१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?
२) पैसा-money –
शिवबा राजे जगातील लोक आणखी एका कारणाने काम करतात आणि ते कारण म्हणजे पैसा होय. बहुतेक लोकांना पैसा प्रिय असतो आणि त्यासाठी ते वाट्टेल ते काम करू शकतात आणि असे लोक
आपला परका, स्वदेशी-विदेशी असा काहीही फरक न करता कोणासाठीही काम करू शकतात. अशा लोकांना केवळ आपला फायदा आणि आपले ऐश्वर्यसंपन्न जीवन यातच धन्यता वाटते. असे पैशासाठी काम करणारे आपल्या देशात अनेक लोक आहेत. यांना वतनदार, जहागीरदार असे म्हणतात. यांना केवळ स्वतःच्या जहागिरीत आणि वतनदारीत काम करणे आवडते. असे लोक एकप्रकारे वरच्या शोषक अशा सत्तेचे दलालच असतात, शोषकाच्या मदतीने शोषण करणारे किंवा लोकांचे शोषण करून शोषकाचे पोषण करणारे हे लोक असतात. या पैशासाठी काम करणाऱ्या भाडोत्री लोकांना ना समाजाचे सोयरसुतक ना देशाचा अभिमान.
हे लबाड लोक पैशांसाठी कोणाशीही हातमिळवणी करू शकतात आणि पैशासाठी कोणाचाही खून पाडू शकतात. तेव्हा अशा लोकांपासून कायम सावध रहावे. आणि हळूहळू प्रयत्न करत करत अशा फंदफितुरांना शासन करत करत देश एकजात करावा. अशा बेईमानांना तावडीत सापडले की कठोरात कठोर शासन करायचे. हे लोक वेळकाळ पाहून गयावयाही करतात आणि परत प्रतिकूल वेळ आली की पाठीवर वार देखील करतात. तेव्हा यांना माफीही देताच कामा नये.
राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांनी वतनासाठी अफजलखानाला सामील झालेल्या खंडोजी खोपडेचा चौरंग केला. चंद्रराव मोरे याने महाराजांना मारण्याचा कट केला तेव्हा त्यालाही ठार मारले. अशाचप्रकारे महाराजांनी कृष्णाजी भास्करपंत कुलकर्णी याला अफजलखान प्रसंगी मारला तर पुढे मुधोळच्या बाजी घोरपडेला देखील. शिवाय या लबाड, अप्पलपोटी लोकांना धडा मिळावा म्हणूनच महाराजांनी स्वराज्यात वतन देणे ही पद्धतच बंद करून अशा लोकांची पाळेमुळे उखडून टाकली.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
