उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

इंग्रजीचे भूत

औरंगाबादच्या त्या वेळच्या अनेक आठवणी आहेत. औरंगाबाद शहर म्हणजे मराठवाड्याची राजधानी, पुण्यासारखेच मोठे शहर आम्ही ग्रामीण भागातून आलेलो. कड़ा, आष्टी ही मोठी असली, तरी त्यांचा तोंडवळा ग्रामीणच. अशा वातावरणातून एकदम औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात आम्ही शिकायला आलो होतो, कॉलेजमध्ये गेल्यावर तिथल्या मुलांमध्ये आणि आमच्यातील फरक ठळकपणे जाणवायचा, आमचा पेहराव म्हणजे पायजमा, शर्ट व डोक्यावर टोपी. आजच्या भाषेत म्हणायचे, तर एकदम गावठीच. पायात स्लीपर असायची. सायन्सला असल्याने वर्गात सगळे इंग्रजी बोलत असत. माझे तर इंग्रजी आधीपासूनच कच्चे. प्राध्यापक इंगजीतूनच शिकवायचे, पण माझ्या ते डोक्यावरून जात असे. वर्गातील इतर मुलांना शिकविलेले समजायचे, आपणच मागे राहणार असे राहून राहून वाटायचे, या गोष्टीमुळे मी नाउमेद झालो होतो, खूप निराशा आली होती. असे साधारण तीन महिने गेले व पहिली घटक चाचणी परीक्षा झाली. त्याचा निकाल आला. मी मराठी वगळता बाकोच्या सर्वच विषयांत सपशेल फेल झालो होतो. या निकालामुळे तर मी आणखीच धास्तावलो. आता काय करायचे, असा प्रश्न पडला. पण एक ठरविले होते, आता पळून जायचे नाही. जे काही असेल, ते इथेच करायचे. आव्हानाला सामोरे जायचे. या काळात घरून पत्र यायची, मीही पत्र पाठवून खुशाली कळवायचो. पण कधीही इंग्रजी जमत नाही, याची वाच्यता केली नाही. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. मी ती भीतीच मनातून काढण्याच ठरविले. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात अनेकदा काल्पनिक भीती असते. त्या गोष्टीलाच धीटपणे सामोरे गेलो, तर भीतीही निघून जाते. त्यामुळे मी काय केले, आधी इंग्रजी विषयाची शिकवणी लावली, महिनाभरात इंग्रजी शिकायचा चंग बांधला. त्यासाठी ट्युशनवाल्यांकडे जादा तास थांबायचो. इंग्रजी व्याकरण पाठ केले, समजून घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. वार्षिक परीक्षा दिली. त्यात मी एटीकेटीने पास झालो. एफ.वाय.ला गेलो. एफ.वाय. लाही मन लावून अभ्यास केला. एटीकेटीचे राहिलेले विषय तसेच एफ.वाय. चे सगळे विषय देऊन काठावर का होईना पास झालो.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!