१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

२) स्वयंशिस्त :-

शिवबाराजे यशस्वी लोकांना असणारी ही दुसरी खूप महत्त्वाची अशी सवय आहे. यशस्वी लोक कोणाच्या दबावाने किंवा आदेशामुळे काम करत नाहीत तर ते काम करतात स्वयंप्रेरणेने स्वयं शिस्तीने. यशस्वी लोक स्वयंशिस्तीने काम करतात. यशस्वी होणारे लोक अंतः प्रेरणेने Self motivation ने काम करतात. त्यांनी जे काम अंगावर घेतलेले असते ते स्वतःच्या मर्जीने घेतलेले असते. आणि त्यामुळे ते काम करताना स्वयंस्फुर्तीने आणि स्वयंशिस्तीने करतात.

काम स्वंयशिस्तीने करणे म्हणजे ते काम आवडो ना आवडो ते काम गरजेचे आहे का? महत्त्वाचे आहे ना मग ते केलेच पाहिजे अशी यामागची भावना असते, विचार असतो. शिस्त या शब्दाचा अर्थच असा आहे की ती गोष्ट तुम्हाला आवडली तरी आणि आवडत नसेल तरी जी केलीच पाहिजे अशी गोष्ट. कारण ती गोष्ट केल्याशिवायय तुम्ही यशापर्यंत पोहोचूच शकत नाही. जी गोष्ट तुम्हाला यशाकडे घेऊन जाते ती गोष्ट तुम्हाला आवडलीच पाहिजे असा काही नियम असू शकत नाही. बऱ्याचदा तर असे होते की यशाकडे नेणाऱ्या गोष्टीच माणसाला आवडत नाहीत. अशावेळी हुशार माणूस आवड न बघता गरज पाहतो आणि ती सवय स्वतःला लावून घेतो आणि ती सवय पाळतो.

बघा ना ! आरोग्य तर सर्वांना पाहिजे पण व्यायाम करायला आवडतो
कर? तर नाही पण मग काय करावे लागेल तर व्यायाम करायला आवडो ज आवडो तुम्हाला जर चांगले आरोग्य हवे तर व्यायाम हा करावाच लागेल आणि ते शक्य तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही स्वयंशिस्तीने आठवड्यातील किमान पाच दिवस हे काम एक नियम म्हणून कराल.

अशीच गोष्ट आहे मनःशांतीची. तुम्हाला योगा करायला, मौन बाळगायला आवडत नसेल परंतु तरीही जर तुम्हाला मनःशांती, मनाची एकाग्रता हवी असेल तर तुम्हाला योगा करावाच लागेल ना? हीच गोष्ट आहे खाण्यापिण्याची, काही गोष्टी तुम्हाला खायला आवडतात पण त्या आरोग्याला हानीकारक असतील तर त्या तुम्हाला सोडून द्यावा लागतील आणि काही गोष्टी अशा असतील की ज्या तुम्हाला अजिबात खायला आवडत नाहीत. परंतु त्या पौष्टीक आणि आरोग्यवर्धक आहेत तर अशा गोष्टी खाव्याच लागतील. आणि यासाठी सुद्धा स्वयंशिस्त आवश्यक आहे.

