स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल

स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल

किंमत व मूल्य (Price and Value)

यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला Price आणि Value यातील फरक कळला पाहिजे. कोणतीही वस्तू तुम्ही विकत घेतली, तर त्या वस्तूला एक फिक्स किंमत म्हणजे Price असते. तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला एक ठरावीक पगार मिळतो, ती तुमच्या कामाची Price असते. हेच जर तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी. ए., सल्लागार किंवा साधा फिटर जरी असलात, तर तुमच्या कामाच्या मोबदल्याची Price नसते, तर Value असते. ती तुमच्या कौशल्यावर, कुशाग्रतेवर अवलंबून असते. एखादी गाडी बंद पडल्यावर आपण थोडी खटपट करतो व गाडी दुरुस्त करण्यासाठी फिटरला बोलावतो. तो येतो निरीक्षण करतो व एखादा बोल्ट बदलून गाडी चालू करून देतो. पाच-दहा मिनिटांतच तो हे काम लीलया करतो. त्यासाठी तो १००० किंवा १५०० रुपये मागतो. आपण म्हणतो, ‘इतक्या कमी वेळेच्या कामाचे इतके जास्त पैसे?’ पण या कामाची ठरावीक Price नसते, तर Value असते. पाच रुपये नटबोल्टचे व उरलेले पैसे हे फॉल्ट शोधून योग्य नटबोट फिट करायचे किवा बदलायचे. एखादा नावाजलेला वकील सुप्रीम कोर्टात पक्षकाराची बाजू मांडायची फी लाखांत, कोटीत घेतो. ही त्याच्या कामाची Value असते.

जगात अनेक कारउत्पादक कंपन्या आहेत. पण रोल्स राईस, मर्सिडीज, लँबोर्गिनी कंपन्यांच्या कारच्या किमती तुलनेने अधिक असतात. त्यांचे स्टेअरिंग किवा टायर काही सोन्याचे नसतात. पण तरीही त्यांची किंमत जास्त असते, याला कारण त्यांची ब्रँड व्हॅल्यू मोठी असते. आपल्याकडे टाटा, बजाजचे उत्पादन असेल; तर बस, नाम ही काफी है, अशी परिस्थिती आहे. लोक त्या ब्रँडसाठी पैसे मोजायला तयार असतात. त्यांनी स्वतःची ब्रेड व्हॅल्यू तयार करण्याची किमया साधली आहे. अशी किमया आपण आपल्या कामातून साधली पाहिजे. नसता लोक आपली किंमत करतील,

आवश्यकतेलाच आवड समजून काम करा

कधीकधी आवड व आवश्यकता वेगळी असू शकते. असे असले, तरी आवश्यकतेलाच आवडून घेऊन काम करावे लागते. डॉक्टरांकडून बऱ्याचदा कडू औषध दिले जाते. आता कडू चव आपल्याला आवडत नाही. पण ती आजार बरा होण्यासाठीची आवश्यकता असते. त्यामुळे ती आवडून घ्यावीच लागते. नसता आजार बरा होणार नाही. सकाळी उठून व्यायाम करायला आवडत नाही. पण फिट राहायचे, तंदुरुस्त राहायचे, तर ते करावेच लागेल. पुस्तके वाचण्याचा कंटाळा येतो, अभ्यासात मन लागत नाही. हिशेब करणे जिवावर येते. अशा अनेक नावडत्या गोष्टी असतात. ज्या प्रगतीसाठी, यशस्वितेसाठी आवश्यक असतात. त्यात रस घेऊन त्या केल्या पाहिजेत. कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करताना तुम्हाला आवडो, न आवडो, तुम्हाला सुटबूट, टाय परिधान करावाच लागतो. वकिलाला काळा रंग आवडत नसला तरी काळा कोट घालूनच न्यायालयात उभे राहावे लागते. तुम्ही जे क्षेत्र निवडले, त्या क्षेत्रात अत्यावश्यक असलेल्या गोष्टी समजून घेऊन त्या करण्यात आनंद घेण्यास सुरुवात करावी. सातत्य ठेवल्यावर त्या गोष्टीचीही तुम्हाला आपोआप आवड निर्माण होईल.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!