कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

जपानची कार्यसंस्कृती व यशस्विता

जपान म्हटले की, आपल्याला आठवतात ती दुसऱ्या महायुद्धातील अणुबाँब पडलेली हिरोशिमा व नागासकी ही शहरे. बेचिराख झालेला जपान आताच्या काळात नावाजला जातो तो कार्यसंस्कृतीसाठी… जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासाठी. ‘जपानी वस्तू म्हणजे गुणवत्तेची हमी’ असे आपण सहज म्हणतो. तर असा हा जपान, आकारमान म्हणाल तर आपल्या महाराष्ट्राएवढा. तेरा कोटी लोकसंख्या आणि देशाच्या चारही बाजूंनी समुद्र. जपानलाच ‘निप्पॉन’ असेही म्हणतात. ६८०० बेटांनी बनलेला जपान आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. या देशातील लोकांचे सरासरी आयुष्यमानही जगात सर्वाधिक आहे, म्हणजे ८७ वर्षे आहे. भूकंपप्रवण देश म्हणूनही जपानची ओळख आहे. वर्षाला या देशात सरासरी १५०० भूकंप होतात. ६ व ९ ऑगस्ट १९४५ ला जपानमधील हिरोशिमा व नागासकी ही शहरे अमेरिकेने अणुबाँब टाकून बेचिराख केली. तीस लक्ष लोकसंख्या क्षणात नाहीशी झाली. तीस लाख जणांना अपंगत्व आले. संपूर्ण जग म्हणू लागले, ‘जपान आता किमान अडीचशे वर्षे उभारी घेऊ शकत नाही.’ पण जपानी शेवटी जपानी होते. त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतली. फिनिक्स पक्षी हा जगण्याच्या तीव्र इच्छाशक्तीचे प्रतीक मानला जातो. तो गरुडापेक्षा मोठा असतो व त्याच्या पंखात इंद्रधनुष्याप्रमाणे सात रंग असतात. फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेण्यासाठी जपानी लोकांना प्रेरणा दिली ती मसाकी इमाई नावाच्या व्यक्तीने. त्याने जपानी लोकांना प्रगतीचा, कार्यसंस्कृतीचा एक फॉर्म्युलाच दिला. त्यालाच ‘कायझेन थेअरी’ असे म्हणतात. आज जगभरात कायझेनचा फॉर्म्युला वापरला जातो. ‘एकत्र येऊन, एकाच ध्येयाने काम केले; तर जगात आपण एक नंबर होऊ शकतो.’ असा विश्वास कायझेनने जपानी लोकांना दिला. Coming together is begining,
keeping together is work and working together is progress. या न्यायाने एकीचे बळ लोकांच्या मनावर बिचविण्यात आले. एक काही सहज मोडली जाऊ शकते, पण शंभर काड्या एकत्र बांधल्या तर त्या मोडणे अशक्य असते. यासाठी जपानने एक एक क्षेत्र निवडून दहा-दहा वर्षाचे टप्पे ठरविले, त्यानुसार काम करून संबंधित क्षेत्रात सर्वोच्च यश मिळविले, १९५० मध्ये जपानी लोकांनी संकल्प केला, कापडउद्योगात भरारी घेण्याचा, अणुबाँबने उद्ध्वस्त झालेल्या जमिनीतच कापूस पिकवून त्यापासून सर्वोत्कृष्ट कापड तयार करायचे व संपूर्ण जगात ते निर्यात करायचे, असा निर्धार करण्यात आला. यशस्वी लोक नेहमी आपल्या कच्च्या दुव्यालाच आव्हान देत काम करतात. तसेच जपानने केले व अवघ्या दहा वर्षात १९६० मध्ये हा देश उत्कृष्ट कापडाचा नंबर एकचा निर्यातदार देश बनला.

