‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…

‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…

असेही मित्र गवसतात…

मी बँकेत कर्ज विभागात काम करताना एक असाच प्रसंग घडला व मला एक चांगला मित्र मिळाला, त्याची मला माझ्या लहान भावाच्या विक्रमच्या नोकरीवेळी खूप मदत झाली. अनिल चव्हाण हे त्याचे नाव. तो एका फर्ममध्ये काम करायचा. ही कंपनी साखरकारखान्यांना केमिकल, ग्लासवेअर यांचा पुरवठा करायची. त्याचा मालक मारवाडी होता. अनिल चव्हाण या कंपनीत रिकव्हरीचे काम करायचा. त्यामुळे त्याची कायम अर्मती असायची. ओळखपाळख चांगली झाली होती. कंपनीच्या कामासाठी तो आमच्या बँकेत कायम यायचा. मला आवर्जून भेटायचा. काही दिवस गेल्यावर त्याला स्वतःला स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा झाली. त्याने त्याच्या मालकाजवळ ते बोलून दाखविले. आत्ता मालकाला असा कार्यक्षम माणूस गमवायचा नव्हता. परंतु त्याने वर वर चव्हाणला प्रोत्साहन दिल्यासारखे केले. स्वतंत्र धंदा सुरू करायचा तर बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार चव्हाणने आमच्या बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला. मी कर्जविभागातच असल्याने त्याची फाईल माझ्या हाताखालूनच वरिष्ठांकडे जाणार होती. पण आधी वरिष्ठांकडून तसे निर्देश असावे लागतात. आमचे कर्जविभागाचे मॅनेजर हे चव्हाणच्या मालकाशी चांगले संबंध ठेवून होते. त्यामुळे त्याचा उपयोग करून त्याचा मालक कर्ज प्रकरण मंजूर होणार नाही हे पाहत होता. परंतु चव्हाणला सांगताना मात्र तो वेगळेच सांगायचा. तो त्याला म्हणायचा, “तुझ्या कर्जप्रकरणात धुमाळ हाच अडसर आहे. तो तुझा मित्र असल्याने तो तुझ्याकडून पैसे मागू शकत नाही. त्यामुळे तुझं कर्ज अडवून ठेवलं आहे.”

खरे तर कर्जप्रकरणातील खरा अडथळा मालक स्वतःच होता. कारण त्याने माझ्या दाक्षिणात्य वरिष्ठाकडे तशी फिल्डिंग लावलेली होती. आमचा तो वरिष्ठही भ्रष्टाचारीच होता. त्यामुळे तो त्या मालकाच्या कलानेच काम करायचा. परंतु त्या मालकाने अनिल चव्हाणच्या मनात माझ्याविषयी विष कालवलं.

दुसरीकडे तो मालक बँकेत आल्यावर माझ्याशी लाडीगोडीने बोलायचा. मला म्हणायचा, “तुम्ही किती प्रामाणिक आहात, हे मला माहिती आहे. पण तुमचा मित्र अनिल चव्हाण जरा लबाड आहे. तो सगळ्यांना सांगतो की, धुमाळ भ्रष्टाचारी आहे, पैसे घेतल्याशिवाय कर्ज प्रकरण पुढे सरकवत नाही.”

हे ऐकल्यावर मला खूप राग आला. नंतर चव्हाण जेव्हा बँकेत यायचा, तेव्हा मी त्याच्याशी कामापुरतेच बोलायला लागलो. त्याला टाळण्याचा प्रयत्न करायचो. काही दिवस गेले. मला ती तारीख चांगली आठवते. ३० जून १९८७. संध्याकाळी माझी सुटी झाली. मी गाडी काढली आणि घरी चाललो होतो. मोंढा नाक्यावर सिग्नल लागला म्हणून मी गाडी थांबविली होती. तेवढ्यात अनिल चव्हाण कुठून तरी उगवला व माझ्यासमोर उभा राहिला. तो म्हणाला, “सर, मला तुमच्याशी दोन मिनिटं बोलायचं आहे.” मी रागातच होतो. मी म्हणालो, “बँकेचं काम असेल, तर बँकेत येऊन भेटा, इथं रस्त्यावर मी अजिबात बोलणार नाही.” त्याने विनंती केली, नंतर अक्षरशः रडायला लागला. ते पाहिल्यावर मी जरा शांत झालो. गाडी रस्त्याच्या कडेला घेतली व त्याला म्हणालो, “बोला, काय काम आहे?” त्याने मला रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका आईस्क्रीमच्या दुकानात नेले. तो म्हणाला, “तुम्ही माझं प्रकरण का मंजूर करीत नाही? मी माझ्या मालकाकडे तुमच्यासाठी पैसेही पाठविले आहेत. तरीही तुम्ही प्रकरण पुढे सरकवत नाही.” मी उडालोच. हे तर भलतेच काही तरी आहे, हे माझ्या लक्षात आले. मी म्हणालो, “तू आधी सांग की, मी कुणाकुणाकडून पैसे घेऊन कर्ज वाटलं. तूच माझी सगळीकडं भ्रष्टाचारी म्हणून अशी बदनामी का करतोस?” त्यालाही माझ्या या बोलण्याचे आश्चर्य वाटले. आमच्या दोघांच्याही डोक्यात मग प्रकाश पडला. काय घडले, कुणी घडवून आणले हे आम्हाला कळले, त्याच्या मालकाने केलेला लुच्चेपणा आमच्यातील संवादामुळे उघडा पडला होता.

