ्याची आहे, अशीच ओळख होती. तर आमचे आजोबाही पोटासाठी स्वप्ननगरी मुंबईला गेले होते. सुरुवातीला काही काळ त्यांनी गोदी कामगार म्हणून काम केले. जहाजातून धान्याची पोती उतरविणे, माल चढविणे अशी कामे त्यांनी केली. हमालीच म्हणा ना. कोणतेही काम हलके नसते, असे ते नेहमी सांगत. पोटासाठी मुंबईत अशी हमाली करून चार पैसे गाठीला बांधत असताना एक अपघात झाला, सव्वा क्विटलचे पोते पाठीवर उचलून खाली उतरवत असताना त्यांचा तोल गेला व त्यांचा पाय मोडला. एवढे निमित्त झाले आणि त्यांचे काम गेले. पायाचे असे दुखणे आणि नवीन काम मिळण्याची आशा नसल्याने आजोबा पुन्हा गावी परतले व पुन्हा आपली शेती करू लागले. कष्टाच्या बाबतीत त्यांचा हात धरणारा गावात कोणी नव्हता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कुशाग्र बुद्धीचे होते. शाळेत गेले नसले तरी अंगभूत हुशारी त्यांच्यात ठासून भरलेली होती. प्रचंड निरीक्षणशक्तीच्या जोरावर ते अनेक गोष्टींत माहीर होते. त्यांची ही कीर्ती आजूबाजूच्या दहा-पंधरा गावांत होती. खेडेगावात त्या काळी बारा बलुतेदारी पद्धत होती. बलुतेदारांमध्ये सुतार, लोहार, कुंभार, न्हावी अशा व्यावसायिकांचा समावेश असे. त्यांच्या कामांना बलुते म्हणतात. आता अशी बलुतेदारी काळाच्या ओघात नाहीशी झाली असली, तरी त्या काळी गावगाड्यात बलुतेदारीला महत्त्व होते. बलुतेदार आपापल्या कामात कुशल असत.

माझ्या आजोबांना बलुतेदारांची जवळपास सर्वच कामे येत. त्यांनी ही कला कधी, कुठे, कशी साधली हे त्यांनाच माहिती, पण त्यांची ही कुशाग्रता मी लहान असताना जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. सुतारकाम, लोहारकाम, चांभारकाम, वडारीकाम अशी सर्व कामे ते अतिशय सफाईने करीत. त्यांचा या कामांमध्ये इतका दबदबा होता की, मूळ कारागीरही त्यांच्यापुढे कधी कधी फिका पडत असे. आजोबांचे हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ होते. विविध आर्ट्स अर्थात कला ते जाणत होते. कोणत्याही प्रकारच्या कलाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले नाही; परंतु ‘जिज्ञासा’ नावाची जी कला त्यांच्या अंगात भिनली होती, ती अफलातून होती. शोधक दृष्टी आणि ओतलेले मन यातून काही तरी निर्मिती होते, हे त्यांनी केलेल्या विविध कामांतून दिसून येते. या कलोपासक वृत्तीमुळे ते सहजपणे विविध अडचणींतून मार्ग काढीत असत. मला आठवते : आमच्या गावातील चावडीचे काम गावातील एका सुताराने केले होते. पण कामात कुठे तरी गडबड झाली व ती चावडी एका
बाजूला कलल्यासारखी वाटत होती. ओळंबा-गुण्यात ते काम चुकत होते. गावाच्या धुरिणांनी माझ्या आजोबांना बोलावणे धाडले, आजीयांनी कामाचे निरीक्षण केले व चूक लक्षात आणून दिली. त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक दुरुस्ती करण्यात आली व काम फत्ते झाले, या काळात त्यांच्या कामाचा उरक अतिशय दांडगा होता. भल्याभल्या मशिनरी ज्या कामापुडे हात टेकत, ती कामे आजओचा अतिशय सहजतेने करीत. १९५० चा काळ हा शेतीसाठी आव्हानात्मक होता. आजच्याइतके बोअर, पाईपलाईनचे प्रस्थ नव्हते. शेतीसाठी एक तर पावसाचा आधार, नाही तर मग विहिरीचा. विहीर खोदणेही आजच्याइतके सोपे नव्हते. तंत्रज्ञान इतके प्रगतही नव्हते. अशा काळात माझ्या आजोबांनी आमच्या शेतात पाणी येण्यासाठी