१९६० ला जपानने आयर्न व स्टील उद्योगांत जगात एक नंबर मिळविण्याचा संकल्प केला. त्यानुसार अहोरात्र मेहनत घेऊन १९७० मध्ये हा देश खरोखरच टॉपर बनला. १९६० ते १९७० या काव्ळात जपानमध्ये दोन मोठ्या घटना घडल्या. १९६४ ला जपानमध्ये टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेन जपानच्या क्षमतेची प्रचिती जगाला आली. त्याच वर्षी जपानने बुलेट ट्रेनचा आविष्कार प्रत्यक्षात उतरविला. आजही जपानची बुलेट ट्रेन जगात नंबर एक आहे. ही मुलेट ट्रेन ताशी ६०५ किलोमीटर इतक्या वेगाने धावते. आपल्या भारतात डोमेस्टिक विमाने ५०० ते ६०० कि.मी. वेगाने उडतात. म्हणजे आपल्याकडील विमानांपेक्षाही जपानच्या बुलेट ट्रेनची गती अधिक आहे. विशेष म्हणजे गेल्या पंचावन्न वर्षांत बुलेट ट्रेनचा एकदाही अपघात झालेला नाही. वर्षाला ती सरासरी सहा सेकंद लेट चालते. जर ट्रेन दहा मिनिटे लेट झाली, तर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमापनत्रशत त्याची हेडलाईन होते. एवढेच नाही तर ट्रेन लेट झाली, म्हणून प्रवाशांना तिकिटाचे पैसेही परत करण्यात येतात. यावरून जपानमधील तंत्रज्ञान, वेळेचे महत्त्व, शिस्तबद्धता याची कल्पना येते. आता जपानच्याच सहकार्याने भारतातही बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान जपानच्या माध्यमातून भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. जपानी मंडळी वक्तशीरपणासाठी जे. आय. टी. (जस्ट इन टाईम) हा फॉर्म्युला वापरतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर अवघ्या एकोणीस वर्षांत जपानने नेत्रदीपक प्रगती साधली. जपानने ऑलिंपिकचे यजमानपद भूषविले आहे. आपण १९८२ ला एशियाडपर्यंत पोहचलो. नंतर कॉमनवेल्थ स्पर्धेचेही आयोजन केले. परंतु ती स्पर्धा आयोजनातील अष्टाचाराच्या प्रकरणांमुळेच जास्त गाजली. कार्यसंस्कृतीतील फरक यातून अधोरेखित होतो.

१९७० ते ८० या काळात जपानने ऑटोमोबाईल क्षेत्रात नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत या क्षेत्रात जपानी कंपन्यांचा बोलबोला आहे. दुचाकी, चारचाकीमध्ये जपानी तंत्रज्ञानाने केलेली करामत थक्क करणारी आहे. या कंपन्यांच्या भारतातील आगमनामुळे आपल्याकडील जावा, राजदूत या दुचाकी तसेच अॅम्बेसेडर, प्रीमियर पद्मिनी यासारख्या कंपन्या इतिहासजमा झाल्या. होंडा, कावासाकी, सुझुकी, टोयोटा, निस्सान, निप्पॉन या कंपन्यांनी जगभरात धुमाकूळ घातला. भारतातही आपल्याकडील कंपन्यांनी जपानी कंपन्यांशी टायअप करून दुचाकी, चारचाकी बाजारात आणल्या. हिरो होंडा, इंड सुझुकी, कावासाकी बजाज, मारुती सुझुकी याद्वारे त्यांनी भारतातून अमाप पैसा कमावला. टोयोटाची इनोव्हा, फॉर्च्यूनर या गाड्या आपल्या देशात प्रतिष्ठेच्या प्रतीक बनल्या. नगरसेवकापासून मंत्र्यांपर्यंत अनेक जण या गाड्यांनाच पसंती देतात. १९८० मध्ये जपानने इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन क्षेत्रात भरारी घेतली. संगणक, टीव्ही, वॉशिंग मशीन, कॅमेरे, फ्रीज, घड्याळे बनविणाऱ्या अनेक जपानी कंपन्या प्रतिष्ठा मिळवून आहेत. पॅनासोनिक, सोनी, अकाई, तोशिवा, हिताची, यामा, फ्युजी, मित्सुबिशी, कॅनान, कॅशियो या कंपन्या ब्रँड म्हणून ओळखल्या जातात. १९९० च्या दशकात जपानने तंत्रज्ञानाचे इतके आश्चर्यकारक आविष्कार केले की, संपूर्ण जग थक्क झाले. २००० नंतर तर जपान डिजिटल तंत्रज्ञानातही आघाडीवर आहे. रोबोट निर्मितीत जपानने मोठी भरारी घेतलेली आहे. जपान तंत्रज्ञानात सर्वोच्च स्थानी का आहे, याचा मी कायम विचार करतो. मला वाटते, याचे रहस्य त्यांच्या मानसिकतेत आहे. जपानी माणूस स्वतःचा जन्म कशासाठी झाला, असा प्रश्न स्वतःलाच विचारत असेल, मरण्यापूर्वी काय करायला पाहिजे, हे त्यांना लवकर कळत असेल. म्हणूनच ते अनेक आघाडयांवर मशस्वी झाले आहेत.