मी अनिल चव्हाणला शब्द दिला, “तुला कर्ज मिळवून देईन. पण तू स्वतंत्र व्यवसाय करायचा. त्या मालकाला कायमचा रामराम ठोकायचा.” तो तयार झाला. आमच्या ब्रँचमध्ये त्याच्या मालकाचे आमच्या वरिष्ठांशी गूळपीठ असल्याने प्रकरण मंजूर होणार नाही, हे मी त्याच्या लक्षात आणून दिले. मग मी एक गोष्ट केली. मी त्याला आमच्या मोंबा ब्रँचमध्ये कर्जासाठी अर्ज करायला सांगितले. त्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी बँकेत जाण्यापूर्वी मी त्याला घेऊन मोंढा ब्रँचमध्ये गेलो. तिथे प्रफुल्ल देसाई मॅनेजर होते. माझे अतिशय घनिष्ट मित्र होते. अतिशय प्रामाणिक अधिकारी होते. मी त्यांच्याकडे अनिल चव्हाण यांच्या कर्जासाठी शिफारस केली. त्यांनी लगेच सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. त्यांच्याच सूचनेनुसार चांगले प्रपोझल तयार केले. सोमवारी अॅग्रिमेंट करायचे ठरले. मी त्याच्यासाठी जामीनदार झालो. अवघ्या तीन दिवसांत त्याला एक लाखाचे कॅश क्रेडिट कर्ज मिळाले. त्याच्या धंद्याची रुजवात झाली.

एवढे सगळे चांगले झाले, तरी कसे काय कोण जाणे अनिल चव्हाणला बहुधा सरळमार्गाने कर्ज वगैरे भेटते यावर विश्वास नसावा. तो एके दिवशी माझ्या घरी आला. मला व पत्नीला पेढे दिले. नंतर तो म्हणाला, “तुम्ही तर काही घेणार नाही, हे मला माहिती आहे. तरीही माझी अशी इच्छा आहे की, देसाईंना काही तरी भेट दिली पाहिजे. एव कर्जाचं काम त्यांनी करून दिलंय.” त्याने एक दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी आणली होती. मी हतबुद्ध झालो. मी त्याला सांगितले, “चांगली गोष्ट आहे, तू ही अंगठी घेऊन देसाईकडे जा. मग पहा काय होतं ते. ते तुझं कर्ज अजनूही रद्द करून तुला अपमानित करून हाकलून लावतील.” मी त्याची समजूत घातली, “जगात सगळेच लोक अप्रामाणिक नसतात. प्रामाणिक माणसंही आहेत. कदाचित तुला आतापर्यंत अशी प्रामाणिक माणसं भेटली नसतील.” एवढे सांगितल्यावर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो पाया पडला व त्याने माफी मागितली. “परत अशी चूक करणार नाही.” म्हणाला. मग त्याने मला विनंती केली की, “बाकी काही नाही, पण आपण सगळे हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. त्याला नाही म्हणू नका.” मी हसत या गोष्टीला होकार दिला. अनिल चव्हाणची मला माझ्या धाकट्या भावाच्या नोकरीवेळी मदत झाली. चव्हाणच्या ओळखीतून विक्रमला राज्य सहकारी बँकेत नोकरी मिळाली. आज विक्रम मुंबईला राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात अधिकारीपदावर कार्यरत आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!