स्वतःच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. तब्बल ११ पुरुष उंचीची विहीर त्यांनी खोदली. त्यामध्ये ४ पुरुष पहार टाकली. म्हणजे ३ इंची लोखंडी पहार वर ओवाणे व सोहणे असे करून खडकात छिद्र घेणे याला पहार टाकणे म्हणतात, आजच्या काळात बोअर मशीन जे काम करते, ते काम माझ्या आजोबांनी एकटघाने केले. विहीर खोदूनच न थांबता त्यांनी विहीर चिरेबंदी करण्यासाठी स्वतः दगड फोडले व पक्के बांधकाम केले. आज ७० वर्षांनंतरही या विहिरीचा एकही चिरा वासळलेला नाही. इतके मजबूत व टिकाऊ काम त्यांनी केलं, शेतीशी निगडीत अनेक कामे आजोबा अन्य कोणावर अवलंबून न राहता स्वतःच करीत. आमच्या घरी लोहार किंवा घिसाडी वापरतात तसा भाता होता. मी स्वतः लहान असताना माता फुंकलेला आहे. या भात्याचा उपयोग करून आजोबा आमच्याकडील शेती अवजारांना शेवटीत (धार करीत) होते. त्या काळात विहिरीतून पाणी काढायचे व शेतीला द्यायचे, तर आजच्यासारखे इंजिन नव्हते. विजेचा तर पत्ताही नव्हता. डिझेल इंजिन सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचे होते. अशा वेळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी व ते रानात फिरविण्यासाठी मोट बांधावी लागत असे, पाणी उपसण्यासाठी चामड्याची मोट वापरली जायची, ती मोट आजोबा स्वतः चामडे विकत आणून घरीच तयार करायचे, तीही अतिशय मजबूत, ती पाहून अशी मोट करणारे कारागीरही अवाक व्हायचे. कोणत्याही प्रशिक्षण वर्गात न जाताही त्यांनी या कला आत्मसात केल्या होत्या. खऱ्या अर्थाने ते कलोपासक होते.

आजोबा विविध कामांत कुशल होते. त्याचबरोबर ते अतिशय स्वाभिमानी व कडक शिस्तीचे होते. खोटेपणा त्यांना अजिबात आवडत नसे. खोटे बोलणाऱ्या व चोरी करणाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. आजोबांकडे १३-१४ एकर काळीची जमीन होती. त्यात पाण्याची सोय करण्यासाठी आजोबांनी ५ विहिरी खोदल्या. एक विहीर खोदताना ११ पुरुष खोदून आणि ४ पुरुष पहार टाकूनही पाणी खालून न येता खडकाच्या पाठीवरून म्हणजेच खडक चुनखडीच्या फटीतून येते, हे त्यांच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यावर त्यांनी बाकी विहिरी जास्त खोल घेतल्या नाहीत. कारण विहीर जितकी खोल, तितके पाणी मोटेने काढणे अवघड होते. इतके बारीक निरीक्षण करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. अनुभवातून ते एक एक गोष्ट शिकले व त्यात पारंगत झाले. ते एकटे दोन मोटा चालवीत. त्या काळी आजोबांना खिलारी बैल बाळगण्याची हौस होती. शेतकऱ्याच्या दारात पशुधन असायलाच हवे, असे ते आवर्जून सांगत. दरवर्षी ते कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जात व तेथील खिलारी गोन्हे (लहान वयातील बैल) आणत. त्यांचा शेतीसाठी उपयोग करताना ते बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे जपत, त्यांना जीव लावत. या काळात माझ्या वडिलांनीही आजोबांबरोबर कष्ट केले. रानात राबणाऱ्या या हातांना कालांतराने यश मिळू लागले. पै पैका गाठीशी जमा होऊ लागला. आजोबा व वडील दोघेही हिकमती होते. त्यांनी पै पै जमा करून १९६५ पर्यंत १२५ एकर शेतजमीन घेतली. माझे वडीलही दोन दोन नांगर एकटे चालवीत. मालकाकडून जीवापाड प्रेम मिळत असल्याने जनावरेही तितकेच कष्ट करीत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!