वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र

वैयक्तिक ब्रँडिंग + नेटवर्किंग व्यवसायवृद्धीचा मूलमंत्र

आपला वैयक्तिक ब्रँड नेटवर्किंगद्वारे कसा तयार करावा?

१. आपला संदेश स्पष्ट ठेवा : आपला वैयक्तिक ब्रँड हा सुस्पष्ट असायला हवा. आपण कोण आहोत, काय करतो, आणि आपल्याला काय साध्य करायचे आहे, हे स्पष्ट असावे. प्रत्येक नेटवर्किंग संधीचा योग्य वापर करून आपली ओळख वाढवा. आपला संदेश प्रभावी पद्धतीने पोहोचवा.

२. नियमितता राखा : नेटवर्किंग हा सततचा प्रवास आहे. त्यासाठी नियमितपणे नेटवर्किंग मिटिंग्समध्ये सहभागी व्हा. यामुळे इतरांशी ओळखी टिकून राहतात आणि सातत्यपूर्ण उपस्थितीमुळे आपला आणि आपल्या व्यवसायाचा ब्रँड दोन्ही लोकांच्या मनात खोलवर रुजतात.

३. वेगळेपण जपणे : आनंदी आणि हसतमुख राहा. प्रत्येकाला आवर्जून भेटा. भेटीमध्ये आपले व्यक्तिमत्व आणि व्यवसायातील वैशिष्ट्ये अधोरेखित करा. आपल्यामध्ये असलेले वेगळेपण जतन केल्यास आपला ब्रँड इतरांपेक्षा नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक ठरेल.

४. उपयुक्तता दाखवा : आपला व्यवसाय इतरांसाठी कसा उपयुक्त आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायामुळे इतरांना काय फायदे होऊ शकतो, त्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे होऊ शकतात, हे दाखवून दिल्यास लोकांचा आपल्यावर अधिक विश्वास बसेल.

५. विश्वास निर्माण करा : विश्वास हाच यशाचा पाया आहे. आपल्या नेटवर्कमध्ये विश्वासार्हता निर्माण करा. आपली शिस्त, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, मदत करण्याची तयारी, उत्साह, स्वभाव असे अनेक गुण पाहून लोक आपल्यावर विश्वास ठेवतील, ज्यामुळे आपली ओळख बळकट होईल.

६. परस्पर सहकार्य करा आणि प्रेरणा द्या : नेटवर्किंगमधून सहकार्याची वृत्ती वाढवा. आपण एकमेकांना प्रेरणा देऊन, शिकवून आणि एकत्र काम करून अधिक यशस्वी होऊ शकतो. एकमेकांवर विश्वास ठेवून कार्य केले तर त्यातूनच मजबूत नाते निर्माण होऊ शकते.

७. शिकण्याची वृत्ती ठेवा : प्रत्येक नेटवर्किंग मिटींगमधून काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवा. इतरांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून शिकण्याची वृत्ती ठेवा. हे शिकण्याचे अनुभव आपल्याला अधिक कणखर बनवतात.

८. सकारात्मकता ठेवा : नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपले आनंदी व सकारात्मक व्यक्तिमत्त्वच इतरांना आपल्याकडे आकर्षित करते. हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या ब्रँडला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे इतर लोक तुमच्यासोबत जोडले जातात.

९. संवाद कौशल्याचा विकास करा : आपले संवादकौशल्य आपल्या वैयक्तिक ब्रँडचे प्रतिबिंब असते. स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंवादी पद्धतीने संवाद साधा. आपले शब्द, आपला आवाज आणि आपला आत्मविश्वासच इतरांना आपल्याकडे आकर्षित करतो.

१०. एक मिनिटाचे प्रभावी पिच तयार ठेवा : आपला व्यवसाय, आपले उद्दिष्टे आणि आपली ओळख एका मिनिटात स्पष्ट करणे आवश्यक असते. प्रभावी पिच तयार ठेवा, त्याचा सराव करा. जेणेकरून आपण कधीही आपल्या व्यवसायाची ओळख प्रभावीपणे सांगू शकतो.

 

लेखक- ब्रँडबाँड निलेश बी
(लेखक डिझायनर, कोच आणि ब्रँड सल्लागार असून त्यांनी ‘उद्योगऊर्जा’ या फोरमचे संस्थापक आहेत. त्यांनी ब्रँडिंग या विषयावर ‘सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे.)
संपर्क : 8879230443

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!