आपल्या देशात लोकांना जन्म कशासाठी झाला व मरण्यापूर्वी काय करायचे, हेच मुळी लवकर कळत नाही. किंवा कळले, तरी वळत नाही, अशी परिस्थिती आहे. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, ‘ठेविले अनंते तैसेचिया राहवे, चित्ती असो द्यावे समाधान’ आपण या अभंगानुसार आहे तसेच राहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच तुकारामांनी अभंगात हेही म्हटले आहे की, ‘जोडुनिया धन उत्तम व्यवहारे’ याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. म्हणूनच आपण नंबर वन बनत नाही. जपान देशात शंभर टक्के लोकसंख्या साक्षर आहे. तिथे उच्च दर्जाचे शिक्षणही मोफत व मातृभाषेत दिले जाते. आरोग्यसेवाही तिथे मोफत पुरविली जाते. जपानमध्ये इनोव्हेशन म्हणजे संशोधन, नवनिर्मितीला कायम प्रोत्साहन दिले जाते. नवनवीन बदल ते लगेच स्वीकारतात. आपल्याकडे म्हटले जाते, ‘पान का सडले? भाकरी का करपली? घोडा का अडला? तर फिरविले नाही म्हणून.’ स्वयंशिस्तीला जपानमध्ये महत्त्व आहे. देशाप्रती निष्ठा, प्रेम प्रत्येकाच्या मनात ओतप्रोत भरलेले असते. एखाद्या रेल्वेत सीट फाटलेले असेल, तर ते शिवण्यासाठी आणखी कोणाची वाट न पाहता जपानी लोक ती स्वतःची जबाबदारी समजून शिवतात. आपण मात्र आपल्याकडे थोडेसे फाटलेले असेल तर त्यात बोट घालून ते चांगले उघडून काढतो.

संप किंवा अन्य आंदोलन असेल; तर आपले लोक सरकारी बस जाळतात, रेल्वे अडवितात. का तर ती सरकारची प्रॉपर्टी आहे. स्वतःची प्रॉपर्टी जाळण्याची कोणी हिमत करेल का? खरे तर सरकारी प्रॉपर्टी ही राष्ट्रीय संपत्ती असते. ती काय कोणा पंतप्रधानाची, मुख्यमंत्र्याची, मंत्र्याची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते. आपण नागरिक म्हणून जो टॅक्स देतो, त्याच पैशातून सरकार प्रॉपर्टी घेत असते. आपल्याकडे ‘एक्स्प्रेस वे’वर रिफ्लेक्टर लावलेले असतात. कशासाठी तर रात्रीच्या वेळी ड्रायव्हरला रस्त्याचा व्यवस्थित अंदाज यावा यासाठी. आपले लोक ते रिफ्रेक्टरही काढून नेतात. माझ्या मते जपानच्या या यशात पुढील मुद्दे महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. १. व्यावसायिक दृष्टिकोन,

ज्ञान व अनुभव असल्याशिवाय प्रमोशन नाही. गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य, झिरो रिजेक्शन, २. ग्रुप संस्कृती म्हणजे एकीने काम करायचे. एकी हेच बळ. ३. उत्पादनाची सर्वोच्च गुणवत्ता व उत्कृष्ट विक्रीपश्चात सेवा. ४. गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य ५. वयाला सर्वोच्च मान, सिनियर सिटीझन ही देशाची संपत्ती आहे, त्यांचे ज्ञान, अनुभव याचा आदर केला जातो. ६. स्वयंशिस्तीला महत्त्व देण्यात येते. आपल्याकडे ‘कोरोना’ महामारीत मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. पण जोपर्यंत पोलिस मार देत नाहीत किंवा दंड करीत नाहीत, तोपर्यंत अनेकजण मास्क लावतच नाहीत. ७. बिझनेस कार्डाचा वापर, ज्याला आपण व्हिजिटिंग कार्ड म्हणतो. ८. जपानने क्रीडासंस्कृती चांगली जोपासली आहे. महाराष्ट्राइतकाच असलेला हा देश ऑलिंपिकमध्ये पदकांची लयलूट करतो. या देशाने आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये १४२ गोल्ड, १३६ सिल्व्हर तर १६१ ब्राँझ, अशी एकूण ४३९ पदके जिंकली आहेत. तर १३७ कोटींच्या भारताची ऑलिंपिकमधील आजपर्यंतची कमाई आहे, ९ गोल्ड, ७ सिल्व्हर व १२ ब्राँझ अशी एकूण २८ पदके. गोल्डमध्येही सर्वाधिक ८ गोल्ड मेडल्स हॉकीच्या संघाने जिंकली आहेत. मेजर ध्यानचंद यांच्या जादुई खेळाचे त्यात योगदान आहे. (ही आकडेवारी इ.स. २०२० पर्यंतची आहे.)

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!