कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

महासत्ता चीन

२०१८ च्या फेब्रुवारीत मी दहा दिवस चीनला होतो. ती माझी बिझनेस टूर होती. आमच्या नगरमधील सुवर्णम प्राईड हॉटेलसाठी फर्निचर तसेच इतर सामानखरेदीसाठी आमचे आर्किटेक्ट, कन्सल्टंट व माझे धाकटे चिरंजीव महेश असे आम्ही चौघे जण चीनला गेलो होतो. माझ्या मनात सुरुवातीपासून चीनबद्दल आकर्षण होतेच. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता कसा झाला आहे? या देशाने इतकी नेत्रदीपक प्रगती कशी केली, याची मलाही कायम उत्सुकता होती. रिटेल मार्केटमध्ये चीनचा प्रचंड दबदबा आहे. त्याचे कारण तिथले स्वस्त दर आणि मालाची गुणवत्ता. तेथील मॉल, दुकानात अनेक देशांची नावे डिस्प्लेला लावलेली असतात. ही नावे लावण्याचे कारण म्हणजे ‘हे सर्व देश आमचे ग्राहक आहेत,’ असे त्यांना यातून सांगायचे असते. तुम्हाला हवी ती वस्तू ते उपलब्ध करून देतात. अगदी ‘यूज अँड थ्रो’ पासून क्वॉलिटी प्रॉडक्ट तेही स्वस्त दरात ते देतात. चिनी वस्तू तुलनेने स्वस्त का असतात, याची मला उत्सुकता होती. मी चौकसपणे अभ्यास केल्यावर लक्षात आले की, तिथे मास प्रॉडक्शन होते आणि दुसरे म्हणजे तिथली कार्यसंस्कृती चीनमध्ये अठरा वर्षे वयापर्यंत शिक्षण तेही मातृ‌भाषेतून घेणे बंधनकारक आहे. १८ ते ७५ या वयोगटातील

प्रत्येकाला काम करावे लागते. ७५ वर्षांनंतर सिनियर सिटीझन झाले, तरी त्यांना घरातील कामे करावीच लागतात. चीनमध्ये कामाची वेळही बारा तासांची आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३० यावेळेत सर्व दुकाने, मॉल्स, कार्यालये खुली असतात. यात सॉफ्ट स्किलमध्ये जवळपास ९९ टक्के महिला काम करतात. विशेष म्हणजे चिनी महिलांच्या अंगावर गुंजभरही सोने किवा दागिने नसतात. पुरुष मंडळी कारखाने, शेती, मासेमारी, ड्रायव्हिंग अशी अंगमेहनतीची कामे करतात. मालक समोर असो की नसो, प्रत्येक जण स्वतः मालक असल्याप्रमाणेच आपले कर्तव्य बजावत असतो. कामचुकारपणाला अजिबात थारा नसतो. चीनची प्रत्येक व्यक्ती आपल्या दुप्पट काम करते. त्यामुळे प्रॉडक्शन कॉस्ट आपल्यापेक्षा कमी असते, परिणामी तेथील मालही स्वस्त असतो. एक शहर व एकच उद्योग असे तंत्र तिचे आहे. प्रत्येक उत्पादनाचे असे स्वतंत्र हव त्यांनी तयार केले आहेत. त्यामुळे काम वेगाने व उत्तम गुणवत्तेचे होते.

चीनमध्ये तुम्ही गेलात, तर तुम्हाला तिथे दुभाष्याची गरज पडते. कारण चिनी मंडळी त्यांच्या मातृभाषेतच जास्त बोलतात. इंग्रजीचे आपल्याइतके प्रस्थ तिथे नाही. आम्ही कारने एका शहरात जात असताना पोलिसांनी आमच्या पुढे असलेली एक गाडी थांबविली. पोलिसाने त्या गाडीच्या चालकाची मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून एका मशीनद्वारे तपासणी केली. मी न राहून आमच्या दुभाष्याला विचारले, “तुमच्याकडे चिरीमिरी देऊन सुटता येत नाही का?” त्यावर त्याने सांगितले, “इथे पोलिस ड्युटीवर असताना काय करतो, हे ऑनलाईन कंट्रोलरूममध्ये दिसत असते. त्यामुळे तशी हिंमतही कोणी करीत नाही.” चीनमध्ये दारू पिऊन कोणी गाडी चालविताना आढळला, तर पन्नास हजारांचा दंड होतो व सहा महिन्यांसाठी त्याचे लायसन्स रद्द केले जाते. दुसऱ्या वेळेस सापडल्यास दोन लाख रुपये दंड, लायसन्स कायमस्वरूपी रद्द आणि सहा महिने जेल अशी शिक्षा आहे. अशा कडक कायद्यांमुळे तिथे नियमांचे काटेकोर पालन केले जाते. गुन्हेगारीचे प्रमाणही खूप कमी आहे.

चीनचे व भारताचे संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. नुकताच चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला असता त्यांना रोखताना आपल्या भारताचे वीस जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतींमुळे संपूर्ण देशातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा सूर उमटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनवर अवलंबून न राहता आपल्या देशातही चांगले उत्पादन वाढावे, यासाठी तरुणाईला, उद्योजकांना तसेच संशोधकांना आवाहन केले आहे. आत्मनिर्भर भारताचा मंत्र त्यांनी दिला आहे. मला वाटते, आत्मनिर्भर बनायचे असेल, तर आपल्याला आपल्या कार्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल करावे लागतील. एक उत्कृष्ट कार्यसंस्कृती अवलंबावी लागेल.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!