स्वयंशिस्त म्हणजे अशी कामे जी पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुम्ही केलीच पाहिजेत अशी कामे. ती कामे तुम्हाला इतरांनी न सांगता, इतरांनी आग्रह न केला तरी स्वयंस्फूर्तीने करणे आवश्यक असते. तुम्हाला यशस्वी व्हायचे तर तुम्हाला स्वयंशिस्त ही लावावीच लागेल. तुम्हाला कोणी सांगणारे नसो किंवा तुम्हाला कोणी विचारणारे नसो जे आवश्यक आहे ते काम तुम्ही केलेच पाहिजे यालाच म्हणतात स्वयंशिस्त, मालक, राजा, अधिकारी समोर नसेल तो परगावी असेल तेव्हाही त्याच तडफेने त्याच निष्ठेने आणि त्याच प्रामाणिकपणाने आणि त्याच वेगाने काम सुरळीतपणे चालू ठेवणे या सवयीलाच स्वयंशिस्त असे म्हणतात. तेव्हा शिवबाराजे मी तुम्हाला विचारले नाही तरी तुम्ही याच पद्धतीने काम करायचे आणि तुम्ही विचारले नाही, तुम्ही परगावी गेला तरी स्वराज्याचे काम सुरळीतच सुरू राहील अशीच शिकवण आपल्या मावळ्यांना द्या आणि तशी सवय त्यांना लावा. जेणेकरून तुमच्या गैरहजेरीतच काय पण तुमच्या निधनानंतरही मावळ्यांनी त्याच स्वयंशिस्तीने काम केले पाहिजे अशी त्यांना सवय लावा. पालकांनीही आपल्या मुलांना अशाच स्वयंशिस्तीचे धडे दिले पाहिजेत. त्यासाठी
जी सवय मुलांना लावायची आहे ते काम सलग एकवीस दिवस त्यांच्याकडून करून घ्या. पुढे आयुष्यभर ही गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडून आयुष्यभर स्वयंशिस्तीने मुले ते काम करत राहतील. याला

मानसशास्त्राचा एक मोठा सिद्धांत पुरावा म्हणून सांगता येईल. आपल्या मनाला, बुद्धीला आणि शरीराला जर एखादी गोष्ट करायची एकवीस दिवस सराव केला तर ती गोष्ट आयुष्यभर त्या माणसाची सवय बनते. म्हणूनच आपण मुलांना घडविण्यासाठी असे किमान २१ दिवस फक्त कष्ट करायची तयारी ठेवा. आणि यासाठी वय वर्षे ७ ते १२ हे सर्वात उत्तम आहेत. शिस्त स्वयंशिस्त लावायला आणि जर थोडा उशीर झाला तरी काळजी करू नका. जेव्हा लक्षात येईल तेव्हापासून तरी हा एकवीस दिवसांचा कोर्स आपल्या मुलांकडून करून घ्या. तुम्ही स्वतः ते करून पहा. तुम्ही केलं तर मुले आनंदाने तुमच्या मागोमाग ते म्हणतील, करतील आणि स्वतः तसे वागतील. मुलांनी टिव्ही बघू नये असं फक्त सांगू नका. तुम्ही स्वतः टिव्ही पहायचे २१ दिवस टाळा. हिच गोष्ट मोबाईल आणि इतर गोष्टींची. या गोष्टीचे नियम प्रथम पालकांनी स्वतः पाळले की मुलांनी पाळणे सहज सोपे होऊन जाते.

राजमाता जिजाऊंनी स्वतः स्वयंशिस्त बाळगली. आपला संसार करताना त्यापेक्षा जास्त प्राधान्य रयतेच्या संसाराला दिलं. हिच शिकवण महाराजांनी स्वतः अंमलात आणली आणि मग मावळ्यांनी सुद्धा प्रथम माझं स्वराज्य मग माझे कुटुंब आणि शेवटी मी हिच स्वयंशिस्त जपली सांभाळली. म्हणून लहान मुलांनी, रयतेने जे काम करावे असे वाटते ते प्रथम पालकांनी आणि राजाने करून पहावे. स्वतः कृती करावी मग इतरांना सांगावी म्हणजे त्याचा प्रभाव पडतो. लोक किंवा मुले आपलं मनापासून ऐकतात आणि कृती करतात.

