स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
यशस्वितेचा पाया शाळा, कॉलेजातच रचावा
आपल्याकडे शाळा, कॉलेजमध्ये शिकताना मुलांसमोर फक्त पास होण्याचे ध्येय असते. वास्तविक १० ते २२ या दरम्यानचे वय अतिशय महत्त्वाचे असते. या वयातच आयुष्याची दिशा ठरविली पाहिजे. पण अनेकदा कॉलेजचे शिक्षण पूर्ण होत आले, तरी मुलांचे पुढे काय करायचे हे ठरलेले नसते. ‘पाहू डिग्री हातात आल्यावर’ अशी भूमिका असते. त्यानंतरही त्याने काय करावे, हे पालक किया नातेवाईकांच्या सल्ल्यावर ठरते. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या नावाडवाला आपल्याला नक्की कोठे जायचे हे माहिती असायला पाहिजे, नाही तर बोट नुसतीच भरकटत राहील. दिशाहीनता यालाच म्हणतात. त्यापेक्षा योग्य वयातच पुढे काय करायचे ठरविले, तर माट सापडू शकते. व्यवसाय करायचा असेल, तर त्या क्षेत्रातला अनुभव घेण्यासाठी शिक्षण घेतानाच पार्टटाईम जॉबही केला पाहिजे, या संदर्भात व्यापारी त्यातल्या त्यात मारवाडी समाजाचे गुण घेणे आवश्यक वाटते. हा समाज कंजूष म्हणून लोक त्यांची अवहेलना करीत असतात; परंतु ते खरे नाही. विनाकारण पैसा खर्च करणे, फालतू गोष्टीसाठी खिसा रिकामा करणे यात ते कंजुषी जरूर दाखवितात; परंतु मिळालेल्या धनाचा योग्य वापर ते करतात. आपले भौतिक जीवन सुखकर करण्यासाठी सढळ हाताने ते पैसा सोडतात. ते एखाद्या दुकानात, कंपनीत, संस्थेत कमी पगारावर नोकरी करतात; परंतु नोकरी एके नोकरी करीत न बसता, त्या व्यवसायातील सखोल ज्ञान प्राप्त करतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. त्यामुळेच त्यांच्या हाताची पाचही बोटे कायम तुपात असतात. मराठी माणसाला हेच जमत नाही; किंबहुना ते त्याला नको असते. ‘व्यवसायाला मांडवल लागते’ असे म्हणत तो व्यवसायापासून दूर राहतो. भांडवल ज्ञानातून निर्माण करायचे असते, हे त्याला माहीतच नसते. पदव्यांचे भेंडोळे घेऊन मग तो नोकरीसाठी भटकत असतो. मीही नोकरी केली; परंतु ती करताना व्यवसायज्ञानही आत्मसात केले आणि मी पक्का व्यावसायिक झालो. मराठी माणसांनी असेच आपले जीवन सुधारावे, एवढयासाठीच मी हे सांगतो आहे. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञान, संगणकाचे युग आहे. या क्षेत्रात नवनवीन काय करता येईल, याचा शोध घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा क्षेत्र निवडल्यावर झोकून देऊन काम केले पाहिजे. बिल गेट्स ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखली जाते. त्याने वयाच्या सतराव्या वर्षी स्वतःची मायक्रोसॉफ्ट कंपनी थाटली व त्या कंपनीला जगातील सर्वात मोठी कंपनी बनवले.
लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गायला सुरुवात केली. कुटुंबाची जबाबदारी पेलून त्यांनी आपल्यातील उपजत कलेला उत्तेजन दिले. त्यामुळे व्यावसायिक गायनक्षेत्रात उत्तुंग यश मिळवून त्या ‘भारतरत्न’च्या मानकरीही झाल्या. सचिन तेंडुलकर इयत्ता दहावीला नापास झाला होता. पण त्याने क्रिकेटमध्ये अफाट यश मिळविले. ‘भारतरत्न’ किताबही मिळविला. विशेष म्हणजे ज्या दहावीच्या वर्गात तो नापास झाला, त्याच दहावीच्या अभ्यासक्रमात सचिन तेंडुलकर याच्या यशस्वितेचा धडा समाविष्ट झाला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी वयाच्या बाराव्या वर्षी दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करीत स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली व हिंदवी स्वराज्य निर्माण केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सायकलवर पेपर टाकून ‘कमवा व शिका’ या संकल्पनेने अंतर्गत शिक्षण घेतले. पुढे ते भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. एक लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घेतानाच व्यावहारिक ज्ञान मिळविले पाहिजे. पार्ट टाईम जॉब करून पैसे कमविले पाहिजेत. म्हणजे योग्य वयात त्यांना पैशाची किंमत लक्षात येईल.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
