यशाचे गुपित

यशाचे गुपित

माझ्याकडे विक्रीकौशल्य नाही

अनेकदा आपण लोक बोलताना ऐकतो, “अरे, तो प्रॉडक्ट किंवा सेवा चांगली आहे, पण मला विक्री करता येत नाही. मला सेल्समनशिप करायला आवडत नाही, जमतही नाही.” हेसुद्धा एक थोतांड आहे, असे मला वाटते. माझ्या मते पृथ्वीतलावरील प्रत्येक माणूस सेल्समन आहे. आयुष्यभर तो काही ना काही विकतच असतो. कोणी प्रॉडक्ट विकतो, कोणी सेवा विकतो, कोणी अनुभव विकतो, कोणी ज्ञान विकतो, कोणी कष्ट विकतो. आता प्रत्येक विक्रीसाठी प्रत्येकाला पैसेच मिळतात असे नाही. आपण एखाद्याला सहज सांगतो, “हिरो होंडाची बाईक घे । हे हॉटेल चांगलं आहे बरं का, जेवायला जायचं तर तिथेच जा महाबळेश्वरला जा /दुबईला फिरून ये, खूप मजा येते.” आपण हे सांगतो म्हणजे नकळत त्या गोष्टींची जाहिरातच करीत असतो.
या बदल्यात आपल्याला काय मिळते? काहीच नाही. म्हणजे आपण फुकट काही तरी विकत असतो

व्यवसायाचा, यशस्वितेचा एक नियम आहे, ज्याला विक्री करता येते, तो यशस्वी होतोच. मराठी माणसाला सेल्समन बनणे कमीपणाचे वाटते. गावाकडचे लोक आठवडयाला बाजाराला जातात ते विक्रीसाठी नाही तर खरेदी करण्यासाठी. पाचशे-हजाराची खरेदी करण्यासाठी ते दिवसच्या दिवस बाजारात घालवतील. त्याच वेळी व्यावसायिकही बाजारात असतात. पण ते स्वतःची वैयक्तिक खरेदी शेवटच्या टप्प्यात करतात, कारण इतर वेळ ते व्यवसाय, विक्री करण्यात घालवितात. त्यांचा मूळ उद्देश हा पैसे कमवणे असतो. म्हणूनच व्यावसायिक श्रीमंत होत जातात, हे मराठी माणसाने लक्षात घेतले पाहिजे,

आपल्या देशात, राज्यात बेरोजगारीचे प्रमाण खूप आहे. याला फक्त सरकार जबाबदार नाही, तर आपली मूळ प्रवृती जबाबदार आहे, असे मला वाटते. मराठी माणसे नोकरी करणाऱ्याला जास्तीचा मानसन्मान देतात. विक्री करणणे हे कमी प्रतीचे काम आहे, असे मानतात. हा मराठी माणसाचा मोठा दुर्गुण आहे. मराठी माणसाच्या डीएनएमध्येच हा दुर्गुण आहे, असे मला वाटते. श्रीमंत व्हायचे, तर तुम्हाला विक्री कला आलीच पाहिजे. अमिताभ बच्चन चित्रपटातून पैसे कमावतो. पण यातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो नवरत्न तेलाची जाहिरात करूनही डबल ट्रिपल पैसे कमावतो. सचिन तेंडुलकर स्वतः कधी बूस्ट प्यायला नसेल, पण तो ‘बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी’ म्हणून करोडो कमावतो. पारले जी बिस्किटाच्या पुड्यावर छायाचित्र असलेली मुलगी

आता स्वतः आजी झाली. पण विक्रीकलेच्या जोरावरच आजही तिला त्या जाहिरातीचे पैसे मिळतात. श्रीमंत, यशस्वी लोकांच्या नसानसांत सेल्स, मार्केटिंग, ब्रेण्डिंग असते. संधी मिळेल तिथे स्वतःच्या उत्पादनाचे, सेवेचे प्रमोशन करतात व श्रीमंत होतात.

मी स्वतः यशस्वी झालो ते विक्रीकलेमुळेच.. सेल्समनशिपमुळेच. मी जर नोकरी करीत राहिलो असतो, तर मध्यमवर्गीय श्रीमंत झालो असतो. पण मी सेल्स व मार्केटिंगमुळेच उच्चवर्गीय श्रीमंत झालो. विमासेवा उद्योगात मी सतत विक्री करीत राहिलो. तुम्ही कोणत्याही श्रीमंत व्यक्तीला विचारा, तेही हेच सांगतील की, विक्री करणे हा कमीपणा नाही. तुम्हाला कदार्चित नातेवाईक मंडळी, ओळखीचे लोक नावे ठेवतील, ठेवू द्या! काही फरक पडत नाही. तुम्ही उद्या यशस्वी झाल्यावर हेच लोक तुमचे गुणगान गातील. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. म्हणूनच मी तुम्हाला हे अधिकारवाणीने सांगू शकतो. आपल्या आजूबाजूला दुतोंडी गांडुळासारखे अनेक जण असतात. हे माझ्यासह अनेकांनी अनुभवले असेल.

मी जेव्हा स्टेट बँकेतील नोकरी सोडायची ठरविली, तेव्हा एकानेही मला ‘बरोबर करतोस,’ असे म्हटले नाही. त्या वेळी फक्त माझी पत्नी माझ्या निर्णयाच्या बाजूने उभी राहिली. तिचा माझ्या कष्टावर, प्रामाणिकपणावर विश्वास होता. म्हणून म्हणतो, लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका. विक्रीकलेत लोक उत्पादन वा सेवेपेक्षाही तुमच्यातील प्रामाणिकपणा जोखतात. तुमचा पूर्वेतिहास चांगला असेल, तर विश्वास ठेवतात. तुम्ही उत्पादन किंवा सेवा नाही, तर स्वतःला विकत असता. तुमची चिकाटी, ज्ञान, विश्वसनीयताच तुम्हाला विक्रीकलेत यश मिळवून देते. म्हणून या क्षेत्रात कधीही शॉर्ट कट मारून यशस्वी होण्याचा प्रयत्न करू नका, इयिकल बिझनेस करा. विक्रीकलेची पुस्तके वाचा, अभ्यास करा, सतत नवनवीन गोष्टी शिकत रहा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!