महाराजांनी आपल्या सैनिकांना अधिकाऱ्यांना स्वयंशिस्त आहे की नाही हे अनेकदा तपासले. यातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे तो महाराज आठ्याला जाताना, पुरंदरच्या तहानुसार महाराज राजगड सोडून अण्याला निघाले. आणि अचानक महाराजांना वाटले की आपण आपल्या गैरहजेरीत आपले लोक कसे काम करतील याची तपासणी करूया. आणि मगच पुण्यातून
पुढे सरकुया. त्यानुसार अचानक महाराजांचा मोर्चा लोहगड किल्ल्याकडे रात्रीच्याच वेळी सरकला. लोहगड किल्ला तपासणी करून खात्री करावी असे. महाराजांच्या मनात का आले असेल? तर सुरतेहून आणलेले बरेच पैसे याच किल्ल्यावर ठेवलेले होते. म्हणून आपण अठ्याला गेलो तर पाच-सहा महिने आपण स्वराज्याच्या बाहेर लांब राहणार. अशावेळी शत्रू आपली माणसं फोडायचा प्रयत्न करणार तर मग तो सर्वप्रथम कोणते किल्ले, कोणते अधिकारी यांच्यावर जाळे फेकणार तर जिथे जास्त संपत्ती आहे असेच किल्ले ते निवडणार म्हणून महाराजांनी लोहगड जवळ केला.

किल्लेदाराला साम-दाम-दंड भेद असे सगळे प्रकार महाराजांनी वापरून रात्रीचाच किल्ल्याचा दरवाजा उघडायला सांगितले पण त्याने काही ताकास तूर लागू दिली नाही कोणत्याही प्रकाराने त्याने किल्ल्याचा दरवाजा उघडलाच नाही. प्रत्यक्ष महाराजांना रात्रभर किल्ल्याच्या बाहेर ठेवले. हा सर्व वृत्तांत मी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ या माझ्या पुस्तकात सविस्तर Discipline शिस्त हा मुद्दा सांगताना स्पष्ट केलं आहे. आपण ते पुस्तक जरूर वाचावे. आता पुढे चलू.

असाच एक प्रसंग आहे महाराजांच्या निधनानंतरचा. छत्रपती संभाजी राजांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली. त्या समाधीची देखभाल करण्यासाठी एका मावळ्याची नियुक्ती केली. आणि त्याला आदेश दिला की काहीही झाले तरी इथे रोज दिवाबत्ती लागली पाहिजे. पूजा केली गेली पाहिजे आणि हा नित्यनेम तुटता कामा नये. या आदेशानंतर एक वर्षांनी झुल्फीकारखानाने रायगडाला वेढा घालून रायगड किल्ला ताब्यात घेतला. सगळा गड मोकळा केला गेला. महाराणी येसुबाई आणि बाल शाहू कैद झाले. पण एक मावळा मात्र रायगडावरच राहीला. झुल्फीकारखानाने याला रायगड उतरायला सांगितला तर तो साफ नाही म्हणाला. तो म्हणाला हवे तर माझी गर्दन मारा परंतु मी काहीही केल्या रायगड उतरणार नाही. कारण माझा राजा अजून जिवंत आहे आणि मी त्याच्या समाधीपासून एक क्षणभर देखील दूर जाऊ नये अशी माझ्या धाकल्या धन्याची आज्ञा आहे तेव्हा हे दिवाबत्तीचे
काम मला काही सोडता येणार नाही आणि मी मरेपर्यंत हे काम मला चालूच ठेवायचे आहे.

खानाने यांच्या स्वयंशिस्त आणि देशप्रेमापुढे गुडघे टेकले. विशेष परवानगी काढून विशेष बाब म्हणून औरंगजेबालासुद्धा या कामाला मंजूरी द्यावी लागली. यालाच म्हणतात स्वयंशिस्त. शासन बदलले परंतु माणसांचे ईमान तेथेच राहीले. स्वयंशिस्तीचे एवढे मोठे उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणे शक्यच नाही. पण असा इतिहास आपलेच लोक अभ्यासक्रमात आमच्या मुलांना का शिकवत नाहीत हे एक मोठे कारस्थान वाटते. इतिहास फक्त प्रेरणा देण्यासाठी नसून दैनंदिन जीवनात जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे हे इथल्या लोकांना का कळत नाही. तेव्हा इतिहास आपल्या मुलांना शिकवा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करा हिच खरी स्वयंशिस्त आहे असे मला वाटते.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

error: Content is protected !!