यशाचे गुपित
जलतरणपटू मायकेल फेल्प्स… कष्टाला पर्याय नाही
जिद्द, चिकाटी व अपार कष्टाची तयारी असेल, तर काय होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स. चार ऑलिंपिकमध्ये सहभागी होत जलतरणमध्ये अठ्ठावीस पदके जिंकणारा हा अवलिया. एकूण पदकांपैकी तेवीस सुवर्णपदके… वैयक्तिक क्रीडाप्रकारात सर्वाधिक ऑलिंपिक पदकांची कमाई करणारा विश्वविक्रमवीर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि इकडे आपल्या भारताने ऑलिंपिकच्या शंभर वर्षांच्या इतिहासात एकूण पदके मिळविली ती २८. त्यापैकी ९ सुवर्णपदके, सुवर्णमध्येही जवळपास ७ ही हॉकीमध्ये कमावलेली.
मायकेल फेल्प्सचा जन्म १९८५ सालचा. आज त्याचे वय ३५ वर्षे आहे. २००४, २००८, २०१२, २०१६ या ऑलिंपिक स्पर्धा त्याने गाजविल्या. वयाच्या सातव्या वर्षी त्याने स्वीमिंगला सुरुवात केली. बाराव्या वर्षी त्याने राष्ट्रीय पातळीवरील सगळे विक्रम आपल्या नावावर केले. पंधराव्या वर्षी तो ऑलिंपिकमध्ये उतरला. २००४ च्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये त्याने स्वीमिंगच्या विविध प्रकारांत सहा पदके मिळविली. १९७२ मध्ये मार्क स्पीड्जने सात ऑलिंपिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम मोडण्याचे लक्ष्य फेल्प्सने समोर ठेवले. ‘२००८ मध्ये आपण हा विक्रम मोडू’ असे त्याने जाहीर केले. त्यानुसार त्याने तयारी केली. प्रचंड मेहनत घेतली. त्याला जळीस्थळी आठ ऑलम्पिक पदके दिसत होती. तहानभूक विसरून तो २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकची तयारी करू लागला. पण दुर्दैवाने २००७ मध्ये त्याला अपघात झाला. त्याचा एक हात मोडला. डॉक्टरने सांगितले, “तुला आता लवकर स्वीमिंग करता येणार नाही.” पण निराश होईल तो फेल्प्स कसला? त्याने जिद्द सोडली नाही. हात बांधलेल्या अवस्थेतच ठेवून त्याने पायाने स्वीमिंग करण्यास सुरुवात केली. त्याचा प्रचंड सराव केला व पारंगतही झाला. २००८ मध्ये तो ऑलिंपिकमध्ये उतरलाच! एकामागोमाग एक रेकॉर्ड करीत त्याने सात पदके जिंकली. शेवटची २०० मीटरची स्पर्धा शिल्लक राहिली. या शर्यतीवरच त्याचे स्वप्न अवलंबून होते. महत्त्वाकांक्षा मनात बाळगून तो पाण्यात उतरला. १०० मीटर गेल्यावर त्याच्या डोळ्याच्या गॉगलची काच फुटली. डोळ्यात पाणी गेले, समोरचे काही दिसत नव्हते. तरीही त्याने वेग अजिबात कमी
केला नाही, तो विचलित झाला नाही. त्यात्य महाभारतातील अर्जुनाप्रमाणे फक्त एकच गोष्ट दिसत होती, आठवे मेडल, तो स्वीमिंग करीत राहिला. अंतिम रेषेवर त्याने हात मारला. नंतर पाण्यातून बाहेर आला व त्याने रिझल्ट बोर्याकडे पाहिले. त्यावर त्याच्या नावापुढे लिहिले होते, ‘WR’ (World Record), फेल्प्सने विश्वविक्रम करीत ती शेवटची स्पर्धा जिंकली होती. स्वीमिंगमध्ये त्याने इतिहास घडविला. या प्रकारात सर्वच्या सर्व सुवर्णपदके मिळविणारा तो जगातील पहिला जलतरणपटू ठरला.
या देदीप्यमान कामगिरीमुळे तो जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत खेळाडू बनला. दुर्दैवाने इतका मानसन्मान, पैसा मिळाल्याने तो भरकटला, व्यसनी बनला. अशीच एकदा नशेत गाडी चालवीत असताना त्याला पोलिसांनी पकडले. त्याला सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला. तो शिक्षा भोगून बाहेर आला. पण या कालावधीत त्याच्यात खूप बदल झाला होता. जेलमध्ये असताना त्याने भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्यातील दुसऱ्या अध्यायातील चव्वेचाळिसावा श्लोक त्याला दिशा देणारा ठरला. भोग व ऐश्वर्यात बुडाल्यावर कामात समाधी लागत नाही, म्हणजेच यश मिळत नाही हे त्याला कळले होते. ही शिकवण घेऊनच तो पुन्हा पाण्यात उतरला. २०१६ च्या ऑलम्पिकमध्ये त्याने सात पदके जिंकण्याची कामगिरी केली. एवढयावर तो थांबलेला नाही. त्याने २०२० च्या टोकियो ऑलिंपिकचीही तयारी चालविली. कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे चकलावी लागली असली, तरी फेल्प्सने आपले लक्ष्य कायम ठेवले आहे. फेल्प्सला एकदा कोणी तरी त्याच्या यशाचे श्रेय विचारले. त्यावर तो म्हणाला, “संडे असो वा मंडे, हॉलिडे असो की बर्थ डे मी सराव कधीच चुकविला नाही.” सुटी म्हणाल, तर २९ फेब्रुवारीला चार वर्षातून एकदा, तो आठवड्याला १०० किलोमीटर स्वीमिंग करतो. १०० मीटर जलतरण तो अवघ्या ५० सेकंदांत पूर्ण करतो. फेल्प्सचे बालपण चारचौघांसारखे सुखवस्तू नव्हते. आईवडिलांनी घटस्फोट घेतलेला होता. तो आईकडे राहूनच स्वीमिंग शिकला. आज त्याने स्वीमिंगच्या प्रसार, प्रचारासाठी स्वतःची एनजीओ सुरू केलेली आहे. जवळपास एक मिलियन डॉलर म्हणजे जवळपास सात कोटी रुपये त्याने या कामासाठी दिले आहेत.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
